हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात प्रतिभाताई वैशंपायन यांचे धाडसी कार्य
हैद्राबाद राज्यात पूर्वी निजामाची सत्ता होती.या निजामाच्या जुलमी राजवटीतून हैद्राबाद राज्याला मुक्त करण्यासाठी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचाही सहभाग होता. जेथे पुरुषांना आपल्या गावात व आपल्या भागात मोकळेपणाने हिंडणे किंवा फिरणे अवघड होते तर, स्त्रियांच्या परिस्थितीची आपण कल्पनादेखील करू शकत नाही. तरीही काही धाडसी स्त्रियांनी हैद्राबाद मुक्ती लढ्यात आपले मोलाचे योगदान दिलेले दिसून येते. त्यात प्रतिभाताई पूर्वी इंदुमती विश्वनाथ पळणीटकर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सध्या त्या प्रतिभाताई या नावाने ओळखल्या जातात.
प्रतिभाताई यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२३ रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमध्येच मराठा हायस्कूलमध्ये झाले. नाशिकला शिक्षण घेत असताना त्यांनी सावरकरांची भाषणे ऐकली त्यामुळे कुठे ना कुठे देशभक्तीची जाणीव सावरकरांच्या भाषणातून त्यांच्या मनी रुजली असेही म्हणता येईल. १९४२ हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळ होता त्याचवेळी त्या मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. संपूर्ण भारत देश ब्रिटिशांविरुद्ध पेटून उठला होता. सगळीकडे आंदोलने चालू होती . अशाच एका आंदोलनात त्या व त्यांच्या मावशी सामील झाल्या. या कारणामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. नंतर सोडलेदेखील पण त्यांच्या आजोबांनी त्यांच्या मुलींना काही हानी होऊ नये म्हणून त्या दोघींची रवानगी नागपूर येथे केली. पुढे त्यांना वैशंपायन यांचे स्थळ चालून आले. मुलगा हुशार, देशभक्त, बुद्धिमान, असल्यामुळे प्रतिभाताईंनीदेखील लग्नास होकार दिला.
लग्नाअगोदर त्यांचा मराठवाड्याशी फारसा संपर्क आलेला नव्हताच. १९४२-१९४३ साली त्यांचे लग्न झाले. त्यावेळी मराठवाड्यात वंदे मातरम् चळवळ सुरू झालेली होती. निझामाविरूद्ध लढा अखेरच्या टप्यात येऊन ठेपलेला होता. प्रतिभाताईंच्या सासूबाई त्यांना घराच्या बाहेरच पडू देत नव्हत्या. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे कशातच सामील होता आले नाही, पण घरात होणाऱ्या गोविंदभाई व सी.डी चौधरी यांच्या चर्चेमार्फत त्यांना बाहेरील स्थिती ज्ञात होत असे. महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन झाले असता स्वामीजींनी भाऊसाहेब वैशंपायन यांना अकोला कॅम्पला पाठवले. तेव्हा प्रतिभाताई पण त्यांच्यासोबत कॅम्पला गेल्या होत्या. तिथेच त्यांना राष्ट्रीय बाण्याचे शिक्षण मिळाले व लढ्यातील त्यांच्या भूमिकेला येथूनच सुरुवात झाली.
१९४७ मध्ये प्रतिभाताई शिक्षिका म्हणून काम करत सोबतच त्या कार्यकर्त्या ही होत्या. मुलींची शाळा सुटल्यानंतर ताराबाई व प्रतिभाताई त्यांच्या गच्चीवर मुलींची सभा घेत व त्यांना मार्गदर्शन करत, जेव्हा ही गोष्ट हेडमास्तर बाईंना समजली तेव्हा प्रतिभाताईंना हे बंद करण्यास सांगितले ,पण प्रतिभाताईंनी नोकरीचाच राजीनामा दिला . १४४ कलम लागू असतानाही आपली भिती नाहीशी व्हावी, म्हणून त्या रस्त्यावरून फिरत असत. त्यांनी महिला सत्याग्रह करायचे ठरवले होते ,तेव्हा प्रतिभाताई, प्रमिता तांबेकर, नांदापूरकर वकील यांची बायको इ. झेंडा सत्याग्रहात सामील झाल्या. प्रतिभाताई व ताराबाई सायक्लोस्टाईलवर पत्रके काढत. काढलेली जी पत्रके आहेत ती कार्यकर्त्यांपर्यंत कशी पोहोचवावी यासाठी ताराबाईंनी काढलेली पत्रके प्रतिभाताईंच्या पोटावर बांधली व दिलशाह टॉकिजकडे रिक्षात बसून त्या रवाना झाल्या . मोठा उत्सव असल्याने त्यांच्या रिक्षाला कोणीही अडवले नाही. दिलशाह टॉकिजच्या माडीवर चढून मागच्या बाजूस त्यांनी ती पत्रके फेकून दिली अशा कडेकोट बंदोबस्तातून पत्रके घेऊन जाण्याचे धाडसी काम प्रतिभाताईंनी केले. असाच एक प्रसंग जेव्हा त्या हैद्राबादला राहत होत्या. तेथल्या गल्लीत एका प्रसिद्ध वकिलाच्या घरी मागील बाजूस एका अडगळीच्या खोलीत छोटेसे रोटरी मशीन होते. १४ ऑगस्ट १९४७ ला बारा वाजल्यानंतर पुढच्याच क्षणी ताराबाईंनी व प्रतिभाताईंनी त्या खोलीतून तिरंगी झेंड्याला मानवंदना दिली. ओठातल्या ओठात वंदे मातरम् म्हणले व आपले पत्रके काढण्याचे काम सुरू ठेवले.
५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त होणार होता, परंतु भारतातील जी लहान मोठी संस्थाने भारतात विलीन झाल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ नाही म्हणून निझाम संस्थानाचे भारतात विलीनीकरण झालेच पाहिजे आणि त्यासाठी अंतिम लढा द्यायचे स्टेट काँग्रेसने ठरवले तेव्हा महिला सेवक दलाचे तीन गट केले. त्यापैकी एका दलाच्या प्रमुख म्हणून प्रतिभाताईंनी अधिवेशनाच्या तीनही दिवस काम केले.
अशा प्रकारे प्रतिभाताई वैशंपायन यांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात आपली मोलाची कामगिरी केल्याचे दिसून येते.
संदर्भ
भाले राम, कोरान्ने शोभा, देशपांडे वृंदा, धारूरकर शुभदा, कोरान्ने आशा ( संपा ), ( २०१२ ), हैद्राबाद मुक्ती संग्रामातील पूर्ण वेळ कार्यकर्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबाद ,प्रथम आवृत्ती पृ. ७७,७८,७९.