Jump to content

धूळपाटी/महाराणी लक्ष्मीबाई भोसले

राजर्षी शाहू महाराज यांच्या धर्मपत्नी

महाराणी लक्ष्मीबाई म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सुविद्य पत्नी आणि राजाराम छत्रपतींच्या मातोश्री आईसाहेब महाराज होत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्यात त्या सहभागी होत्या. छत्रपती शाहू महाराजांची सत्यशोधक विचारसरणी, अस्पृश्यता निवारणाचे कार्य, धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि शिक्षणप्रसार ही तत्त्वप्रणाली त्यांनी स्वतः तर जपलीच; शिवाय पुत्र राजाराम महाराजांना त्यांच्या कार्यामध्ये सक्रिय पाठिंबा व आधार दिला. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी आयुष्यभर जोपासला.

महाराणी लक्ष्मीबाई ऊर्फ आईसाहेब महाराज यांचा जन्म 1 जानेवारी 1880 रोजी बडोदा येथे झाला. बडोद्याचे श्रीमंत गुणाजीराव खानविलकर यांच्या त्या कन्या. 1 एप्रिल 1891 रोजी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी लक्ष्मीबाई यांचा विवाह संपन्न झाला आणि महाराणी म्हणून त्या कोल्हापुरास आल्या.

महाराणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांचे वैवाहिक जीवन सुखी व संपन्न होते. त्यांना तीन मुले राधाबाई ऊर्फ आक्कासाहेब महाराज, राजाराम महाराज आणि प्रिन्स शिवाजी. शाहू महाराजांचे आपल्या पत्नीवर नितांत प्रेम होते. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील भोगावती नदीवर धरण बांधण्याची योजना 1907 मध्ये सुरू केली होती. धरणाच्या कामाचा शुभारंभ महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते करण्यात आला. त्या तलावाला शाहू छत्रपतींनी आपल्या पत्नीचे नाव ‘महाराणी लक्ष्मीबाई तलाव’ तसेच धरणाला ‘राधानगरी’ असे आपल्या मुलीचे नाव दिले. फेजिवडे गावाजवळ, राधानगर नावाचे गावही वसविले.

महाराणी लक्ष्मीबाई स्वभावाने अतिशय कनवाळू, धीट व करारी होत्या. शाहू महाराजांच्या पत्नी म्हणून त्या त्यांच्या वैयक्तिक आवडी-निवडी जाणून घेत व त्याप्रमाणे वागत. त्यांना काय हवे, काय आवडते, त्या प्रकारचे पदार्थ बनवीत. त्यांना आयुर्वेदाचे चांगले ज्ञान होते. त्या आपल्या नोकरांच्या कुटुंबांना व नातलगांना त्यांचे हितचिंतक म्हणून औषधांचे सहाय्य करीत असत. सर्वांच्या बरोबर मिळून-मिसळून वागण्यात, इतरांना समजून घेण्यात त्या तरबेज होत्या.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1894 मध्ये संस्थानचा राज्यकारभार स्वीकारला. राज्यभर फिरून लोकांची परिस्थिती, गरजा व त्यांची दुःखे जाणून घेतली. सामान्य जनतेच्या भावना ओळखून त्यांचे दुःख निवारण करण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. अज्ञान, अंधश्रद्धा नि अस्पृश्यता या तीन व्याधी निपटून काढल्याखेरीज आपल्या प्रजेच्या विकासाच्या वाटा खुल्या होणार नाहीत, याची खूणगाठ बांधून महाराजांनी कामाला सुरुवात केली. गावोगावी शाळा काढल्या, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, पुरोहित शाळा सुरू केल्या.

त्या काळी अस्पृश्यांना विद्येचा अधिकार तर नव्हताच; पण देवालये, चावड्या, सार्वजनिक पाणवठे आदी ठिकाणीही प्रवेश करण्यास त्यांना मनाई होती. महाराजांनी अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न स्वतःपासून केला. अस्पृश्य तरुणांना मोटार ड्रायव्हिंगच्या कोर्सला पाठवून आपल्या, महाराणी साहेबांच्या, चिरंजीव आक्कासाहेब व युवराज यांच्या गाडीवर नेमले. पट्टेवाले, शिपाई, डगलेवाले पोलीस, स्वतःचे शरीर-रक्षक अस्पृश्य नेमले. थोडेसे शिक्षण झालेल्यांना त्या मानाने कारकून, रजिस्ट्रारच्या जागा दिल्या. महात्मा फुले यांचा अस्पृश्योद्धाराचा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरविला.

या हरिजन नोकरांना राजवाड्यावर थेट स्वयंपाकघरापर्यंत जाण्याची परवानगी होती. ही त्या काळाची मोठीच गोष्ट होती. महाराणी लक्ष्मीबाईंना खास सूचना होत्या की, एखादा हरिजन त्यांच्या दर्शनासाठी आला तर त्यांना त्यांच्या पायांना स्पर्श करण्यास त्यांनी अनुमती द्यावी. महाराणी लक्ष्मीबाईंनी आपल्या पतीचे हे अस्पृश्यता निवारणाचे धोरण हसत-खेळत स्वीकारल्याचे दिसून येते. (राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ 1994, पृ.333)

शाहू महाराज अस्पृश्यता निर्मूलनासाठी आपल्या कुटुंबापासून प्रयत्न करत होते. याबाबत गंगाराम कांबळे यांनी एक आठवण सांगितली आहे – एकदा महाराज शिरोळला शिकारीला गेले होते. तेव्हा महाराजांनी चहासाठी म्हणून शिरोळच्या महारांना त्यांच्या तक्यात सर्वांची सोय करावयास सांगितली. महारांना आपल्या घरात घेण्यापेक्षा सुद्धा त्यांच्याच घरात आपण जाऊन जेवण किंवा फराळ करणे, ही बरीच पुढची पायरी होती. त्यातही महाराज शिरोळच्या तक्यात एकटेच गेले नाहीत, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना यात सहभाग घेता यावा म्हणून हळदी-कुंकू समारंभ करायला लावला व त्या ठिकाणी महाराणी लक्ष्मीबाईसाहेब, कन्या आक्कासाहेब महाराज व सून इंदूमतीदेवी यांना मुद्दाम बोलवून घेतले व इंदूमतीदेवींना तेथे चार शब्द बोलायलाही लावले. (राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, पृ. 753)

छत्रपती शाहू महाराजांप्रमाणेच अस्पृश्यता निवारण व मागासवर्गीयांना शिक्षण देण्याच्या कार्यात महाराणी लक्ष्मीबाई याही सक्रिय होत्या. मागासलेल्या जातीच्या स्त्रियांच्या शिक्षणाची कोल्हापुरात सर्व प्रकारची सोय करणारा हुकूम त्यांनी काढला ः

ता. 8 आक्टोंबर 1919 इसवी. हुजूर सरकारचा मु.6. नं 354 चा होऊन लगत मु.जा. नं 264 ता. 6 माहे आक्टोंबर 1919 इसवी आज्ञा झाल्याआधारे सर्व लोकांस कळविण्यास प्रसिद्ध करण्यात येते की, श्रीमान सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित मातोश्री लक्ष्मीबाई छत्रपती महाराणी साहेब यांनी कृपाळू होऊन आज्ञा केली आहे की, मागासलेल्या लोकांना पडदा नाही, तेव्हा मागासलेल्या जातीतील बायका ज्यांना विद्या शिकण्याची इच्छा असेल, त्यांनी मामासाहेब सुर्वेयांच्याकडे अर्ज करावेत, म्हणजे ते त्यांची बोर्डिंगची व लॉजिंगची सर्व व्यस्था करतील. (करवीर सरकारचे गॅझेट भाग 1 दि. 11 आक्टोंबर 1919)

कोल्हापुरात घडलेल्या वेदोक्त प्रकरणांनतर शाहू महाराजांनी बहुजन समाजातील पुरोहित तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 6 जून 1920 मध्ये धार्मिक विधींचे शिक्षण देण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक विद्यालया’ची स्थापना केली. सर्व जाती-धर्मातील तरुण पौरोहित्याचे प्रशिक्षण घेऊ लागले. पूर्वी जेथे भट-पुरोहितांशिवाय पान हलत नसे, तेथे भटा-ब्राह्मणांना न बोलवता हे विधी पार पाडले जाऊ लागले. सत्यशोधक समाजाच्या वतीने अनेक सहभोजनाचे कार्यक्रम पार पडू लागले.

याबाबत भास्करराव जाधव यांनी सांगितलेली एक आठवण महत्त्वाची आहे – ब्राह्मण पुरोहितांची धार्मिक मक्तेदारी काढून टाकून तेथे मराठा पुरोहितांना बसविणे हे काम शाहू महाराजांनीच केले. आज जरी ही गोष्ट फारशी महत्त्वाची वाटत नसली तरी त्या काळी ती क्रांतिकारक होती. छत्रपती शाहू महाराजांनी ‘क्षात्रजगद्गुरू’चे पद निर्माण केले. शिवाजी वैदिक स्कूलमधून मराठा पुरोहित तयार केले, तरीही नवीन पुरोहितांच्यावर सामान्य जनतेचा विश्वास बसणे गरजेचे होते. सनातनी मराठ्यांना सुद्धा ‘मराठा पुरोहित’ ही गोष्ट मान्य नव्हती. पण महाराजांच्या दडपणामुळे त्यांना नमते घ्यावे लागत होते.

खुद्द महाराजांच्या राजवाड्यातही ही सुधारणा अप्रिय वाटत होती. आपल्या राजवाड्यातील खासगी देवालयातील ब्राह्मण पुजाऱ्यास महाराजांनी काढून टाकले. पूजा-अर्चा, धार्मिक विधी प्रत्येक ठिकाणी मराठा पुरोहितांकडून चालू केले. राजवाड्यातही सर्वांना मराठा पुरोहितांकडून विधी करवून घ्यावेत, अशी सूचना केली, तरीसुद्धा ब्राह्मण पुरोहितांच्या बाबत निर्णय घेण्यास महाराणी टाळाटाळ करीत होत्या. यासाठी महाराजांनी एक युक्ती योजिली. महाराणींच्या ब्राह्मण पुरोहितास त्यांनी ‘मत्स्यपुराण’ वाचावयास सांगितले. हे पुराण नवरा-बायकोने मिळून ऐकावयाचे असते, असा महाराणींना निरोप पाठविला. ‘मत्स्यपुराणा’तील ‘अनंगदान’ व्रत ब्राह्मण पुरोहित वाचू लागला व त्याचा अर्थ मराठीत सांगू लागला.

त्या आख्यानात ब्राह्मणाला पतिव्रता स्त्रीने आपला देह अर्पण केला असता पुण्य लाभते, असे लिहले आहे, हे ऐकताच महाराणी एकदम खवळून उठल्या. म्हणाल्या, “हे पुराण बंद करा. मला हे ऐकावयाचे नाही आणि उद्यापासून ब्राह्मण पुरोहितांना आपल्या दारात पाऊल टाकू द्यावयाचे नाही.” महाराज म्हणाले, “आज म्हणाल व उद्या परत बोलवाल. मग तो आला नाही म्हणजे आपले नडून बसेल.”

“नाही, मी पुन्हा ब्राह्मण पुरोहितांना बोलावणार नाही. जगदंबेची शपथ घेऊन सांगते, मी आता कधी बदलणार नाही.”

यानंतर महाराजांच्या निधनानंतर सुद्धा ब्राह्मण पुरोहितांना कधीही बोलविले नाही. (माधवराव बागल-शाहू महाराजांच्या आठवणी,पृ. 161). आईसाहेब महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांच्या योजना व त्यांनी घालून दिलेली तत्त्वे त्यांच्या पश्चात तंतोतंत पाळल्याचे दिसते व अनेक गोष्टींमध्ये धीरोदात्तपणे खंबीर राहून महाराजांची तत्त्वप्रणाली जोपासल्याचे जाणवते.

इ. स. 1917 मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी दिल्लीच्या मध्यवर्ती कायदे मंडळात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून एक विधेयक आणले. सनातनी मंडळींनी या बिलाला विरोध केला. शाहू महाराजांनी पटेल बिलाला ठोसपणे पाठिंबा दिला. त्याच वर्षी मिश्र विवाहांना मान्यता देणारा कायदा आपल्या संस्थानमध्ये पास केला. मणभर उपदेशापेक्षा कणभर कृती अधिक महत्त्वाची असते. महाराजांचे वर्तन बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले॥ या उक्तीला साजेसेच होते. त्यांनी इंदूरच्या धनगर जमातीतील राजघराण्याशी आपल्या घराण्याचे सोयरेसंबंध घडवून आणले. जातिभेद मोडण्यासाठीचा हा कृतिशील प्रयत्न होता. वरच्या जातीने खालच्या जातीतील कुटुंबाशी वैवाहिक संबंध जोडून जातिभेद मोडले पाहिजेत, असे महाराजांना वाटे. म्हणून जातिभेद मोडण्यासाठी आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा प्रयत्न महाराजांनी आपल्या घरापासून सुरू केला. महाराजांच्या कागलकर घाटगे या जनक घराण्यातील काकासाहेब महाराज घाटगे यांची कन्या चंद्रप्रभाबाई हिचा विवाह इंदोरच्या तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी ठरविला. महाराजांनी हा विवाह ठरविला; पण समारंभ घडवून आणण्यास दुर्दैवाने शाहू महाराज जिवंत राहिले नाहीत. 6 मे 1922 रोजी त्यांचे अकाली निधन झाले. पण होळकर-घाटगे विवाह 9 फेब्रुवारी 1924 रोजी इंदुरमुक्कामी मोठ्या थाटाने पार पडला. हा समारंभ शाहू महाराजांच्या इच्छेनुसार पार पाडण्यास आईसाहेब महाराज, आक्कासाहेब महाराज यांनी पुढाकार घेतला. आईसाहेब महाराजांनी शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा पुढे जोमाने चालविल्याचे दिसून येते.

6 मे 1922 रोजी सकाळी 6 वाजता वयाच्या 48 व्या वर्षी राजर्षी शाहू छत्रपतींचे मुंबई येथे अकाली निधन झाले. आपल्या लाडक्या राजाच्या मृत्यूमुळे सर्व कोल्हापूर संस्थान शोकाकुल झाले. या महापुरुषाचे दर्शन घेण्यासाठी सर्व प्रजा रस्तोरस्ती बसून राहिली होती. बापूसाहेब घाटगे यांनी महाराजांचा मृतदेह मोटारीने पुणे-सातारा मार्गे आणला. त्या मार्गावर हजारो लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून छत्रपतींना आदराने वंदन केले. कोल्हापुरात नव्या राजवाड्यावरून राजवैभवी मानसन्मानासहित प्रचंड मोठी अंत्ययात्रा स्मशानापर्यंत जावयास निघाली. ती प्रचंड स्मशान यात्रा हजारो गरीब, श्रीमंत लोकांसहित स्मशानभूमीत 7 मे रोजी पहाटे 5.30 वाजता पोहोचली. कोल्हापुरातच नव्हे, तर तमाम महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली गोष्ट कोल्हापूरच्या ‘त्या’ स्मशानभूमीत घडली; ती म्हणजे शिवाजी वैदिक विद्यालयाच्या मराठा विद्यार्थ्यांना छत्रपतींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांच्या ऐवजी मराठा पुरोहित म्हणून बोलवण्यात आले. हा निर्णय घेण्यात राजाराम छत्रपती आणि विधवा महाराणी लक्ष्मीबाई यांनी अलौकिक धैर्य दाखविले.

वैदिक स्कूलमधून तयार झालेल्या ब्राह्मणेतर पुरोहितांकडून छत्रपतींसारख्या संस्थानिकाचा अंत्यविधी होण्याचा महाराष्ट्राच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होता. महाराजांच्या आकस्मिक मृत्यूने शोकसागरात बुडालेल्या महाराणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती राजाराम महाराजांना आज कोणत्या दिशेने पाऊल टाकावयाचे, हे ठरविणे भाग पडले. पूर्वपरंपरेला धरून ब्राह्मण पुरोहितांकडून हा विधी करवावयाचा की, एकदम नवीन दिशेने पाऊल टाकून छत्रपती शाहू महाराजांच्या मताप्रमाणे ब्राह्मणेतर पुरोहितांकडून हे गंभीर कार्य पार पाडावयाचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. एका बाजूने हजारो वर्षांची रुढी त्यांना धमकावीत होती; तर दुसऱ्या बाजूने छत्रपती शाहू महाराजांची स्मृती त्यांना उत्तेजित करीत होती. ‘काहीही होवो, मी माझ्या पतीच्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहीन,’ असा महाराणी साहेबांनी निश्चय केला. अशा प्रसंगी आजपर्यंत मी-मी म्हणणारे पुष्कळ सुधारक कर्तव्यच्युत झाले आणि जन्मभर प्रतिपादिलेल्या सुधारणांवर अखेर त्यांनी पाणी सोडले; पण याबाबत राजाराम छत्रपती आणि महाराणी लक्ष्मीबाई यांनी अलौकिक धैर्य दाखवून मोठ्या सुधारकांना सुद्धा तत्त्वनिष्ठेने धैर्याच्या दृष्टीने मागे टाकले. धन्य तो सुपुत्र आणि धन्य ती पतिनिष्ठ महाराणी. शिवाजी वैदिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्रांनी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यास प्रारंभ केला आणि ते दुःखदायक संस्कार पूर्ण झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या मृतदेहाला 48 तोफांची सलामी देण्यात आली. शाहूराजे अनंतात विलीन झाले, अमर झाले. एका राजावर अंत्यसंस्कार मराठा पुरोहितांनी केले, याचा अर्थ जनतेवरील ब्राह्मण पुरोहित व त्यांच्या पाठिराख्यांचे वजन संपुष्टात आल्याची ती ग्वाहीच होती. (धनंजय कीर – राजर्षी शाहू छत्रपती, पृ. 525) अशा शब्दांत शाहू चरित्रकार धनंजय कीर यांनी या दुःखद प्रसंगी महाराणींनी दाखविलेल्या धैर्याचे कौतुक केले आहे.

छत्रपती राजाराम महाराजांच्या 26 व्या वाढदिवसप्रसंगी राजमाता श्री लक्ष्मीबाई आईसाहेब महाराज यांच्या हस्ते श्री शाहू वैदिक विद्यालय सुरू करण्यात आले. रविवार बुरुजाजवळील इमारतीत सुरू केलेल्या या शाहू वैदिक विद्यालयाचे अनावरण महाराणी लक्ष्मीबाईंच्या हस्ते करण्यात आले. श्री शिवाजी वैदिक विद्यालय छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केले होते. त्याचा उपयोग समाजाला चांगला होता. पण परगावहून धार्मिक विधींचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असत. त्यांची सोय करण्यासाठी नवीन विद्यालय उघडण्यात आले.

‘श्री आईसाहेब महाराजांनी आपल्या सद्गुणी पुत्राकडून या संस्थेला कायमची आठ हजार रुपयांची उदार देणगी सुरुवातीपासूनच देवविली, याबद्दल उभयता माता-पुत्रांची ही संस्था कायमची ऋणी आहे. त्याचप्रमाणे हल्ली विद्यालय ज्या इमारतीत आहे, ती इमारतही विद्यालयासाठी बक्षीस देण्यात आली,” असा उल्लेख ‘राजर्षी शाहू वैदिक विद्यालय कोल्हापूर’ या संस्थेच्या प्रथम वार्षिक अहवालात कृतज्ञतापूर्वक केला आहे. (शाहू वैदिक विद्यालय, प्रथम वार्षिक अहवाल 1922-23, पृ 5, 6)

आईसाहेब महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांच्या योजना व त्यांनी घालून दिलेली तत्त्वे त्यांच्या पश्चात तंतोतंत पाळल्याचे व अनेक गोष्टींमध्ये धीरोदात्तपणे खंबीर राहून महाराजांची तत्त्वप्रणाली जोपासल्याचे दिसून येते. राजाराम महाराजांचा राज्याभिषेक क्षात्रजगद्गुरूंच्या हस्ते करवून घेतला, ही गोष्टही महत्त्वाची आहे.

पुढील काळात कोल्हापूर दरबारतर्फे गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी दरसाल अकरा हजार रुपयांच्या शिष्यवृत्त्या ठेवण्यात आल्या. राजाराम कॉलेजमधील विद्यार्थिनींना व अस्पृश्य विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची सोय केली. मुलींच्या शिक्षणाची वाढ व्हावी म्हणून ‘श्री महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल’ सुरू केले. त्यामुळे महिलावर्गात शिक्षणाची अभिरुची निर्माण होण्यास चांगलीच मदत झाली व त्या प्रमाणात इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संस्थेत वाढ झाल्याचे आढळून आले. (छत्रपती राजाराम चरित्र, पृ. 43.)

12 मार्च 1945 रोजी आईसाहेब महाराज यांचे निधन झाले. ‘साप्ताहिक प्रजा’मधून त्यांना पुढील शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात आली. – “आईसाहेब महाराज यांचा कोल्हापूरची महाराणी व राजमाता म्हणून 54 वर्षांहून अधिक संबंध आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक सुधारणांच्या कामात त्या सहभागी होत्या. धार्मिक विधी मराठा पुरोहितांकडून करवून घ्यावेत ही विचारसरणी अमलात आणण्यासाठी त्यांनी हातभार लावला. सामाजिक सुधारणेला व जातिभेद निर्मूलनाला त्यांचा किंचितही विरोध नव्हता. छत्रपतींच्या वाड्यातील पाकशाळेपर्यंत स्पृश्यांप्रमाणेच अस्पृश्यांनाही निःसंकोचपणे वावरता येत असे. अस्पृश्यतेची भावना त्यांच्या मनात कधीही शिवली नाही. सामाजिक सुधारणेला एखाद्या व्यक्तीचाच नव्हे, तर संपूर्ण राजघराण्याचा सक्रिय पाठिंबा असल्याचे हे उदाहरण आहे.” (साप्ताहिक प्रजा 13 मार्च 1945)

‘आद्य शाहू चरित्र’कार अण्णासाहेब लठ्ठे यांनी, छत्रपती शाहू महाराजांचे चरित्रात महाराणी लक्ष्मीबाईंच्या कार्याची नोंद पुढील शब्दांत घेतली आहे. हे चरित्र त्यांनी महाराणी लक्ष्मीबाईंना अर्पण केले आहे –

“कै. महाराजांच्या पत्नी या नात्याने या पुस्तकात वर्णिलेल्या लोकोपयोगी कामातील बराचसा भाग आपला आहे. विशेषतः पतिनिधनोत्तर त्या कामाची जबाबदारी आपले सपुत्र श्री राजाराम छत्रपती महाराज यांच्या बरोबरच आपणावर आली. धैर्याने, निश्चयाने आणि करारीपणाने आतापर्यंत आपण आपल्या पतीच्या आवडत्या कार्याचे निशाण हाती धरिले आहे, आणि यावरून कै. महाराजांचे, कोल्हापूरच्या राज्याचे वैभव वाढविण्याचे आणि समाजोद्धाराचे कार्य आपण अधिकाधिक यशस्वी कराल, अशी सर्वांप्रमाणेच मला उमेद वाटत आहे. (शाहू महाराज यांचे चरित्र-अपर्ण पत्रिका)

राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कार्याचे निशाण महाराणी लक्ष्मीबाईंनी जीवनभर आपल्या हाती धरले. कोल्हापूरच्या मध्यभागी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनसमोर असलेला आईसाहेब महाराजांचा पुतळा त्यांच्या कार्याची साक्ष आजही देत आहे.

- करवीर , कोल्हापूर