धूळपाटी/भारतातील लोक
[१]मानव शास्त्रीय सर्वेक्षणाचा भारतातील लोक (People of India- PoI) हा प्रकल्प कुमार सुरेश सिंह या एका आगळ्या-वेगळ्या प्रशासकाच्या कल्पकतेचे फळ होता. छोटा नागपूरच्या आदिवासींचा नेता बिरसा मुंडा याच्यावर पीएचडी प्रबंध केल्यानंतर कुमार सुरेश सिंह याने भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला होता. या सेवेमध्ये असताना मानवशास्त्रीय सर्वेक्षणाचा महानिदेशक म्हणून त्याची नियुक्ती केली गेली. त्या आधी मानवशास्त्रीय सर्वेक्षण प्राधान्याने आदिवासी समाजांवर काम करत असे. भारताचे लोक या प्रकल्पात एक वेगळ्या धर्तीचे विशिष्ट मुलुखाशी परिचित असलेल्या अभ्यासकांनी थोड्या अवधीत पाहणी करण्याचे तंत्र वापरले गेले. प्रथमच या कार्यक्रमात भारतातील सर्व समाजांचा अभ्यास हाती घेतला. या अभ्यासात भारताच्या संविधानात विशेष तरतुदी केल्या केलेल्या अनुसूचित जाती आणि जमाती, मागासलेले वर्ग आणि भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्य यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले. तसेच कोणत्याही समाजाच्या अंतर्गत आणि इतर घटकांशी संपर्क साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषांचा आणि लिपींचा अभ्यास केला. पर्यावरण आणि संसाधनांच्या वापराबद्दलची जाणीव, स्त्री पुरुष संबंध, समाजातील बदलांचा आणि विकास कार्यक्रमांचा प्रभाव, बाजारहाट आणि तंत्रज्ञान या सर्व विषयांबद्दल सर्व समाजांकडून माहिती संकलित करण्यात आली. मानवशास्त्रात पूर्वी संकलित केलेल्या माहितीचा व्यवस्थित उपयोग करून घेण्यात आला तरी या प्रकल्पाचा भर परिवर्तनावर होता. सर्व समाजांची संक्षिप्त मानवशास्त्रीय वर्णने, अखिल भारतीय समाजात जे बदल घडत आहेत आणि ज्या विकास प्रक्रिया चालू आहे त्यांचा या समाजांवरील प्रभाव आणि वेगवेगळ्या समाजांतील परस्परसंबंध यांवर भर देणारी सर्व समाजांची संक्षिप्त मानवशास्त्रीय वर्णने तयार करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते.
ज्यांचा अभ्यास करावयाचा त्या समाजांच्या सीमारेषा निश्चित करणे हे पहिले आव्हान होते. भारतात जवळपास ४०,००० अंतर्विवाही जाती - पोटजाती असल्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करणे व्यवहार्य नव्हते. तेव्हा ज्यांचा अभ्यास हातात घ्यावयाचा ते समाज म्हणजे संस्कृती आणि उपजीविकेच्या पद्धती बहुतांश एकसारख्या एक असलेल्या जाती-पोटजातींचे समुच्चय अशी व्याख्या ठरवण्यात आली. असे २७५३ समाज निश्चित केले गेले. यांच्यातील अनेक समाज एकाहून जास्त राज्यांच्यात पसरलेले होते. प्रत्येक राज्यासाठी वेगळे माहिती संकलन करावयाचे असे ठरवल्याने एकूण ४६९४ लेख तयार केले. या लेखांत समाजातील बहुतांश व्यक्ती व्यक्त करतात अशा ७७६ गुणवैशिष्ट्यांबद्दलची माहिती समाविष्ट केली गेली. काही उदाहरणे घ्यायची झाले तर: सध्याच्या वसतिस्थानांत केव्हा हलले, मुख्यतः कारागीर, महिला गोंदवून घेतात, माशांसहित शाकाहार, पान खातात, वैश्य वर्ण, लग्ने गावाबाहेर होतात, उभयतांच्या संमतीने लग्न होते, विवाहित बायका पायाच्या बोटांवर अंगठी घालतात, मातृस्थानी राहतात, सर्वात धाकटा पुत्र वारस ठरतो, संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट होत आहे, शवांचे दफन केले जाते, साधनसंपत्ती कुळीच्या ताब्यात असते, बागायत व्यवसाय चालू आहे, परंपरेने पक्षी पशु सापळ्यात पकडतात, नव्याने रेशीम व्यवसाय सुरू केला आहे, परंपरेने गवंडी काम करतात, परंपरेने चटया विणतात, दागिने बनवण्याचा व्यवसाय चालू आहे, टोपल्या दुरड्या विणण्यातून स्वयंरोजगार, व्यापार-उदीम - खानावळी, सावकारी, तारणावर कर्ज देणे, सैनिक, योद्धे, बाजाराशी थेट संबंध, कारखान्यात अधिकाधिक प्रमाणात मजुरी करतात, जातीत मुखिया असतो, जात पंचायत शिक्षा सांगू शकते, सर्वजण बौद्ध धर्माचे, उत्सवांना राजकीय महत्त्व, पाश्चात्य संगीत, आंतरजातीय विवाह होऊ शकतात, शिक्षणात मुलांना प्राधान्य, पैसे कमावण्यासाठी मुली शिक्षण सोडतात, दुपारच्या जेवणाच्या योजनेचा लाभ उठवतात, ओढ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबन, लाकडाचा भुसा इंधनासाठी वापरतात, ऑस्ट्रो-एशियाटिक भाषा बोलतात, तिबेटो-बर्मन भाषा बोलतात, वायव्य भारतातील इंडो-आर्यन वंशाचे आहेत. हा ७७६ गुणवैशिष्ट्यांचा हो/नाही डेटाबेस दिल्लीतील राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्रात संगणकीकृत केला होता.
- ^ Singh, KS (1992). People of India. Anthropological Survey of India (English भाषेत). 2. Calcutta: Anthropological Survey of India. ISBN 9788185579092.CS1 maint: unrecognized language (link)