धूळपाटी/इडुक्कीचे चहाचे मळे
आपल्या आसमंतातील नैसर्गिक संसाधनांचा वापर अशक्य झाल्यामुळे परिविस्थापित झालेले अनेक दलित आणि आदिवासी आज पश्चिम घाटावरील चहा व कॉफीच्या मळ्यांत मजुरी काम करतात. केरळच्या वायनाड, कोळीकोड व इडुक्की जिल्ह्यांच्यात ऑगस्ट- सप्टेंबर २०१९ मध्ये आणि इडुक्की जिल्ह्यातील पेट्टीमुडी येथे ऑगस्ट २०२० मधल्या भूस्खलनांत अशा अनेक मजुरांचा बळी पडला. या इडुक्की जिल्ह्यातील टाटा टी या ब्रिटिश चहा मळेवाल्यांचा मुख्य अड्डा असलेल्या मूनार या थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या खास श्रीमंतांच्या हाय रेंज क्लबच्या भिंती शिकार केलेल्या वाघ, बिबटे, हत्ती, गौर, सांबर व नीलगिरीतल्या रानबोकडाच्या मुंडक्यानी सजवलेल्या आहेत. एवढेच नाही तर टेबलांचे पाय सुद्धा हत्तीच्या पायाच्या खालच्या तुकड्यांनी बनवलेले आहेत.
तमिलनाडु आणि केरळाच्या सरहद्दीवरील इडुक्की हा मूळचा मुतुवनचा आदिवासींचा मुलुख होता. २५०० वर्षांपूर्वीच्या संगम कालापासून तो तमिलनाडु आणि केरळातील वेगवेगळ्या राजवटींच्या कब्जात आला. इंग्रजांच्या आमदानीत १८७० साली त्यांचा मद्रास मधील प्रतिनिधी जॉन डेनियल मन्रोने २२७ चौरस कि.मी. च्या कन्नन देवन डोंगरावर भाडे पट्टा मिळवला व १८७८ मध्ये कवडी मोलाने त्याचे रूपांतर मालकीमध्ये केले. मग त्याने पद्धतशीर रीत्या इंग्रज मळे वाल्यांना बोलावून त्यातील ८००० हेक्टर जमिनीवर मळे लावले. इंग्रजांच्या काळात वनविभागाची धोरणे आखण्यात या मळेवाल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[१]
- ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.