दोलामुद्रित
दोलामुद्रित ही संज्ञा मराठी भाषेत Incunable ह्या संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. दोलामुद्रित म्हणजे मुद्रणाच्या प्रारंभीच्या काळात प्रकाशित झालेला ग्रंथ. ग्रंथमुद्रणाचा प्रारंभ जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात झालेला असल्याने दोलामुद्रिताची कालमर्यादाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. मराठी मुद्रित पुस्तकांच्या संदर्भात ही मर्यादा १८६७अखेरपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे[१]. दोलामुद्रित ह्याप्रमाणे आद्यमुद्रित अशी संज्ञाही वापरण्यात आली आहे.
व्युत्पत्ती
दोलामुद्रित ही संज्ञा ज्या incunable ह्या इंग्लिश संज्ञेवरून घेण्यात आली आहे तिचे लॅटिन मूळ cunae असे असून त्याचा अर्थ पाळणा असा आहे. संस्कृत भाषेत पाळण्याला दोला असे म्हणतात त्यावरून पाळण्यातले मुद्रित ह्या अर्थी मराठीत दोलामुद्रित ही संज्ञा वापरण्यात आली आहे[२].
कालमर्यादा
युरोपात मुद्रणकलेचा आरंभ भारताच्या तुलनेत आधी झाला असल्याने युरोपातील दोलामुद्राची कालमर्यादा १५व्या शतकापर्यंत मानण्यात येते. मराठीत दोलामुद्रिताची कालमर्यादा प्रारंभी प्रा. अ. का. प्रियोळकर ह्यांनी १८५० ही ठरवली होती[१]. मात्र विचारांती १८६७ च्या अखेरपर्यंत अशी मर्यादा नंतर प्रियोळकरांनीच निश्चित केली आहे.
१८६७ ही मराठी दोलामुद्रितांची कालमर्यादा मानण्याचे कारण
दोलामुद्रितांची कालमर्यादा १८६७पर्यंत ठरवण्याचे कारण असे की १८६७साली देशी प्रकाशनांच्या नोंदणीचा २५वा अधिनियम (ॲक्ट) संमत करण्यात आला. ह्या अधिनियमाप्रमाणे प्रत्येक प्रकाशनाच्या ३ प्रती मुद्रित झाल्याबरोबर एका महिन्याच्या आत सरकारकडे पाठवाव्या असे ठरवण्यात आले होते[३]. १८६३मध्ये दि रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन ॲण्ड आयर्लंड ह्या संस्थेंच्या अधिकाऱ्याने सेक्रेटरी ऑफ द स्टेट फॉर इंडिया ह्यांना पत्र लिहून भारतातील संस्कृत किंवा इतर देशी भाषांत प्रकाशित होणाऱ्या ग्रंथांची माहिती युरोपीय अभ्यासकांना व्हावी ह्यासाठी आजवर प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एक शक्य तितकी परिपूर्ण सूची करावी असे सुचवले होते. त्याचा परिणाम म्हणून १८६७चा अधिनियम करण्यात आला असावा[४].
संदर्भ
- ^ a b प्रियोळकर १९४९, पान. (१३).
- ^ प्रियोळकर १९४९, पान. (१२).
- ^ प्रियोळकर १९४९, पान. (१४).
- ^ प्रियोळकर १९४९, पान. (१५).
संदर्भसूची
- प्रियोळकर, अनंत काकबा (१९४९), "प्रस्तावना", मराठी दोलामुद्रितें : अर्थात् मुं. म. ग्रंथसंग्रहालयातील इ. स. १८६७पर्यंतच्या मराठी मुद्रित ग्रंथांची वर्णात्मक नामावलि, मुंबई: श्री. शं. वा. कुलकर्णी, महाराष्ट्र ग्रंथ भांडार, p. (१) ते (२८)