देवयानी (पौराणिक व्यक्तिरेखा)
हिंदू पुराणांनुसार देवयानी ही असुरांचा पुरोहित शुक्राचार्य व जयंती यांची कन्या होती. आयुवंशातील राजा ययाति याची ती पत्नी होती. महाभारतात हिने बृहस्पतीचा पुत्र कच याच्यावर केलेल्या असफल प्रेमाची व त्यातून पुढे हिला ययातीशी विवाह करणे भाग पडल्याची कथा वर्णिली आहे. ययातीपासून हिला यदु व तुर्वसु या नावांचे दोन पुत्र झाले.
जन्म
पौराणिक साहित्यमते पुरंदर इंद्राची कन्या जयंती ही हिची माता होती. शुक्राचार्याची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने जयंतीला त्याच्याकडे पाठविले. त्यास प्रसन्न करून दहा वर्षेवृपर्यंत ती त्याच्याकडे राहिली. त्यावेळी हिचा जन्म झाला.
कच-देवयानी
संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी देवांचे गुरू बृहस्पतीचा पुत्र कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहिला. त्याच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वावर मोहित होऊन देवयानीने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु गुरूकन्येशी विवाह करणे अयोग्य असल्याचे सांगून कचाने हिचा विवाह प्रस्ताव झिडकारला. क्रुद्ध होऊन कचाची विद्या निष्फळ होण्याचा शाप हिने त्याला दिला. कचानेही कोणीहि ऋषिकुमार हिच्याशी विवाह करणार नाही असा प्रतिशाप दिला. त्यामुळे देवयानीला उत्तरकालात क्षत्रिय कुळातील ययाति राजाशी विवाह करणे भाग पडले. (महाभारत. आदीपर्व. ७३.१२)