देयता
व्यवसायाला किंवा व्यक्तीला इतरांना द्यावी लागणारी सर्व रक्कम 'देयता' (इंग्लिश : Liability) म्हणून ओळखली जाते. घेतलेले कर्ज किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केले फायदे याच्या मोबदल्यात रक्कम देण्याची जबाबदारी म्हणजे देयता होय.
प्रकार
१) स्थिर देयता (इंग्लिश : Fixed or Long Term Liability) - दीर्घकालीन सुरक्षित कर्जाला स्थिर देयता असे म्हणतात. हा व्यवसायाचा प्रमुख निधीस्त्रोत आहे.
उदा. बँकेचे दीर्घकालीन कर्ज, काही वर्षांनी परतफेड करण्याचे कर्जरोखे , प्रतिभूती
२) चल देयता (इंग्लिश : Current Liability) - एक वर्षाच्या कालवधीत देय असणाऱ्या रकमेला चल देयता असे म्हणतात.
उदा. उधारीवर घेतलेला माल, कर देयता, बँकेतून घेतलेली तात्पुरती उचल, रोख पत खात्याची नावे रक्कम.
३) संभाव्य देयता (इंग्लिश : Contingent Liability ) - देय असणारी अशी जबाबदारी जिची देय रक्कम किंवा देण्याची जबाबदारी अजून संभ्रमात आहे / नक्की झालेली नाही.
उदा. कंपनीवर काही नुकसान भरपाईचा खटला चालू आहे, बँकेच्या पतपत्र व्यवहारातील देणी, बँक हमी संदर्भातील देणे
द्विनोंदी लेखापालनातील वागणूक
देय खात्यांच्या बाबतीत द्विनोंदी लेखापद्धतीत खालील नियम पाळला जातो.संपत्ती खात्याच्या बाबतीत असणारे नियम इथेही उलट पद्धतीने लागू होतात
देणे देऊन टाकले की देयतेचे खाते नावे केले जाते (इंग्लिश : Debit the receiver )
देयतेची जबाबदारी आली की देयतेचे खाते जमा केले जाते (इंग्लिश : Credit the giver )
उदाहरण
१) अबक कंपनीने बँकेकडून रुपये १,००,०००/-चे कर्ज घेऊन यंत्र सामुग्री विकत घेतली.
या व्यवहारात बँकेला रुपये १,००,०००/- देण्याची जबाबदारी वाढली म्हणून बँकेचे खाते जमा केले जाईल. बँक धनको बनेल. तसेच यंत्रसामुग्री ही संपत्ती व्यवसायात आली म्हणून यांत्रासामुग्रीचे खाते नावे होईल
यंत्रसामुग्री खाते रुपये १,००,०००/- नावे बँक खाते रुपये १,००,०००/- जमा
२) अचानक गरज पडली म्हणून श्री क्षयज्ञ यांच्या कडून रुपये ५,०००/- उसने घेतले
श्री क्षयज्ञ यांना रुपये ५,०००/-चे देणे देण्याची जबाबदारी वाढली म्हणून त्यांचे खाते जमा होईल रोख रकमेत रुपये ५,०००/-ची वाढ झाली म्हणून रोख संपत्तीचे खाते नावे होईल
रोख खाते रुपये ५,०००/- नावे श्री क्षयज्ञ रुपये ५,०००/- जमा
साचा:वाणिज्य