दुर्गवीर
इतिहास हा खर तर सर्वात जास्त उपेक्षित विषय पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भुगोलाशी निगडित आहे. येथील दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. डोंगरी किल्ले, वनदुर्ग, भुईकोट, पाणकोट असे विविध प्रकारचे किल्ले असलेला अवघा महाराष्ट्र हाच किल्ल्यांचे एक संग्रहालय आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांचा संबंध छत्रपति शिवाजी महाराजांशी जोडला जातो. शिवकाळात ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ हा विचार प्रकर्षाने जाणवतो. सातवाहन, राष्टकूट, शिलाहार, बहमनी, मोगल आणि पोर्तुगीज यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. पण शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्गरचनेत आढळतो. म्हणूनच ब्रिटिश पर्यटक डग्लस म्हणतो, “शिवाजीचे वास्तव्य डोंगरी मुलुखातच होते व त्याचे सामर्थ्य डोंगरी प्रदेशाच्या भरवशावरच होते. तो खराखुरा दुर्गस्वामी होता. त्याचा जन्म दुर्गात झाला. त्याला जे वैभव प्राप्त झाले ते दुर्गांच्यामुळे आणि त्याच्या दुर्गाना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्याच्याच प्रयत्नाने झाले. त्याचे दुर्ग म्हणजे भारतातील त्याच्या शत्रूंना धाक होता. त्याच्या राष्ट्राची ती संवर्धनभूमी होती. त्याच्या विजयाचा तो पाया होता. त्याच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्याचे निवासस्थान व तेच त्याच्या आनंदाचे निधान होते. कित्येक दुर्ग त्याने स्वतः बांधले आणि जे आधी बांधलेले होते, त्यासर्वांना त्याने बळकटी आणली.” महाराष्ट्रातील किल्ले, देवळे, लेणी, ऐतिहासिक स्मारके यांची संख्या शेकड्यांच्या घरात आहे. लहानपणापासून या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना शिवरायांच्या कथा ऐकत आपण मोठे होतो.
डोंगर, किल्ले, नद्या, जंगल हे कधी आपल्याला वेगळे वाटतच नाही. सगळीकडे आपल्या आठवणी विखुरलेल्या. आई वडिलांसोबत कधीतरी दूर जंगलात,किल्ल्यांवर किंवा तीर्थक्षेत्री केलेली भटकंती (ज्याला आज ट्रेकिंग म्हणतात) पिढयानपिढया आपल्यात रुजलेले आहे. अशा या पर्वतरांगांमध्ये फिरता फिरता अनेक लोक आपल्याला भेटतात. अनेक गोष्टी उलगडत जातात. किल्ल्यांवर जाणाऱ्यांच्या लिखाणात अन् बोलण्यात हे किल्ले पुन्हा पूर्वीसारखे बांधायला हवेत, असा सूर अनेकदा उमटतो. वाचकांना अन् श्रोत्यांनाही तसंच वाटू लागते; पण आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळले, की हा विषयही डोळ्यांआड होतो. वस्तुस्थितीत काहीच फरक पडत नाही.
याच वस्तुस्थितीला छेद देत काही दुर्गप्रेमी एकत्र येऊन दुर्गांच्या संवर्धन-संरक्षणासाठी “दुर्गवीर प्रतिष्ठान” या दुर्गप्रेमी संस्थेची स्थापना केली. आपल्या दैनंदिन जीवेनातील व्याप संभाळून सोबतच या दुर्गसांपदेचे संरक्षण करण्याचा वसा दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सर्व तरुणांनी घेतला आहे. परंतु महाराष्ट्रातील ३५०हून आधिक दुर्गसांपद संभाळने हे एकटया-दुकटया माणसाच्या आवाक्यातील गोष्ट नाही. या साठी गरज आहे ती प्रत्येक मराठी माणसाच्या सहकार्याची. त्यांच्या सर्वांच्या श्रमातूनच ही गतवैभवाची साक्षीदार असणारी तीर्थक्षेत्रे भविष्यात राष्ट्रतेजाची प्रेरणास्तोत्रे बनतील.
"दुर्गवीर प्रतिष्ठान" २००८ पासूनच्या कामाचा आढावा :-
१) १ डिसेंबर २००८ :- सर्वप्रथम श्रमदान मोहीम किल्ले केळवे कष्टम- पालघर, माहीम किल्ला, जंजिरा तसेच किल्ले वसई माहीम संस्थेसोबत सहभाग. २) ०६ फेब्रुवारी २००९ :- माहुली गडावरील श्रमदानातून किल्ल्यांच्या दर्शनी दरवाज्याचे स्वच्छतेचे काम, इतरस्त विखुरलेल्या मूर्ती योग्य जागी मांडणे. ३) २४ ऑगस्ट २००९ :- मुंबई सांताक्रुझ परिसरात विविध ठिकाणी किल्ल्यासंबधी लघुपटाद्वारे माहितीपटाचे आयोजन. ४) २०१० :- 'कल्पविहार' मुंबई या संस्थेतर्फे आयोजित कमला नेहरू शाळेतील अंध मुलांसाठी असलेल्या 'किल्ले शिवनेरी दर्शन' मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभाग. ५) १ फेब्रुवारी २०१० :- मानगडवरील श्रमदानास सुरुवात ६) १० एप्रिल २०१० :- * प्रवेशद्वारापासून पायऱ्यांचा मार्ग काटेरी झुडपांपासून मुक्त केला. * गडावरील गवत तसेच काटेरी झुडपाचे उच्चाटन केले. * पायऱ्यांची डागडुजी केली. ७) १ मे २०१० :- किल्ले सरसगडवर महाराष्ट्रदिन साजरा करताना ५० दुर्गप्रेमींसोबत स्वच्छता मोहीम, तसेच प्रथमच दसरा उत्सव साजरा केला. ८) २६ जानेवारी २०११ :- निजामपूर येथे भव्य मानगड इतिहास फलक बसविला. ९) १ मे २०११ :- महाराष्ट्र दिन साजरा करून स्थानिकांनी निमंत्रित करून कायमस्वरूपी ध्वज स्थापना केला. १०) १९ जून २०११ :- मानगडच्या घेऱ्यातील आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ११) ०६ ऑगस्ट २०११ :- * गडावरील पाण्याच्या टाक्यातील गाळ काढून टाक्यांची साफसफाई केली. * निजामपूर- मानगड वाटेवर कायमस्वरूपी दिशादर्शक फलक बसविले. * मुंबई- गोवा हाय- वे मार्गावर मानगड- खुर्डूगड इतिहास फलक बसविला. १२) ०५ फेब्रुवारी २०१२ :- * सुरगडावरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून सुरगड श्रमदानाचा शुभारंभ. * सुरगडच्या पायवाटेची श्रमदानातून डागडुजी. * सुरगडच्या पायवाटेवर दिशादर्शक निशाण दर्शविणे. १३) २६ फेब्रुवारी २०१२ :- सुरगड श्रमदान मोहीम पूर्णत्वास. १४) १८ मार्च २०१२ :- पद्मदुर्ग येथे गडदर्शन व श्रमदान. १५) २३ मार्च २०१२ :- कोथळीगड (पेठ) कसारा येथे तोरण बांधून गुडीपाडवा साजरा. १६) २५ मार्च २०१२ :- अवचितगड येथे श्रमदानास सुरुवात. १७) ८ एप्रिल २०१२ :- अवचित गडाचे ४ दरवाजे, पाण्याचे टाके यांवर श्रमदान. १८) १ मे २०१२ :- अवचित गडावर महाराष्ट्र दिन साजरा व श्रमदान. १९) ८ जुलै २०१२ :- अवचित गडावर श्रमदान मोहीम जारी. २०) २९ जुलै २०१२ :- सुरगडावर श्रमदान मोहीम. २१) १९ ऑगस्ट २०१२:- मानगड श्रमदान मोहीम, दिशादर्शक फलक बसविले. २२) ९ सप्टेंबर २०१२ सुरगड श्रमदान मोहीम. पाण्याचे टाके पूर्णपणे साफ केले. २३) १९ - ३० सप्टेंबर २०१२ गणेशोत्सव काळात जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी खांब/घेरासुरवाडी इथे जनजागृती अभियान. दुर्गसंवर्धनविषयी लघुपट दाखवला. तसेच त्यानंतरच्या दिवसांमध्ये मुंबईत बदलापूर, दादर, ठाणे(पूर्व), घाटकोपर इ. ठिकाणी गणेशोत्सव मंडळांबरोबर जनजागृती मोहीम राबवली. २४)
२४ ऑक्टोबर २०१२ किल्ले घोसाळगड इथे मोठ्या प्रमाणावर दसरा सोहळा साजरा. सकाळी श्रमदान मोहीम राबवून मग पारंपरिक वेशभूषा करून शस्त्र पूजा. गावकऱ्यांचा मोठा सहभाग. २५)
२६-२८ ऑक्टोबर २०१२ नेसरी/पावनखिंड/कोल्हापूर दर्शन. २६)
०८ नोव्हेंबर २०१२ मानगड श्रमदान मोहीम. न्हाणवा. पायवाट. २७)
११ नोव्हेंबर २०१२ मानगड श्रमदान मोहीम. फलक. वाट.
२८)
०२ डिसेंबर २०१२ सुरगड श्रमदान मोहीम. न्हाणवा. २९)
२३ डिसेंबर २०१२ सुरगड श्रमदान मोहीम. गावापासून गडाकडे जाणाऱ्या वाटेच्या सुरुवातीच्या भागाचे काम केले. वाट झाडे-झुडुपे आणि मोठे दगड काहून दोन माणसे जातील इतपत रुंद केली. मातीत दगड वापरून पायऱ्या बनवल्या. खांब गावापासून घेरासुरवाडी पर्यंत दिशादर्शक फलक बसवले. ३०) १३ जानेवारी २०१३ सुरगड श्रमदान मोहीम. पायवाटेचे काम हाती घेतले. पायवाटेच्या दोन्ही बाजूना दगड रचून पायवाटेला व्यवस्थित आकार दिला. फलकाचे काम केले. ३१)
२६ जानेवारी २०१३ विजयदुर्ग येथी ३ रे गिरिसाहित्य सम्मेलनात 'दुर्गसंवर्धन चळवळ' विषयक चर्चासत्रात भाग.
दुर्गवीर प्रतिष्ठान फक्त गडदर्शन, श्रमदान करून थांबत नाही तर प्रत्येक गडांच्या पायथ्याशी असलेल्या स्थानिक लोकांसोबत संवाद साधून त्यांनाही या शिवकार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या काही वर्षात मानगड तसेच रायगड संरक्षण प्रभावळीतील ९ किल्ले श्रमदान माध्यमातून योग्य डागडुजी करून त्या गडांना पूर्वीची झळाळी प्राप्त करून देण्याचा दुर्गवीर प्रतिष्ठानच्या शिलेदारांचा मानस आहे.
दुर्गवीर प्रतिष्ठान गडकोट संवर्धनासाठी राबवणारे उपक्रम:-
१. गडकोटांच्या प्रवेशद्वारावर इतिहास, गडांची माहिती, नकाशा, मार्गदर्शक सूचना या संबधी फलक लावणे . २. गडकोटावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. उदा. दसरा, नववर्ष, गुडीपाडवा इत्यादी धार्मिक सणांच्या आयोजनातून जनजागृती करणे. ३. समाजातील सर्व स्थरातील लोकांसाठी किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन व व्याख्यानातून गडकोट संवर्धनाबाबत जनजागृती करणे. ४. ऐतिहासिक वास्तू, पाण्याचे टाके साफसफाई करणे किंवा डागडुजी करणे. ५. निसर्ग संतुलनासाठी वृक्षारोपण करणे. ६. किल्ल्यांच्या पायथ्याच्या गवतात मोफत वैद्यकीय शिबीर राबविणे व वरील सर्व गावकऱ्यांची मदत घेणे.
अशाप्रकारे अवघ्या ४ सभासदांना सोबत घेऊन संतोष हसुरकर यांनी सुरू केलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे आज ४० पेक्षाही जास्त सभासद आहेत. काळानुसार दुर्लक्षिलेले गड किल्ले श्रमदान व दुर्गदर्शनच्या माध्यमातून जतन करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. सध्या रायगड प्रभावळीतील सुरगड, अवचितगड, मानगड, बिरवाडी, तळागड, घोसाळगड खुर्डूगड (विश्रामगड) या सर्व किल्ल्यांवर श्रमदान चालू ठेवण्याचा दुर्गवीर प्रतिष्ठानाचा मानस आहे.
!! जय शिवराय !!
दुर्गवीर म्हणले की श्रमदान असा एकाच विचार सर्वांच्या मनात येतो. पण हे श्रमदान म्हणजे काय? कोण करतात हे श्रमदान? जे श्रमदान करतात त्यांना मोबदला काय मिळतो? श्रमदानाशिवाय इतर काही कामे करतात की नाही हे दुर्गवीर/दुर्गवीरांगना? कधी करतात हे श्रमदान? यासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींचा ताळमेळ कसा बसविला जातो? हे आणि असे अनेक प्रश्न उभे राहतात याची उत्तरे हवी असतील दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणजे काय हे समजून घ्या!!!
दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणजे ही म्हटली तर संस्था म्हणले तर कुटुंब ! इथे येणारा प्रत्येकजण शिवरायांवरील प्रेमाखातर येत असतो. त्याच्या मनात कुठेतरी विचार असतो शिवरायांनी निर्माण केलेल्या वाढविलेल्या या स्वराज्याचे योग्य संगोपन आपण करायचे. दुर्गवीर हा परिवार सध्या खूप मोठा झालाय संतोष हसुरकर यांनी काही मोजक्या मावळ्यांना घेऊन उभारलेल्या ह्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. गरज आहे ती रोज हा वृक्ष जोपासायची. दुर्गवीर सर्व वीर/वीरांगना ह्या काम, घर सांभाळून ह्या शिवकार्यात हातभार लावतात. प्रत्येक दुर्गवीर आतुरतेने शनिवारची वाट पाहत असतो. कधी शनिवार येतो आम्ही मोहिमेला जातो.
श्रमदान म्हणजे काय? तर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता जे श्रम केले जाते ते श्रमदान! दुर्गवीरचे वीर/वीरांगना हे श्रमदान करतात. यासाठी येणारा खर्च हा कोणी दुसरा देत नाही तर दुर्गवीरचे वीर/वीरांगना स्वतःच्या खिशातून करतात! काही दानशूर व्यक्ती असतील आणि त्यांची श्रमदान करायची मानसिक इच्छा असेल पण शरीर किंवा परिस्थिती साथ देत नसेल तर अश्या व्यक्ती काही आर्थिक मदत संस्थेस करतात. यातूनच श्रमदानासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेतल्या जातात. आज मितीपर्यंत संस्थेत कुदळ, फावडे, चेन पुली, घमेली अशी अनेक अवजारे याच प्रकारच्या दानातून घेतल्या आहेत.
पण एवढे सर्व किल्ले सांभाळायचे तर नक्कीच या वस्तू पुरेश्या नाहीत. म्हणूनच गरज आहे तुमच्या सहकार्याची तुम्ही सुद्धा आम्हाला वस्तू किंवा निधीस्वरूपातमदत करू शकतां. आज गडाच्या प्रत्येक वाटेवर फलक लावायची गरज आहे त्या लोखंडी बोर्डासाठी लागणारा खर्च, पावसाळ्यात टाक्यांचा उपसा करण्यासाठी मोटार पंप, टाक्यातील मोठया शिळा (दगड) हलविण्यासाठी चेन पुली, इत्यादि… आज दुर्गवीर प्रतिष्ठान श्रमदानासोबत गडाच्या घेऱ्यातील आदिवासींना मदत करण्याचेही कार्य करते. गडाच्या घेऱ्यातील मुलांना इतर संस्थाच्या माध्यमातून शालेय वस्तू पुरविणे, विविध शाळांना लेझीम, शालेपयोगी वस्तू पुरविणे यासारखी कार्य दुर्गवीर प्रतिष्ठान ने आत्तापर्यंत पूर्णत्वास नेली आहेत. यासारखी अनेक कार्ये यापुढे पूर्ण करण्याचा दुर्गवीरचा मानस आहे तुम्हाला प्रत्येक श्रमदान मोहिमेस उपस्थित राहता येत नसेल इतर माध्यमातून आम्हाला सहकार्य करू शकता.
सहकार्यासाठी संपर्क :
दुर्गवीर प्रतिष्ठान
संतोष हसुरकर :- ९८३३४५८१५१
अजित राणे :- ९८२०९४०६३६
नितीन पाटोळे ८६५५८२३७४८
www.durgveer.com