दीपक धर
दीपक धर (Deepak Dhar - जन्म 30 ऑक्टोबर 1951) हे भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ ( theoretical physicist ) आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे येथील भौतिकशास्त्र विभागातील एक प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत. २०२२ मध्ये विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) सांख्यिकीय भौतिकशास्रज्ञ डॉ. दीपक धर यांना घोषित झाला आहे. त्याच्या रूपाने भारताला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.[१] प्रा. धर यांचे संशोधन प्रामुख्याने अनिश्चित प्रक्रियांच्या गणिती प्रारूपांवर आहे. त्यांच्या संशोधनाचा उपयोग शेअर बाजारापासून ते प्रोटीन आणि भूकंपाच्या अनुमानापर्यंत अनेक क्षेत्रांमधील मॉडेलमध्ये केला जातो. [२]भौमितिक रचनांची कार्यप्रणाली (फ्रॅक्ट्रल्स), स्व-संघटित क्लिष्ट रचना, प्राण्यांशी निगडित संख्याशास्रीय समस्या, चुंबक आणि काचेमधील बदलत्या रचनांचा सख्याशास्रीय अभ्यास हे डॉ. धर यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्ये आहे.[३]
जीवनचरित्र
डॉ. दीपक धर य़ांचा जन्म ३० ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे झाला. ते अलाहबाद विद्यापीठातून विज्ञानाचे पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूर मधून १९७२ मध्ये पदव्युत्तर पदवी पुर्ण केली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. मिळवल्यानंतर त्यांनी १९७८ मध्ये भारतात परतल्यावर टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे संशोधनाला सुरुवात केली. त्यांनी १९८४-८५ यादरम्यान पॅरिस विद्यापीठात व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणूनही काम केले.[२]
पुरस्कार आणि सन्मान
- फेलो द वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमी
- १९९१ मध्ये देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पुरस्कार शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित
- आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकशास्त्र केंद्राने त्यांना १९९३ च्या जे. रॉबर्ट श्रिफर पुरस्कारासाठी निवड केली.
- आयएनएसएने २००१ मध्ये धर यांना पुन्हा सत्येंद्रनाथ बोस मेडल देऊन सन्मानित केले
- २०००२ मध्ये द वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे टीडब्ल्युएएस पारितोषिक मिळाले.
- २०२२ मध्ये विज्ञानातील अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक स्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार. नोबेल पुरस्कारा इतकाच प्रतिष्ठेचा हा पुरस्कार दर तीन वर्षांनी दिला जातो. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲण्ड ॲप्लाइड फिजिक्स या संस्थेच्या स्टॅटीस्टीकल कमिशनद्वारे हा पुरस्कार घोषित करण्यात येतो. १९७५ पासून या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून, २०२२ या वर्षासाठी डॉ. धर आणि अमेरिकेतील प्रिंन्सटन विद्यापीठाच्या डॉ.जॉन हॉपफिल्ड यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील भरीव आणि महत्त्वपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.[१]
संदर्भ
- ^ a b "अभिमानास्पद! देशाला मिळाला पहिला बोल्ट्झमन पुरस्कार". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-10 रोजी पाहिले.
- ^ a b "'मूलभूत' संशोधक". Maharashtra Times. 2022-03-10 रोजी पाहिले.
- ^ गोमन्तक, दैनिक. "अभिमानास्पद! भारताला मिळाला पहिला बोल्ट्झमन पुरस्कार". Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक. 2022-03-10 रोजी पाहिले.