Jump to content

दिवेआगर

दिवेआगर
भारतामधील शहर

दिवेआगर समुद्रकिनारा
दिवेआगर is located in महाराष्ट्र
दिवेआगर
दिवेआगर
दिवेआगरचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 18°10′24″N 72°59′30″E / 18.17333°N 72.99167°E / 18.17333; 72.99167

देशभारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा रायगड जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३,८३९
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


दिवेआगर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील एक गाव व पर्यटनस्थळ आहे. दिवेआगर अरबी समुद्रकिनाऱ्यावर अलिबागच्या ७५ किमी दक्षिणेस तर मुंबईच्या १७५ किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली दिवेआगरची लोकसंख्या ३,८३९ इतकी होती.

इतिहास

२० वर्षांपूर्वी या ठिकाणाचे नाव एकदम सर्वदूर झाले. १७ नोव्हेंबर १९९७ रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही वार्ता त्या इवल्याशा गावात वाऱ्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलीस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा मुखवटा व २८० ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर असल्याने सरकारदरबारी जमा करण्याचा प्रश्न नव्हता. ही पेटी मंदिरात ठेवण्यात आली. सापडलेल्या पेटीचे बाबतीत तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले, की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले. हा मुखवटा जिथे ठेवला होता, त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली - “महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने”. दुर्दैवाने हा ठेवा २४ मार्च २०१२ रोजी चोरीला गेला. नंतर आरोपी सापडले. वितळवलेले सोने मिळाले; पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही. गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले. दिवेआगरचा शांत, सुरक्षित सागरकिनारा पर्यटकांना सापडला. रूपनारायण आणि सुंदर नारायण यांच्या सुंदर मूर्तीही प्रकाशाझोतामध्ये आल्या. कोकणातील सर्व विष्णूमंदिरांमध्ये सर्वांत उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची समजली जाते. एका अखंड शिळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. हाही एक प्रकारचा खजिनाच आहे. आवर्जून पाहावी अशी ही मूर्ती आहे. रूपनारायण मंदिराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. रूपनारायण व सुंदर नारायण यांची मंदिरे नव्याने उभारली आहेत.

दिवेआगर हे मुळातच संपन्न गाव आहे. गावातील रस्त्यावर चिऱ्यांच्या दगडाची संरक्षक भिंत, त्यामागे मोठे घर, मागे नारळी, सुपारीची व केळीची वाडी. असे सुंदर गाव शोधून सापडणार नाही. बाप्पा प्रकट झाले आणि हे पर्यटनस्थळ म्हणून उजेडात आले. त्यामुळे पर्यटकांसाठी ‘होम-स्टे’ ही संकल्पना आली. पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत. त्यामुळे दूध-दुभतेही आहे. कमर्शियल हॉटेल्स त्या मानाने कमी आहेत.

रूपनारायण मंदिराच्या आसपास आता रिसॉर्ट्‌स होऊ लागली आहेत. येथील मोदक खूप प्रसिद्ध. इतर कोकणी मसाले, पापड, मिरगुंड, पोह्याचे पापड, कडवे वाल वगैरेही मिळतातच. आपले ‘होस्ट’ आपल्या चहा, नाश्त्याची सोय करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण मिळते. अतिशय रुचकर, गरमागरम जेवण सगळ्यांकडे असते; फक्त आधी सांगावे लागते.


हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगर ही तीन लोकप्रिय पर्यटनस्थळे एकाच क्षेत्राचा भाग मानली जातात.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

येथिल लोकजीवन मासेमारी , पर्यटन व शेती याच्यावर अवलंबून आहे

प्रेक्षणीय स्थळे

जवळपासची गावे

बोर्ली पंचतन,खुजारे, वडवली, भरडखोल, शिस्ते,मेंदडी

संदर्भ

  1. .https://villageinfo.in/
  2. .https://www.census2011.co.in/
  3. .http://tourism.gov.in/
  4. .https://www.incredibleindia.org/
  5. .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. .https://www.mapsofindia.com/

हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगरवरील पुस्तके

  • शिलाहारकालीन नगरी दिवे आगर (निर्मला गोखले)
  • सफर दिवे आगरची, हरिहरेश्वर, श्रीवर्धन परिसराची (प्रा. प्र. के. घाणेकर)
  • साद सागराची : श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर (पराग पिंपळे)