दिवाकर दत्तात्रय गंधे
दिवाकर दत्तात्रय गंधे (जन्म : २६ सप्टेंबर, इ.स. १९३९; - डोंबिवली, १ मार्च २०१९)) हे एक मराठी नाट्यसमीक्षक व चित्रपटविषयक लिखाण करणारे लेखक होते. चित्रांगद या साप्ताहिकात त्यांनी सुमारे दहा वर्षेंपर्यंत नाट्यसमीक्षणे लिहिली. ते रविवार सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग' या पुरवणीत 'स्मृतिपट' नावाचे सदर लिहीत (इ.स. २००५). त्या सदरात एकूण ४७ लेख प्रसिद्ध झाले. त्यानंतर दिवाकर गंधे यांनी स्वरचित्र, चित्रगंध आणि बायोस्कोप नावाची सदरे लिहिली. फक्त साडेतीन वर्षांत दिवाकर गंधे यांच्या चित्रपटविषयक लेखांची संख्या अडीचशेवर पोचली.
दिवाकर गंधे यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते.
शिक्षण आणि लेखन
मुळचे जळगावचे असलेले दिवाकर गंधे यांना शिक्षणासाठी नागपूर, इंदूर, मुंबई, पुणे येथे जावे लागले. हिंदी विषयातले एम.ए. त्यांनी पुण्याहून केले. मुंबईला जाऊन पत्रकारितेचे शिक्षण घेतले. मुंबईत आल्यावर पहिली चार वर्षे त्यांनी विल्सन हायस्कूल, राममोहन, इंग्लिश स्कूल, सोशल सर्व्हिस लीग स्कूल, श्री शिवाजी विद्यालय (कन्याशाळा) येथॆ मास्तरकी केली. शाळेत दहावीला असताना त्यांची एक कथा नागपूर आकाशवाणीवरून प्रसारित झाली होती. सन १९५९ साली त्यांची एक लघुकथा 'गावकरी'मध्ये आली होती. ुढे निरनिराळ्या वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा जागर केला.
'रुपेरी चांदणे' हा तीन तासाचा कार्यक्रम गंधे सादर करीत.
सरकारी नोकरी सांभाळून स्वतःची आवड जोपसण्यासाठी दिवाकर गंधे यांनी लेखनास सुरुवात केली. मूळ जळगाव येथील गंधे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. नोकरीनिमित्ताने मुंबईत आल्यानंतर त्यांनी आपले लिखाण सुरूच ठेवले. नोकरीत असताना लोकराज्य या शासनाच्या मासिकाच्या संपादकपदाची धुरा त्यांनी सांभाळली. साचेबद्ध लिखाण न करता लोकराज्यला अधिक दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी विशेषांकांची सुरुवात त्यांनी केली. रवींद्रनाथ टागोर, ज्ञानेश्वरी असे त्यांनी संपादित केलेले लोकराज्यचे विशेषांक गाजले होते. धुंदस्वर, रजतपटावरील सुवर्णाक्षर, शतऋतू यांसारख्या त्यांच्या पुस्तकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट तसेच नाटकांचे समीक्षण हा त्यांचा आवडीचा विषय होता. मिरज येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांच्या हस्तलिखितांचा संग्रह प्रकाशित झााला होता.
दिवाकर दत्तात्रय गंधे यांनी 'लोकराज्य' या एरवी रुक्ष असलेल्या सरकारी प्रकाशनाला एका वेगळ्याच उंचीवर नेले. साहित्य, संस्कृती आणि कलेचा सुवर्णस्पर्श देऊन त्यांनी हे मासिक लोकप्रिय केले. बालकवी, लता मंगेशमर, साने गुरुजी, चित्रपटसृष्टीची पंचात्तरी या विषयांवर त्यांना 'लोकराज्या'चे विशेषांक काढले.
दिवाकर गंधे यांनी १९७९मध्ये नेरळ येथे मुक्काम हलविला होता. त्यानंतरही न थकता नेरळ येथील साहित्यवर्तुळात ते कार्यरत होते. नेरळमधील संस्था, युवा कलाकारांना मार्गदर्शन करतानाच कविसंमेलन, संस्थांचे कार्यक्रम यांमध्येही ते उत्साहाने सहभाग होत.
दिवाकर गंधे यांनी लिहिलेली पुस्तके
- चित्रगंध (चित्रपटविषयक)
- जीवन एक उत्सव (चित्रपटविषयक ललित लेखसंग्रह)
- झुंबर (कादंबरी)
- नातं रुपेरी पडद्याशी (चित्रपटविषयक ललित लेखसंग्रह)
- पारिजात (कथासंग्रह)
- रुपेरी पडद्यावरील सुवर्णाक्षरे (चित्रपटविषयक, या पुस्तकाचे प्रकाशन नौशाद यांच्या हस्ते झाले होते,)
- शतऋतू (कादंबरी)
- स्वरगंध (हिंदी चित्रपटांतील एकूण २२ गाण्यांचा रसास्वाद)
- स्वरधुंद (चित्रपटविषयक)
- हुशॆनचा घोडा (कथासंग्रह)
दिवाकर गंधे यांना मिळालेले पुरस्कार
- एकता कल्चरल अकादमी’ या संस्थेतर्फे एकता (साहित्य-दया पवार स्मृती) कला गौरव पुरस्कार (९ जानेवारी २०१०)
- 'चित्रगंध' पुस्तकाला कोमसापचा दृक्श्राव्य कला-सिनेमासाठीचा भाई भगत स्मृतिपुरस्कार (२०१५)
- कोल्हापूरच्या प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयातर्फे 'जीवन-एक उत्सव' या पुस्तकाला पुरस्कार (जानेवारी २०१४)