Jump to content

दिनेश आणि तारकेश्वरी राठोड

तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठी जोडपे आहे. हे दोघे पती-पत्‍नी असून पुण्याच्या पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी २३ मे २०१६ रोजी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.

दिनेश राठोड हे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाईपदावर काम करीत असून तारकेश्वरी राठोड महिला पोलीस नाईक आहेत. दोघे पुणे पोलीस दलात २००६ साली भरती झाले. दोघांनी २०१५ सालापासून माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी केली. त्या वर्षी त्यांना एव्हरेस्टवर चढाई करण्याची परवानगी मिळाली होती परंतु नेपाळमध्ये भूकंप झाल्याने त्यांना मोहीम अर्धवट सोडून परतावे लागले.

यापूर्वी दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दोघांनी पोलीस दलामार्फत अनेक मोहिमांत भाग घेतला आहे. एव्हरेस्ट मोहिमेपूर्वी दोघांनी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च दहा शिखरे पादाक्रांत केली होती.

संशयास्पद मोहीम

राठोड जोडप्याने एव्हरेस्टवर राष्ट्रध्वज फडकाविणारे छायाचित्र प्रसारमाध्यमांना दिले होते. त्यावेळी पुण्यातील गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेवर होते. राठोड दांपत्य एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांच्या पाहण्यात आले नव्हते. त्यामुळे राठोड दांपत्याची कथित एव्हरेस्ट मोहीम संशयास्पद असल्याचे मत गिर्यारोहकांनी व्यक्त केले होते. (१७-६-२०१६).

राठोड दांपत्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी २३ मे २०१६ रोजी एव्हरेस्ट सर केले होते. परंतु त्यांनी पंधरा दिवसांनी एव्हरेस्ट सर केल्याची घोषणा केली. जून २०१६ च्या पहिल्या आठवड्यात या दांपत्याने काठमांडू येथे पत्रकार परिषद घेऊन आपण एव्हरेस्ट सर करणारे पहिले दांपत्य असल्याचा दावा केला होता.

त्यामुळे एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातील पोलीस दांपत्य तारकेश्वरी आणि दिनेश राठोड यांची मोहीम संशयाच्या फेऱ्यात अडकली. राठोड दांपत्याच्या एव्हरेस्ट मोहिमेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी जून २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात दिले. चौकशीअंती एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुण्यातील पोलीस दाम्पत्य दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दोघांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले. या दाम्पत्याची खात्यांतर्गत चौकशी झाली आणि त्यांना बडतर्फीची नोटीस देण्यात आली. (२३-५-२०१७) यापूर्वीच त्यांच्यावर नेपाळमध्ये १० वर्षांसाठी प्रवेशबंदी टाकण्यात आली होती.