Jump to content

दिनकर नीलकंठ देशपांडे

दिनकर नीलकंठ देशपांडे
जन्मजुलै १७, इ.स. १९३३
मृत्यूमार्च १८, इ.स. २०११
कार्यक्षेत्र नाटककार, पत्रकार, अभिनेते, लेखक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, बालनाट्ये, इतर गद्य लेखन
कार्यकाळ इ.स. १९५१ ते २०११
प्रसिद्ध साहित्यकृतीबालनाट्ये:' बहरले सोन्याचे झाड, हं हं आणि हं हं हं, बंबाबू हो बंबाबू इ.इ.(एकूण शंभराहून अधिक)
वडील नीलकंठ
पत्नी मनीषा
अपत्ये प्रियदर्शन राहुल (मुलगे), रश्मी सोनटक्के(कन्या)

दिनकर देशपांडे ( १७ जुलै १९३३; मृत्यू १८ मार्च २०११) हे एक मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचे शालेय शिक्षण जबलपूर येथून, आणि माध्यमिक शिक्षण वर्ध्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले होते. शालेय जीवनात ते उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नावाजले गेले होते. त्यांनी तेथे एक सुवर्णपदकही मिळाले होते. शिक्षण संपल्यावर ते काही दिवस मुलताई नावाच्या गावात ग्रामसेवक म्हणून नोकरीला होते. नोकरीवर असतानाच त्यांना लिहिण्याचा छंद लागला. देशपांडे १९५१ मध्ये नागपुरात परत आले. विदर्भातले नाटककार मो.दा.देशमुख यांच्याकडून त्यांनी बालनाट्याचे धडे घेतले आणि पत्रकारितेबरोबरच बालवाङ्मयनिर्मितीत त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले. मराठी बालरंगभूमी, बालसाहित्य, पत्रकारिता, लेखन, दिग्दर्शन अशा अनेकविध क्षेत्रांत ठसा उमटविलेले विविधरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून दिनकर देशपांडे यांचे नाव घेतले जाते.

दिनकर देशपांडे यांनी नागपूरला अशोक प्रकाशन व उद्यम प्रकाशन या संस्थांत काही दिवस नोकरी केली आणि नंतर, नागपूर पत्रिका, लोकमत आणि दैनिक महाराष्ट्र या वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता केली. दिनकर देशपांडे विदर्भातील साहित्य आणि वृत्तपत्र क्षेत्रातील एक रसिक व्यक्तिमत्त्व होते. दिनकर‘राव’ जेवढे रसिक तेवढेच कलंदर. साहित्य असो की पत्रकारिता, एका कलंदर वृत्तीनेच त्यांनी शेवटपर्यंत वाटचाल केली. स्वतःच स्वतःच्या नावाच्या शेवटी ‘राव’ हा शब्द जाणीवपूर्वक लावायचा, तो तेवढ्याच जाणीवपूर्वक खास वैदर्भी ठसक्यात उच्चारायचा हे दिनकर‘रावां’चे खास वैशिष्ट्य होते. त्यातून त्यांचा वऱ्हाडी मोकळा ढंग आणि उमदा खेळकर स्वभावही दिसायचा. मिष्किली हा त्यांचा स्वभाव होता. तो त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणातून, सदरांतूनही उतरला. अर्थात, त्याचा वापर कुणाला दुखावण्यासाठी त्यांनी कधी केला नाही. त्यांची बालनाट्यावर अविचल निष्ठा होती. त्यामुळेच ते शंभराहून अधिक बालनाट्ये लिहू शकले. नाटकाच्या आवडीपोटी त्यांनी नागपूरला अभिनयाची नाट्यशाळा चालवली होती. त्यांची बहुसंख्य बालनाट्ये सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर (बालरंगभूमीने) रंगमंचावर सादर केली आणि बालरंगभूमी गाजवली. त्यांनी याशिवाय प्रौढांसाठी विनोदी लेखसंग्रह, कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी अन्य बालसाहित्याचीही निर्मिती केली आहे.

बालसाहित्य आणि बालरंगभूमीतील भरीव योगदानाची पावती म्हणूनच दिनकर देशपांडे यांना ठाणे येथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवडण्यात आले होते. बालनाट्य लेखनासाठी राज्य शासनासाठी देण्यात येणारा राम गणेश गडकरी पुरस्कार दोनदा मिळविण्याचा बहुमान मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक आहेत.

दिनकर देशपांडे यांची बालनाट्ये

एक राजा तीन चक्रम, कंदिलाआला अंधार गेला, कृष्ण गोकुळी येतो, गणपतीबाप्पा मोरया, गुंडू दिवाळं काढतो, गुप्तहेराची करामत, चला मंगळावर, चार चक्रम, चोरा कधी येशिल रे परतून, छोटी छोटी नाटुकली, जंगलातील वेताळ, जादूचा ताईत, जेव्हा अकलेला अक्कल फुटते, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, देव भावाचा भुकेला, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, नवे रक्षाबंधन हवे, नापासाची मुलाखत, निर्बुद्धांचे संमेलन, पुढारी पहावे होऊन, पेपर फुटला, बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे, बाहुल्यांचा डॉक्टर, बाळ चाळ शांतता परिषद, भातुकली आणि ॲटम बॉंब, मनीम्याऊची मुलाखत, मला मते द्या, मी झाशीची राणी होणार, यक्षनगरात विदूषक, रंगपंचमी, राजा उदार झाला, लटपट शहाणे, विझलेला दीप, शिळी शिदोरी, शुभ मंगल सावधान, शूरांचा बाजार, सिंहासन कुणाचे, स्वप्नांचा राजा, हं हं आणि हं हं हं, होळी आली रे आली, इत्यादी सुमारे १०० नाटके.

अन्य पुस्तके : अष्टग्रही आली घरा, आजी गेली देवाघरी, आम्ही कसे वाढलो, तृषित(नाटक -हे नागपूरच्या धनवटे नाट्यगृहात सुरूची निकेतनने सादर केले होते.), प्रीती मिळेल का हो शेजारी.

सन्मान आणि पुरस्कार

  • दिनकर देशपांडे हे १९९३ साली ठाणे शहरात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • दिनकर देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा बालनाट्य लेखनासाठीचा राम गणेश गडकरी पुरस्कार दोनदा मिळाला आहे.

पहा : मराठी बालकुमार साहित्य संमेलन