दिंडी
एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्यदेवतेच्या तीर्थक्षेत्री, दरवर्षी एका विशिष्ट तिथिस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजने गात,नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तीसमूहास दिंडी असे म्हणतात.
ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव इत्यादी संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका इत्यादी असायचे. या मिरवणुकीस दिंडी असे म्हणण्यात येत असे.
स्वरूप
कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे.आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते. ते आपसात वाटेत येणाऱ्या खर्चासाठी एक ठरावीक रक्कम गोळा करतात व आपल्या गावातून पंढरीस पायी जाण्यास निघतात. या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो.त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका/ध्वज असतो. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडी सामील होतो.[१]
संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव पालखी सोहळा जनक तपोनिधी संत नारायण महाराज देहूकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून घेऊन पुढे आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन अनेक दिंड्या सह पालखी सोहळा या संकल्पनेतून देहू आळंदी पंढरपूर अशी आषाढी वारीची परंपरा चालू केली.यात सर्वात आधी संत तुकारामाची पालखी देहू या पुण्याजवळच्या गावातुन निघते.तो दिवस ज्येष्ठ वद्य सप्तमी हा असतो.त्यापाठोपाठच ज्ञानेश्वर माउलींची पालखी ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून प्रयाण करते.या पालख्यांचे मिलन शिवाजीनगर पुणे येथे होते.पुणे येथे आल्यावर, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम पुणे येथिल भवानी पेठेतील विठोबा मंदिरात असतो तर तुकाराम महाराजाची पालखीचा मुक्काम पुणे येथील भवानीपेठेतच, निवडुंगा विठोबा देवस्थान येथे असतो.[२] ज्ञानेश्वर महाराजाच्या दिंडीचा मार्ग आळंदी, पुणे,सासवड,जेजुरी,वाल्हे, लोणंद,तरडगाव,फलटन,बरड,नातेपोते,माळशिरस,वेळापूर,वाखरी व शेवटी पंढरपूर असा राहतो.[३] तर, तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर मार्गे पंढरपूरला जाते.[४]
मार्गात असलेला सुमारे ४ किमी अंतराचा दिवेघाट हा अत्यंत खडतर असा आहे. दिंडीची सुरुवात 'ज्ञानेश्वर माउली' व तुकाराम माउली' यांच्या जयघोषाने होते.रस्त्यात विठ्ठलाचा तसेच ग्यानबा तुकारामाचा गजर वारकरी सतत करीत असतात.
ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली दिंडी आळंदीहून निघते.यास सुमारे ८०० वर्ष झालीत.[ संदर्भ हवा ] यात ज्ञानेशर महाराजांची पालखी असते. या पालखीच्या पुढे अश्व असतो.यात अनेक दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणांहून सहभागी होतात.परंपरागत दिंड्यांना अनुक्रमांक देण्यात येतात. त्यातील अनेक दिंड्या मानाच्या असतात. त्यांचे क्रमांकही ठरलेले असतात.दिंडीत वीणा वाजविणाऱ्यास महत्त्वाचे स्थान असते. अनेकांच्या हातात टाळ असतात. दिंडीत पारंपरिक अभंग म्हणले जातात.त्यात भारूड,गवळण इत्यादी भजन प्रकारांचा समावेश असतो. अनेक दिंड्यांत टाळ,पखवाज,मृदंगही असतात.[५]
दररोजच्या मार्गक्रमणात, पहाटे ३ वाजता उठून, शुचिर्भूत होउन अंघोळ चहा,नास्ता झाल्यावर मग मार्गक्रमणाला सुरुवात होते. यात महिलाही सहभागी असतात.त्यांचे डोक्यावर बहुधा तुळशी वृंदावन असते.मार्गात वारकरी फुगड्यादेखील खेळतात.
दिंडीतले वारकरी रोज सुमारे २५ किलोमीटरचे अंतर चालतात. दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो. तेथे त्या गावातील कुटुंबे या वारकऱ्यांच्या चहा नास्ता व जेवणाची सोय करतात. वारकऱ्यांची सोय करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करणे, असा समज आहे.वारीत गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नसतो. वारी केल्याने अहंकार गळून पडतो असा समज आहे.
मार्गात, मेंढ्याचे रिंगण,अश्वरिंगण, उभे रिंगण, आदी रिंगण प्रकार होतात.हे ठराविक गावातच होतात.जसे, अश्वरिंगण इंदापूरात होते. यात आधी झेडेकऱ्यांचे,तुळशीधारक महिलांचे,विणेकरी व नंतर मानाच्या अश्वाचे रिंगण असा कार्यक्रम साधारणतः असतो.
संदर्भ
- ^ author/vishwasmore (2024-06-18). "विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥". Lokmat. 2024-06-27 रोजी पाहिले.
- ^ तरुण भारत, नागपूर-ई-पेपर दिनांक २/०७/२०१३
- ^ "तरुण भारत, नागपूर-ई-पेपर दिनांक १२/०७/२०१३". 2013-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-12 रोजी पाहिले.
- ^ तरुण भारत, नागपूर-ई-पेपर दिनांक २/०७/२०१३
- ^ तरुण भारत, नागपूर-ई-पेपर दिनांक ११/०७/२०१३