Jump to content

दादू चौगुले

दादू चौगुले (१९४६ - २० ऑक्टोबर, २०१९) हे कोल्हापुरातील एक विख्यात पहिलवान आणि कुस्तीगीर होते.

चौगुले यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा या छोट्याशा गावात कुस्ती खेळायला सुरुवात केली. त्ंना कुस्ती खेळताना कुस्तीगीर गणपतराव आंदळकरांनी पाहिले, आणि ते दादूला घेऊन कोल्हापूरला आले. आंदळकरांनी आणि बाळ गायकवाड, बाळू बिरे यांनी दादूंना कुस्तीचे डावपेच शिकवले. त्यानंतर तयार झालेला हा कुस्तीगीर उत्तरेतील जबरदस्त ताकदीच्या पहिलवानांशी स्पर्धा करू लागला. तेथे दादूंनी महान भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद यांसाख्या अनेक मानाच्या गदा जिंकल्या आणि कोल्हापुरात आणल्या.

राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांत दादूंना लाल मातीऐवजी मॅटवर कुस्ती खेळावी लागली. तेथेही त्यांनी कुस्त्या जिंकल्या व दोन वेळा रौप्यपदक मिळवले. १९७३ साली न्यू झीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या शंभर किलो गटातील कुस्ती स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक पटकावले.

कोल्हापुरातील खासबाग येथे त्यांनी सादिक पंजाबीसारख्या मल्लालाना चितपट केले. सतपालबरोबर खेळलेली कुस्ती आणि इ.स. १९६९मध्ये हरिश्चंद्र माधव बिराजदार यांच्याबरोबरची कुस्ती ते हरले. हरिश्चंद्र माधव बिराजदार यांना महाराष्ट्र केसरी किताब मिळाला.

आपल्या कुस्तीच्या कारकिर्दीत त्यांनी देश-विदेशांतील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल मातीमध्ये आणि मॅटवर अस्मान दाखवले.

काही वर्षांंनंतर त्यांनी स्वतः कुस्ती खेळणे बंद केले, तरी त्यांनी कुस्तीच्या विकासासाठी सक्रिय योगदान दिले. ते कोल्हापूर शहर व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष होते. या माध्यमातून ते कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी संघटनात्मक काम करत होते. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी विशेष मेहनत घेत घडविले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी चांगले संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. मुलालाही चांगला मल्ल घडविला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा विनोद चौगुले हा हिंदकेसरी झाला.

प्रदीर्घ आजारानंतर दादू चौगुले यांचे कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात २० ऑक्टोबर २०१९ रोजी निधन झाले.