दागिने (आयुर्वेद)
[ संदर्भ हवा ]
दागिने आणि आरोग्य
आयुर्वेदाच्या दृष्टीतून दागिने
सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच दागिने आपल्या शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात, असे आयुर्वेद सांगतो. ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. ते आपल्या शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात आणि त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते.
आयुर्वेदाच्या अनुसार सोन्याच्या दागिन्यांना कमरेच्या वरील भागातील अंगावर तर चांदीच्या दागिन्यांना संपूर्ण शरीरभर परिधान केले पाहिजे, असे मानले जाते.
अंगठी
हाताच्या प्रत्येक बोटात अंगठी घालण्याची पद्धत आहे. अंगठी बोटात घातल्यास ती अनेक प्रकारच्या रोगांवर प्रभावी ठरते. मसलन आणि कनिष्टिका म्हणजे शेवटचे लहान बोट (करंगळी) आणि तिच्या जवळचे बोट यांच्यात अंगठी घातली की घबराट, हृदयरोग, हृदयशूल आणि मानसिक तणाव यांपासून होणारा त्रास कमी होतो. कफासंबंधीच्या तक्रारी, प्लिहा, लिव्हर याबाबतीतल्या ज्या तक्रारी असतात, त्या सोन्याची अंगठी घातली असता कमी होतात, तर पित्त-वाताच्या विकारांवर व पचनासंबंधीच्या तक्रारींबाबत चांदीची अंगठी घालणे फायदेशीर ठरते. कफ, दमा किंवा शरीराला कंप येणे याबाबतीत तांब्याची अंगठी बोटात घालणे उपयुक्त ठरते, असे आयुर्वेद सांगते.
रत्नहार, मोत्यांचा कंठा, नेकलेस
हे परिधान केल्याने गळ्याच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहते. गलगंड व मानेखालची हाडे यांच्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो. गळ्याच्या सर्व संभाव्य रोगांवर ही आभूषणे घालणे फायदेशीर मानले जाते.
कमरपट्टा
कमरेला कमरपट्टा घालणाऱ्या महिलांची पचनशक्ती वाढते व मासिक पाळी योग्यप्रकारे होते. त्यांना कंबर दुखणे, पाठदुखी वगैरे तक्रारींना तोंड द्यावे लागत नाही, असे मानले जाते.
पायातील व बोटातील कडय़ा
या घातल्यामुळे टाचा दुखणे, घोटे व पाठीच्या खालच्या भागात वेदना होत नाहीत. रक्तप्रवाह उत्तम प्रकारे चालू राहतो. तसेच महिलांना हिस्टेरिया, श्वास यांचा त्रास जाणवत नाही, असे मानले जाते.
बाजूबंद
हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात. हा फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही तर खांदा व हात यांना जो वेदनांचा त्रास होतो, त्यापासून सुटका करतो. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असे मानतात.
नथ
नथ घालण्याची प्रथा आजकाल कमी होत चालली आहे. पण नथ घालण्याने कफाच्या व नाकाच्या रोगांपासून बचाव होतो, असे मानले जाते.
कर्णफुले किंवा भिकबाळी
कानात एकूण शरीराशी संबंधित असे जवळपास ८० केंद्रबिंदू आहेत. कानात कर्णफुले किंवा भिकबाळी घातली तर हे सर्व बिंदू प्रभावित होतात आणि विविध रोगांवर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे फेपरे येणे, टॉन्सिल, हार्निया या व्याधींपासून सुटका मिळते, असे मानले जाते.
माथ्यावरील टिक्का
कपाळावरील टिक्क्यामुळे संवेदनशक्ती स्नायूंच्या एकूण तंत्रावर नियंत्रण ठेवते, असे मानले जाते.
बांगडय़ा
स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते.
बिंदी
बिंदी मेंदूला थंडावा देते. महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल अॅक्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात.
जोडवी
पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते.