Jump to content

दत्ता पुराणिक

दत्ता पुराणिक (इ.स. १९३१ - फेब्रुवारी, इ.स. २०१२) यांनी घरोघरी जाऊन श्यामची आई या पुस्तकाच्या २० हजारांहून अधिक प्रती विकल्या. याशिवाय त्यांनी साने गुरुजींसंबंधातील २५ हजारांपेक्षाही अधिक माहितीपत्रकांचे वाटप आणि सुमारे पाच हजार सीडींची विक्री केली होती.

पुराणिक मूळचे अमळनेरचे होते. १९५०मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले. साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता. शाळेसमोरून जाताना गुरुजी रोज विचारपूस करीत, अशी आठवण ते नेहमी सांगत. इंग्रजांच्या जाचामुळे गुरुजी काही काळ भूमिगत झाले होते. त्यावेळी त्यांची सेवा पुराणिक यांनी केली होती. त्यांचे सारे जीवनच साने गुरुजीमय झाले होते.

'श्यामची आई' या पुस्तकाने कित्येक पिढ्या घडवल्या. आपल्या खडतर बालपणाची कहाणी सांगत आणि संवेदनशील भावविश्व उलगडत त्यावेळच्या समाजजीवनाचे चित्रण गुरुजींनी या पुस्तकात केले होते. या पुस्तकाची ओळख आणि त्याद्वारे गुरुजींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी हे पुस्तक पुराणिक यांनी घराघरांत पोहोचविले. या पुस्तकावर ते कथाकथनही करीत असत.

इंदूर येथे २००९मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात दत्ता पुराणिक यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली होती. 'संगम रंगभूमी'च्या माध्यमातून त्यांनी बालनाट्येही बसविली होती. पुणेकरांनी त्यांच्या या कार्याची कृतज्ञता त्यांचा सत्कार करून वेळोवेळी व्यक्त केली होती. 'हा माझा सत्कार नसून प्रत्येक आईचा सन्मान आहे,' अशी विनम्र भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती.