दत्ता गव्हाणकर
दत्ता ना. गव्हाणकर (२२ मार्च, जन्मवर्ष अज्ञात - इ.स. १९७१ [१]) हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आणि कम्युनिस्ट चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आणि लोककलाकार होते.
व्यक्तिगत जीवन
शाहीर गव्हाणकरांचे मूळ गांव महागोंड (तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर). त्यांचे शालेय शिक्षण हे तिथेच झाले. लहानपणापासूनच त्यांना नाटक, गाणे, काव्य आदी साहित्याची आवड होती. १५/१६ व्या वर्षी त्यांची ओळख शाहीर नानवडीकरांशी झाली. त्यांच्याकडून त्यांनी शाहिरीचे धडे घेतले. कोल्हापूर कॉलेजातून त्यांनी इंग्लिश साहित्य हा विषय घेऊन बी.ए.ऑनर्स पदवी मिळवली [१].
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या गावी न जाता शाहिरी ताफ्याबरोबर मध्य प्रदेशात गेले. तेथून थेट मुंबईला नोकरीसाठी आले. मुंबईमध्ये ते गिरगावात त्रिभुवन रस्त्याजवळ राहात [१].
शाहिरी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान
शाहीर दत्ता गव्हाणकर यांचा एक पोवाडा त्यावेळी फारच लोकप्रिय झाला होता. तो पोवाडा असा, ‘...शौर्याची तव परंपरा, महाराष्ट्रा उठून बघ जरा!’ अशाच वातावरणात मुंबईतील युवकांची एक परिषद भरली. या परिषदेने वातावरण कसे तापत चालले होते, याचे दर्शन घडविले. शाहीर अमर शेख यांनी डफ फिरवून निधी जमा करून दिला. अमर शेख, चंदू भरडकर, अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील यांनी सर्वत्र वातावरण तापत ठेवले!
गव्हाणकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणाऱ्या शाहिरापैकी एक होते. त्यांनी कॉ. अमरशेख, कॉ. अण्णा भाऊ साठे, आत्माराम पाटील यांच्या प्रमाणेच संयुक्त महाराष्ट्राचा लढा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचला. त्यांच्या पोवाड्यांनी सर्वसामान्य शोषित कामगारांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये जोश आणि चैतन्य निर्माण झाले. त्यांचा "शौर्याची तव परंपरा, महाराष्ट्रा उठून बघ जरा" हा पोवाडा विशेष लोकप्रिय झाला होता [२].
संदर्भ व नोंदी
- ^ a b c "नाही चिरा, नाही पणती." १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ "धोंडू-पांडूचे आंदोलन".