Jump to content

द होली सायन्स

श्री युक्तेश्वर गिरी

द होली सायन्स (पवित्र विज्ञान) हे स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांनी सन १८९४ मध्ये ‘कैवल्य दर्शनम’ या शीर्षकाखाली लिहिलेले एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकास परमहंस योगानंद यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावना वर्ष आहे इ. स. १९४९ (पुस्तकाप्रमाणे २४९ द्वापार). हे पुस्तक सन १८९४ मध्ये लिहिले गेले (द्वापार १९४). युक्तेश्वर गिरी हे परमहंस योगानंदांचे (‘ऑटोबायॉग्रफी ऑफ अ योगी’चे विख्यात लेखक) गुरू होत.

युक्तेश्वर सांगतात की हे पुस्तक त्यांनी महावतार बाबाजी यांच्या विनंतीवरून लिहिले. या पुस्तकात बायबल आणि उपनिषदांच्या समांतर प्रतिपादनांची तुलना करून सर्व धर्मांच्या एकत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

पुस्तकाचा हेतू

प्रस्तावनेत युक्तेश्वर लिहितात - या पुस्तकाचा उद्देश हे दाखवून देणे आहे की ‘सर्व धर्मांमध्ये मुळात एकता आहे; विविध धर्ममतांनी सांगितलेल्या सत्यांमध्ये कोणताही फरक नाही. ज्या पद्धतीने जगाची उत्क्रांती झालेली आहे ती पद्धत एकच आहे आणि सर्व धर्मग्रंथांनी एकाच ध्येयाची कबुली दिलेली आहे.”

या पुस्तकात न्यू टेस्टामेंटमधील, विशेषतः बुक ऑफ रिव्हिलेशनमधील परिच्छेदांची संस्कृत श्लोकांशी तुलना केलेली आहे. प्रस्तावनेत पुढे आणखी म्हटलेले आहे - ‘हे पुस्तक ज्ञानविकासाच्या चार अवस्थांप्रमाणे चार भागांमध्ये विभागलेले आहे.’ हे चार भाग आहेत : द गॉस्पेल (वेद), द गोल (अभीष्टम्‌), द प्रोसिजर (साधनम्) आणि द रिव्हिलेशन (विभूती).

युग सिद्धांत

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री युक्तेश्वर यांनी युगचक्राबाबत आपले स्पष्टीकरण दिलेले आहे. हे स्पष्टीकरण पारंपरिक मताहून निराळे आहे. युक्तेश्वर यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वी सध्या द्वापारयुगात आहे, कलियुगात नाही. बहुतांश भारतीय पंडितांचा असा विश्वास आहे की सध्याचा काळ कलियुग आहे.

युक्तेश्वरांचा सिद्धांत खालील मुद्द्यांवर आधारित आहे :

  • खगोलशास्त्रानुसार उपग्रह आपल्या ग्रहांभोवती फिरतात, ग्रह आपल्या अक्षांभोवती फेर धरत उपग्रहांसह सूर्याभोवती फिरतात; सूर्य एका ताऱ्यास युगल/द्वैती (जोडीदार) म्हणून घेतो आणि ग्रहोपग्रहांसह त्याच्याभोवती फिरतो; सूर्याच्या ह्या एका प्रदक्षिणेस (जोडीदाराभोवती) सुमारे २४,००० पृथ्वीय वर्षे लागतात. (द्वैती ताऱ्यांवर संशोधन करणारी 'बायनरी रिसर्च इन्स्टिट्यूट' ही एक संस्था आहे.)[] ह्या प्रदक्षिणेमुळे राशीचक्राभोवती संपातबिंदूंना अनुगती (मागे सारणारी गती) प्राप्त होते. सूर्यास आणखी एक गती आहे जिच्यानुसार तो ‘विष्णूनाभी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाकेंद्राभोवती फिरतो. हे महाकेंद्र म्हणजे ब्रह्माचे (येथे ब्रह्म म्हणजे वैश्विक चुंबकत्व, सर्जक शक्ती) स्थान होय. ब्रह्माद्वारे धर्माचे नियमन होते (इथे धर्म म्हणजे आंतरिक विश्वाचा मानसिक सद्गुण).
  • सूर्य आपल्या युगलाभोवती प्रदक्षिणा घालताना जेव्हा ब्रह्मस्थानाच्या सर्वाधिक जवळ येतो तेव्हा धर्मगुण इतका विकसित झालेला असतो की मानवास सर्वकाही, अगदी आत्म्याची गुपितेही सहज समजू शकतात.
  • सूर्य आपल्या कक्षेत ब्रह्मस्थानापासून सर्वाधिक दूर असलेल्या जागी जातो तेव्हा धर्मगुण इतका घटतो की माणूस स्थूल भौतिक निर्मितीपलीकडे काहीही समजू शकत नाही. उलटप्रवासात आणखी बारा हजार वर्षांमध्ये धर्मगुण वाढत जातो. बारा हजार वर्षांचा हा काळ समग्र बदल घडवतो, बाहेरच्या भौतिक जगातनी आतल्या बौद्धिक वा विद्युत जगात – या काळालाच ‘दैवी युग’ म्हणतात. अर्थात २४,००० वर्षांमध्ये सूर्य एक विद्युतचक्र पूर्ण करतो – चढत्या कंसात १२,००० वर्षेनी उतरत्या कंसात १२,००० वर्षे.

चार युगांचा कालावधी

  1. कलियुग – १२०० वर्षे (१/२०) – धर्मगुण १/४ विकसित, पहिली अवस्था, स्थूल बदलांचे आकलन
  2. द्वापारयुग – २४०० वर्षे (२/२०) – धर्मगुण १/२ विकसित, दुसरी अवस्था, वीजेचे व तिच्या सूक्ष्म गुणांचे आकलन (बाह्य जगाची निर्मितीतत्त्वे)
  3. त्रेतायुग – ३६०० वर्षे (३/२०) – धर्मगुण तिसरी अवस्था, दैवी चुंबकत्वाचे आकलन (ज्या विद्युतशक्तीवर निर्मितीचे अस्तित्व अवलंबून असते).
  4. सत्ययुग – ४८०० वर्षे (४/२०) – धर्मगुण चौथी अवस्था, परमेश्वराचे तसेच दृष्य जगतापलीकडील आत्म्यांचे आकलन.

मनुस्मृतीतील श्लोक

मनुस्मृतीत युगकालदर्शक श्लोक आढळून येतात (१.६९ ते १.७२). त्यांचा अर्थ असा : कृतयुग (सत्ययुग) चार हजार वर्षांचे असते. त्याचा उदयकाळ व अस्तकाळ प्रत्येकी ४०० वर्षांचा असतो. एकूण ४०० + ४००० + ४०० = ४८०० वर्षे. अन्य तीन युगांमध्ये युगकालाचे हजार व उदयास्ताचे शंभर एकेकाने कमी होतात (म्हणजे ३०००, ३००; २०००, २००; १०००, १०० असे). चतुर्युगाच्या १२,००० वर्षांना देवयुग म्हणतात. हजार दैवी युगांची बेरीज म्हणजे ब्रह्माचा एक दिवस व तेवढ्याच कालावधीची एक रात्र.

भाष्यकारांनी मुळात मनुस्मृतीत नसलेले 'एक दैवी दिवस म्हणजे पृथ्वीवरील एक वर्ष' असे सूत्र मांडून गफलत केलेली आहे, असे युक्तेश्वर म्हणतात.

सध्याच्या युगचक्राचा धावता आढावा

इसपू ११,५०१ पासून (तेव्हा शरदसंपात मेष राशीत होता) सूर्य ब्रह्माच्या अतिनिकटबिंदूपासून दूर जाऊ लागला, माणसाचा बौद्धिक स्तर घसरू लागला (म्हणजे साधारण साडेतेरा हजार वर्षांपूर्वी सत्ययुग होते). पुढच्या ४८०० वर्षांमध्ये (इसपू ११५०० – ६७००) आध्यात्मिक ज्ञान जाणण्याची माणसाची क्षमता संपली. पुढच्या ३६०० वर्षांमध्ये (उतरते त्रेतायुग इसपू ६७०० - ३१००) दैवी चुंबकत्व जाणण्याची माणसाची क्षमता संपली. पुढच्या २४०० वर्षांमध्ये (उतरते द्वापारयुग इसपू ३१०० - ७००) विद्युत वा तिचे गुणधर्म जाणण्याची माणसाची क्षमता संपली. आणखी १२०० वर्षांमध्ये (इसपू ७०० – सन ५००) सूर्य उतरत्या कलियुगातून गेला आणि ब्रह्मापासूनचा अतिदूरस्थ बिंदू त्याने गाठला (तेव्हा शरदसंपात तुळेत होता). माणसाची बौद्धिक क्षमता इतकी घटली की निर्मितीच्या स्थूल घटकांशिवाय त्याला काहीही समजू शकत नव्हते. सन ५०० च्या सुमाराचा हा कलियुगाचा काळ चोवीस हजार वर्षांतील काळाकुट्ट भाग होता. जगभरात सर्वत्र या काळात अज्ञान व कष्टच कष्ट होते.

सन ४९९ पासून सूर्य पुन्हा ब्रह्मस्थानाकडे निघाला, माणसाची बुद्धी विकसित होऊ लागली. चढत्या कलियुगाच्या ११०० वर्षांमध्ये (सन ५०० - १६००) बुद्धी इतकी जड होती की तिला विद्युत, सूक्ष्मभूत, निर्मितीचे सूक्ष्मकण यांचे ज्ञान नव्हते. राजकीय क्षितिजावर कोणत्याही साम्राज्यात शांती नव्हती.

कलि-द्वापार संधीच्या १०० वर्षांमध्ये वीजेच्या सूक्ष्म बाबींचे, पंचतन्मात्रांचे ज्ञान माणसाला झाले, राजकीय शांती येऊ लागली (सन १६००-१७००). १६०० – विल्यम गिल्बर्ट चुंबकीय बल शोधले, सर्व पदार्थांमधील विजेचा शोध लावला. १६०९ – केप्लरचे नियम, गॅलिलिओची दुर्बिण. १६२१ – हॉलंडचा ड्रेबेल – सूक्ष्मदर्शकाचा शोध. १६७० – न्यूटन गुरुत्वाकर्षण. १७०० – टॉमस सेव्हरी वाफेचे एंजिन. १७२० – स्टीफन ग्रे : मानवी देहावरील विजेच्या प्रभावाचा शोध. लोक एकमेकांचा आदर करू लागले, संस्कृती प्रगत झाल्या. नेपोलियन बोनापार्ट नवी विधीव्यवस्था. अमेरिका स्वतंत्र झाली, युरोपचे अनेक भाग शांत होते. रेल्वे-तारांचे जाळे. सन १८९९ मध्ये, द्वापारसंधीची २०० वर्षे संपल्यावर २००० वर्षांचे खरे द्वापारयुग सुरू होईल. या काळात विजेचे व तिच्या गुणधर्मांचे संपूर्ण ज्ञान मानवास होईल. हा काळाचा महिमा!

पंचांगांमधील चुकीची कारणमीमांसा

हिंदू पंचांगांमध्ये जगाची स्थिती योग्य तऱ्हेने दाखवलेली नाही. घोर कलियुगातील कुल्लुक भट्टासारख्या संस्कृत पंडितांच्या गैरसमजांमुळे कलियुग ४३२००० वर्षांचे, त्यापैकी ४९९४ वर्षे गेली आहेत असे मानले जाऊ लागले (लेखनकाल सन १८९४ आहे हे लक्षात घ्यावे.) हे खरे नाही!

पंचांगांमध्ये चूक इसपू ७०० दरम्यान परिक्षिताच्या काळात शिरली. तेव्हा उतरते द्वापारयुग नुकतेच संपले होते. घोर कलियुगाचा आरंभ जाणून युधिष्ठिराने आपल्या नातवाला सिंहासन दिले आणि दरबारातील सर्व विद्वानांसह हिमालयात गेला. युगगणना जाणणारा कुणी दरबारात उरला नाही. म्हणून द्वापाराची २४०० वर्षे संपवून कलियुगाचे पहिले वर्ष कुणी मोजले नाही. ते कलियुग २४०१ मानण्यात आले. सन ४९९ मध्ये खरेतर कलियुगाची १२०० वर्षे संपली, सूर्य ब्रह्मापासून अतिदूरस्थ बिंदूकडे गेला, तेव्हाही कलियुग १२०० न मोजता कलियुग ३६०० मानण्यात आले.

सन ४९९ पासून चढते कलियुग सुरू झाल्यावर बुद्धीविकास होऊ लागला तसे काही विद्वानांच्या लक्षात आले की प्राचीन ऋषींनी कलियुगास १२०० वर्षेच दिली होती. त्यांना चूक समजली, कारण मात्र समजले नाही. मेळ घालण्यासाठी त्यांनी असे मानले की ही १२०० वर्षे मानवी / पृथ्वीची नव्हेत तर दैवी आहेत (३० दैवी दिवसांचा एक महिना असे १२ दैवी महिने, एक दैवी दिवस पृथ्वीवरील एका वर्षाचा). १२०० दैवी वर्षे = १२०० गुणिले ३६० दिवस = ४३२०००.

योग्य निष्कर्षाप्रत येण्यासाठी सन १८९४ मधील वसंतसंपाताचे स्थान दिलेले आहे. ते पाहता मेषेपासून वसंतसंपात ढळू लागल्यापासून १३९४ वर्षे उलटली असे दिसून येते. यातून चढत्या कलियुगाची १२०० वर्षे वगळता १९४ वर्षे येतात. ह्या १३९४ मध्ये ३६०० वर्षे (उतरते कलियुग + द्वापार) मिळवली की येतात ४९९४ वर्षे. (कलियुगाची इतकी वर्षे सरली मानतात – उपरोल्लेखित).

सन ४०९९ मध्ये त्रेतायुगाचा आरंभ होईल, तेव्हा मानवास दैवी चुंबकत्व समजेल. काळाचे बंधन तोडू शकलेल्या काही श्रेष्ठ व्यक्ती आहेत, ज्या आता जिवंत आहेत, सामान्य मानवास न समजणाऱ्या गोष्टी त्यांना समजलेल्या आहेत. व्यक्तीआधारित कालगणनेपेक्षा तारकासमूहांवर आधारित शास्त्रीय गणना असावी असे म्हणून प्रस्तावनेचा शेवट करण्यात आलेला आहे.

जग्गी वासुदेवांचा दुजोरा

हीच युगकल्पना (युक्तेश्वर गिरींच्या पुस्तकाप्रमाणे) ईशा फाऊंडेशनच्या सद्गुरू जग्गी वासुदेवांनी सांगितलेली आहे.[] फरक आहे तो वर्षांच्या संख्येचा. सूर्य स्वतःच्या युगल ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २५,९२० वर्षे घेतो, असे सद्गुरूंनी म्हटलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कालावधी असे : सतयुग – ५१८४ वर्षे, त्रेतायुग – ३८८८ वर्षे, द्वापारयुग – २५९२ वर्षे आणि कलियुग १२९६ वर्षे. अर्थात, त्यांच्याही सांगण्यानुसार सद्यकाल हे कलियुग नाही, चढते द्वापारयुग आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सन २०८२ मध्येच जग त्रेतायुगात प्रवेश करेल. कुरूक्षेत्र युद्ध इसपू ३१४० मध्ये संपले असे मानून त्यांनी कालगणना केलेली आहे.

संदर्भ

  1. ^ संकेतस्थळ : http://binaryresearchinstitute.com/bri/
  2. ^ सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा लेख, दुवा : https://isha.sadhguru.org/in/en/wisdom/article/kali-yuga-end-lies-ahead