द अँजेला वाय. डेव्हिस रीडर (पुस्तक)
सदर पुस्तक ॲंजेला डेव्हिस यांनी लिहिलेले असून जॉय जेम्स यांनी ते संपादित केले आहे जे १९९८ मध्ये प्रकाशित केले गेले. काळा स्त्रीवाद, त्यातून उभे राहिलेले स्त्रीवादी सिद्धांकन हे वर्णवादाला विरोध करीत मुक्तीच्या शक्यतांची मांडणी करतात. ॲंजेला डेव्हिस यांच्या मांडणीतून पुढे आलेले स्त्रीवादी सिद्धांकन हे काळ्या स्त्रीवादी चळवळीच्या पार्श्वभूमीवर उभे राहिलेले दिसते.[१]
प्रस्तावना
वर्ण, वर्ग, लिंगभाव या संदर्भात परीघावर असणाऱ्या अनेक स्त्रीवाद्यांनी स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले. वर्णभेद आणि लिंगभावाधारित विषमता यांना प्रतिकार करत काळा स्त्रीवाद उभा राहिला व त्याद्वारे स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये सुद्धा योगदान देण्यात आले. बेल हूक्स सारख्या स्त्रीवादी समाजातील सर्वच पातळ्यांवर परिघावरील असणाऱ्या काळ्या स्त्रीवाद्यांनी प्रमुख प्रवाही स्त्रीवादी सिद्धांकनात कशाप्रकारे हस्तक्षेप केले हे अधोरेखित केले तर रोझमेरी टॉंग यांनी स्त्रीवादाच्या विभिन्न विचारधारांची ओळख करवून देत त्यातून स्त्रीवादी सिद्धांकन स्पष्ट केले आहे. सदर पुस्तक हे काळ्या मार्क्सवादी स्त्रीवादी तज्ञ, लेखिका आणि राजकीय नेतृत्व असणाऱ्या ॲंजेला डेव्हिस यांच्या लिखाणाचे संकलन असून त्यांनी विविध गंभीर मुद्द्यांवर जी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे त्याचा समावेश केला आहे.
ॲंजेला डेव्हिस
ॲंजेला डेव्हिस या अमेरिकेतील कम्युनिस्ट पक्ष तसेच काळ्या नागरिकांचे मानवी व नागरी हक्क यासाठी लढा देणारा ब्लॅक पॅंथर पक्ष अशा परिवर्तनवादी राजकीय लढ्यामध्ये सहभाग व नेतृत्व असणारे व्यक्तिमत्त्व आहे. तत्कालीन अमेरिकेतील वर्णभेद, काळ्या लोकांवर होणारा हिंसाचार, त्यांच्या नागरी हक्काचे प्रश्न, काळ्या स्त्रियांचे नागरिक व स्त्री म्हणून होणारे दुहेरी शोषण, कैद्यांचे प्रश्न व हक्क, लैंगिक अल्पसख्यांकांचे हक्क्क आणि काळ्या स्त्रीवादाची चळवळ असे अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान आहे. राजकीय तत्त्वज्ञान व परिवर्तनवादी सिद्धांकन या अनुषंगाने डेव्हिस यांचे काम असून संस्कृती, लिंगभाव, वर्णवाद व भांडवलशाही याबद्दलचे त्यांचे सिद्धांकन ही सामाजिक व राजकीय चळवळीसाठी दिशादर्शक ठरते. या पुस्तकामध्ये त्यांचे लेख, मुलाखती, भाषण या साहित्याचा समावेश केलेला आहे. जॉय जेम्स यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच ॲंजेला डेव्हिस यांची परिपूर्ण ओळख करवून दिली आहे. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी, शैक्षणिक प्रवास, चळवळीमधील सहभाग इथपासून ते डेव्हिस या एक तज्ञ म्हणून कशाप्रकारे घडल्या याचा विस्तृत आढावा घेतला आहे. ज्यातून डेव्हिस यांचे वरील भिन्न विषयांसंदर्भातील विचार व भूमिका यांचे आकलन होते. शैक्षणिक जीवनादरम्यान चळवळीमध्ये प्रवेश, न्यायालयीन लढा व एक काळ्या मार्क्सवादी स्त्रीवादी म्हणून विकसित केलेली सिद्धांकने असे अनेक मुद्दे येतात.[२]
Prisons, Repression and Resistance
पुढीलप्रमाणे एकूण चार विभाग पुस्तकामध्ये आहेत. Prisons, Repression and Resistance या पहिल्या विभागामध्ये डेव्हिस यांचे स्वतःचे राजकीय कैदी म्हणून आलेले अनुभव सांगितले आहेत. अमेरिकेतील काळ्या लोकांवर होणारे अत्याचार, गुलामगिरी, त्यांना गुन्हेगार ठरविणे, कारागृहात काळ्या कैद्यांना दिली जाणारी वागणूक, शिक्षा यासर्वांच्या विरोधात चर्चा करीत त्यांनी कारागृह बंदीची मागणी केली आहे. यामधून तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचे आकलन होते.
Marxism, anti- Racism and Feminism
Marxism, anti- Racism and Feminism या दुसऱ्या विभागामध्ये गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवर काळ्या स्त्रियांचे होणारे शोषण आणि त्यांच्या समजतील भूमिकांची चिकित्सा केली आहे. वर्णभेद, लैंगिक अत्याचार, भांडवलशाही शोषण व्यवस्था, त्या संदर्भात कष्टकरी स्त्रियांचे श्रम व घरकाम, सरोगसी आणि outcaste mothers म्हणून काळ्या स्त्रियांची भूमिका याविषयी सविस्तर चर्चा केली आहे.
Aesthetics and Culture
तिसरा विभाग Aesthetics and Culture यामधून काळ्या समूहातून येणाऱ्या प्रती-संस्कृती बद्दल माहिती दिली आहे. ॲफ्रो अमेरिकन समूहाचा इतिहास, संस्कृती, राजकीय माहिती तसेच काळा राष्ट्रवाद या विषयांचा देखील समावेश आहे. चौथ्या प्रकरणामध्ये विशिष्ठ विषयावर डेव्हिस यांच्या घेण्यात आलेल्या मुलाखती असून त्यातून वर्णभेदाच्या विरोधातील समूहाचे राजकीय नेतृत्व, भूमिका, युती यांची चर्चा केली आहे. तसेच अमेरिकेतील वर्ण, वर्ग आणि लिंगभाव या मुद्द्यांना अनुसरून त्यावर टीकात्मक परीक्षण कारानंरी अजून एक मुलाखत समाविष्ट केली आहे. डेव्हिस यांचे सिद्धांकन हे परिवर्तनवादी आणि लोकशाहीचा आग्रह धरणारे असून ते प्रमुख प्रवाही स्त्रीवादी सिद्धांकनाला आव्हान देते. १९६०-७० या काळामध्ये डेव्हिस यांनी राजकीय चळवळीतील क्रांतिकारक म्हणून जे काम केले त्यातून विश्लेषणात्मक स्त्रीवादी सिद्धांकन आणि पुरोगामी सिद्धांकन यांना चालना मिळाली. सदर पुस्तक हे यासोबतच तत्कालीन राजकीय वातावरण, वर्णवादाचे सिद्धांकन Ethnic Studies, American Studies, Cultural theory, Social theory, Feminist philosophy आणि Gender studies. अशा सर्वच महत्त्वाच्या मुद्द्यांची थोडक्यात माहिती करवून देते. त्यामुळे स्त्रीवादी सिद्धांकन, वर्णभेदविरोधी सिद्धांकन, सामाजिक न्याय आणि मार्क्सवाद याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यासाठी हे पुस्तक निकडीचे वाचन साहित्य आहे.
महत्त्वाच्या संकल्पना
काळा स्त्रीवाद, काळा राष्ट्रवाद, वर्णभेद, मार्क्सवादी काळा स्त्रीवाद
प्रतिसाद
रॉबिन डी. जी. केली यांनी सदर पुस्तकावर पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे की, गेल्या अनेक काळापासून वर्ण आणि लिंगभाव हे निकडीचे विषय ठरले आहेत; परंतु त्यासंदर्भात एक विश्लेषणात्मक चौकट विकसित करण्याचे व हे घटक राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचे काम ॲंजेला डेव्हिस यांनी केले आहे. या उल्लेखनीय पुस्तकामधून ॲंजेला डेव्हिस यांना आदर्श मानणाऱ्याना खऱ्या ॲंजेला डेव्हिसची ओळख होऊ शकते; ज्या तत्कालीन सार्वजनिक क्षेत्रात सामन्यांच्या वतीने बौद्धिक मांडणी करीत होत्या.
चंद्रा तळपदे मोहन्ती या स्त्री अभ्यासातील ख्यातनाम अभ्यासिका असून त्यांनी सदर पुस्तकाबद्दल पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिलेली आही की, हे अतिशय प्रेरणादायी असे संकलन असून ॲंजेला डेव्हिस यांनी तत्कालीन विरोधकांची सामाजिक चळवळ व न्यायासाठी कमालीची बांधिलकी याचे यथार्थ चित्रण केले आहे.
संदर्भ सूची
https://en.wikipedia.org/wiki/Angela_Davis
- ^ James, Joy (1998-12-04). The Angela Y. Davis Reader (इंग्रजी भाषेत). Wiley. ISBN 9780631203612.
- ^ Morrison, Toni (1972-10-29). "Who Is Angela Davis?". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 2018-04-01 रोजी पाहिले.