द.भा. धामणस्कर
द.भा. धामणस्कर | |
---|---|
जन्म नाव | दत्तात्रेय भास्कर धामणस्कर |
जन्म | २६ ऑक्टोबर १९३० अहमदाबाद (गुजरात) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | Reserve Bank Of India |
साहित्य प्रकार | कविता |
वडील | भास्कर धामणस्कर |
दत्तात्रेय भास्कर धामणस्कर ( २६ ऑक्टोबर १९३०, अहमदाबाद, गुजरात) हे मराठी कवी आहेत.
जीवनपट
धामणस्कर यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. (अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र) ही पदवी घेतली आणि १९८८ पर्यंत भारतीय रिझर्व बँकेत नोकरी केली.
सप्टेंबर १९६० सालापासून ते डोंबिवलीत राहतात.
त्यांनी आपल्या सतराव्या वर्षी पहिली कविता लिहिली. सत्यकथा, मौज, कविता-रती, दीपावली, हंस, मराठवाडा, इत्यादी नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
ग्रंथालीच्या 'दशकाची कविता' मधील दहा निवडक कवींच्या काव्य संकलनात त्यांची कविता समाविष्ट झाली.
कवितासंग्रह
धाणस्कर यांचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
- प्राक्तनाचे संदर्भ (मौज प्रकाशन १९८२)
- बरेच काही उगवून आलेले (मौज प्रकाशन २००१)
- भरून आलेले आकाश (मौज प्रकाशन २०१६)
सन्मान
धाणस्कर यांच्या "प्राक्तनाचे संदर्भ" या कवितासंग्रहाला राज्य सरकारचा केशवसुत पुरस्कार मिळाला. तसेच "बरेच काही उगवून आलेले" या कवितासंग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले. साहित्य अकादमीच्या साठोत्तरी मराठी कवितेत त्यांच्या ५ कवितांचा समावेश होता. ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या "भारतीय कवितायें १९८३" मध्ये ५ मराठी कवींच्या कवितांत त्यांचाही समावेश होता.
महाराष्ट्र सरकारच्या चालू १०व्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात धाणस्करांची "वस्तू" ही कविता अभ्यासासाठी ठेवलेली आहे. कर्नाटक सरकारच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात "कंदील विकणारी मुले" ही कविता अंतर्भूत झाली होती. त्यांच्या काही कविता हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड व इंग्रजी भाषांत अनुवादित झालेल्या आहेत.
दत्तात्रेय भास्कर धामणस्कर यांचे आकाशवाणीवर व दूरदर्शनवर कवितावाचन झालेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता.
ते डोंबिवलीच्या काव्यरसिक मंडळाचे पहिल्यापासून सभासद आहेत. त्यांना मंडळाच्या वार्षिक संमेलनाच्या निमित्याने अनेक प्रतिभावंत कवी प्रत्यक्ष ऐकायला व जवळून पाहावयास मिळाले, ही त्यांच्यासाठी मोठीच भाग्याची गोष्ट होती.
संदर्भ
- जीवनानुभूतीचा पैस विस्तारणारी अभिव्यक्ती[permanent dead link]
- द-भा-धामणस्कर - मराठी कविता