Jump to content

थर्मोपिलाई

थर्‌माॅपिली : पूर्व ग्रीसमधील इतिहासप्रसिद्ध खिंड. येथे व्याधिहारक गरम पाण्याचे झरे आहेत. त्यावरून थर्‌मॉ (उष्ण) पिली (खिंड) हे नाव पडले असावे. ही खिंड अथेन्सच्या उत्तरेस सु. १२८ किमी. अंतरावर आहे. खिंडीला लागून पूर्वेस मेलिसचे आखात असून पश्चिमेस दक्षिणोत्तर कलिद्रॉमॉन पर्वतरांग आहे. खिंडीचा मधला भाग अगदी चिंचोळा म्हणजे सहा मी. रुंदीचा आहे. उत्तर ग्रीसकडून अथेन्सकडे जाण्यास थर्‌मॉपिलीचीच खिंड सोपी होती. तसेच थोड्या सैन्यानिशी संरक्षण करण्यास ही जागा सोयीस्कर होती. पहिली लढाई इ. स. पू. ४८० मध्ये झाली. अथेन्सने इराणी साम्राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत लुडबुड केल्याचे निमित्त होऊन इराणी सम्राट झर्क्‌सीझ थेसालीमार्गे उत्तर ग्रीसमध्ये आला. त्याच्या बरोबर १,६०,००० सैनिक होते. थेसालीच्या पूर्व किनाऱ्यावरून त्याच्या १,२७७ युद्धनौकाही दक्षिणेकडे अथेन्सच्या रोखाने निघाल्या. तेव्हा इराणी आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी स्पार्टाचा राजा लीऑनिडस याने थर्‌मॉपिलीच्या घाटात ७,००० ग्रीक सैनिकांची संरक्षक फळी सज्‍ज केली. थर्‌मॉपिलीवर पूर्वेकडून हल्ला होऊ नये म्हणून व त्याचप्रमाणे झर्क्‌सीझला समुद्रमार्गे बगल देण्यास अशक्य व्हावे याकरिता, थर्‌मॉपिलीवर पूर्वेस ५० किमी. अंतरावर आर्टेमीसीऑन भूशिराजवळ ग्रीक नौसेना थीमिस्टोक्लीझने उभी केली. या भूशिरापाशी सागरी झटापटीस प्रारंभ झाला. झटापट चालू असतानाच थर्‌मॉपिलीत मधल्या घाट दरवाज्याजवळ लढाईस सुरुवात झाली. थर्‌मॉपिलीच्या पश्चिमेस डोंगरातून एक ॲनोपिया नावाचा घाट होता. त्या घाटातून काही इराणी सैन्य ग्रीकांच्या पिछाडीवर आले. हा घाट एफियॅल्टीझ या ग्रीक फितुराने उघडा केला, असे म्हणतात. परिणामतः थर्‌मॉपिलीत ग्रीक सैन्याची वाताहात झाली. ही बातमी ऐकून थीमिस्टोक्लीझने माघार घेऊन अथेन्सच्या रक्षणासाठी तो सॅलमिस सामुद्रधुनीकडे गेला. पुढे सॅलमिस येथे सागरी व फ्लॉरिडा येथे जमिनीवर युद्धे होऊन त्यांत इराण्यांचा पराभव झाला.

थर्‌मॉपिलीच्या लढाईची माहिती विश्वासार्ह नाही. तथापि इराण्यांकडून ग्रीकांना पराभव पतकरावा लागला, ही वस्तुस्थिती अबाधित राहते.

इ. स. पू. २७९ मध्ये गॉल लोकांच्या आक्रमणाला या खिंडीतच ग्रीकांनी काही महिने रोखून धरले होते. थर्‌मॉपिलीची दुसरी लढाई इ. स. पू. १९१ मध्ये सिरियाचा राजा तिसरा अँटायओकस व दोन रोमन सेनापती मेनियस ग्‍लॅब्रिओ व मार्क्‌स केटो यांच्यात झाली. त्यात अँटायओकसचा पराभव झाला. अँटायओकसच्या बाजूने हॅनिबल होता. दुसऱ्या महायुद्धात २० ते २५ एप्रिल १९४१ या काळात जर्मन पिछाडी सैन्यालाही येथे थोपवून धरण्यात आले होते.