Jump to content

त्रिशुंड गणपती मंदिर

त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे.

ह्या तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की, तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते.

हे मंदिर गिरिगोसावी पंथीयांच्या तंत्रमार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविकजन इथे फिरकत नव्हते. मंदिरात सध्याची मुख्य मूर्ती त्रिशुंड गजाननाची असली तरी शिवमंदिर उभारण्याची मूळ कल्पना असावी.

मंदिराचा इतिहास

हे मंदिर भीमगीरजी गोसावी महंतानी २६ ऑगस्ट १७५४ रोजी बांधून पूर्ण केले. त्यांचे वंशज इंदूरला घामपूर गावात राहत. सरकारी नोंदीत इ.स. १९१७ पर्यंत मंदिराला मालकच नव्हता. मंदिरासमोर असलेल्या झाडाची एक फांदी जवळच्या नेर्लेकर यांच्या घरावर गेली म्हणून त्यांनी पालिकेत तक्रार केली; तेव्हा पालिकेने चौकशी केली. मंदिराचे मालक इंदूरला गोसावी नावाचे गृहस्थ असल्याचे समजले. त्यांना इंदूरहून बोलावून आणले. त्यांनी झाड समूळ तोडून टाकले. नंतर मंदिराच्या पुढच्या भागात लाकडाची वखार चालू केली; तर मंदिराच्या सभामंडपाला कोळशाचे गोदाम केले. पुढे ही वखार कुलकर्णी नावाच्या मित्राला देऊन ते इंदूरला निघून गेले. १९४५ साली वहिवाटदार म्हणून कैलासगीर गोसावींचे नाव लागले. पण, कागदोपत्री पुरावा देता न आल्याने त्यांचा मंदिरावरचा हक्क गेला. सन १९८५ साली मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट स्थापन झाला.[ संदर्भ हवा ]

मंदिराची रचना

मंदिराची मांडणी करताना वर मंदिर व खाली तळघर, समाधी व हठयोग्यांची पाठशाळा चालावी, अशी योजना होती. सर्व दिनचर्येची सोय तळघरात होती. प्रातर्विधीसाठी नागझरीजवळ जाण्याची भुयारी पाऊलवाट होती. विहिरीच्या भिंतीत पाण्याच्या पातळीवर एक मोठी खोली होती. तेथे तंत्रसाधकांच्या प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरी चौरंग होता.

तळघरातील खोल्यांना दरवाजे व खोल्यांच्या भिंतींना कोनाडे आहेत. खोलीच्या छताला दगडात दोन खाचा असून त्या खोबणीतून दोराच्या साह्याने छताला उलटे टांगून घेऊन पेटत्या निखाऱ्यावर काही ठरावीक वनस्पतींचा धूर करून तो तोंडावर घ्यावयाचा, हा धूर साधनेचा विधी असे.[ संदर्भ हवा ]

मंदिराचे गर्भगृह, दर्शनमंडप, सभामंडप असे तीन भाग आहेत. मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथऱ्यावर आहे. सभामंडप व मूळ गर्भगृह खोलवर आहे.

मंदिरातील मूर्ती

गर्भगृहात गजाननाच्या मूर्तीमागे जो कोनाडेवजा भाग आहे. त्यात शेषशायी भगवानांची एक साडेतीन फूट उंचीची रेखीव मूर्ती आहे, पण गर्भगृहातील अंधार व गणेशमूर्तीमुळे ती दिसत नाही.

गणपतीच्या मूर्तीची मूर्तीची बैठक चौकोनी असून मयूरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे. तीन शुंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदकपात्रास स्पर्श करीत आहे. मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करीत आहे.

मंदिरातील अन्य शिल्पे

कोरीव लेणे वाटावे असा मंदिराचा दर्शनी भाग आहे. तसेच आतील प्रत्येक दार हे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे.

मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील दोन्ही बाजूंस बंदूकधारी इंग्रज शिपाई गेंड्याला साखळदंडाने बांधून उभे आहेत, असे शिल्प आहे. साम्राज्यवादी इंग्रजांनी बंगाल गिळायला सुरुवात केली त्याचे रूपक म्हणून बंगाल व आसामच्या प्रतीकाला-गेंड्याला जेरबंद दाखविलेले असावे.

मंदिराला शिखर नाही. वरच्या बाजूस कासव आहे. कदाचित वर शिवलिंग स्थापण्याची मूळ कल्पना अर्धवट राहिली असावी. मंदिरावर शिखराऐवजी एकावर एक अशी शिवलिंगे आहेत.

(अपूर्ण)