त्रिविक्रम मंदिर (तेर)
त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे असलेले एक मंदिर आहे. भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याठिकाणी माणसाच्या आकाराएवढी मोठी त्रिविक्रमाची मूर्ती आहे. त्रिविक्रम मंदिराची बांधणी चैत्यासारखी असून त्याचा काळ इ.स.चे दुसरे शतक ते इ.स.चे पाचवे शतक असा आहे.[१]
मंदिरशैली
मंदिराच्या अवशेषांची वास्तुवैशिष्ट्ये आणि काहिशा तुटलेल्या आणि झीज झालेल्या मूर्तीची शैली यावरून हे मंदिर वाकाटककालीन शैलीचे आहे.
मंदिराची रचना
त्रिविक्रम मंदिराचा मंडप खुर, कुंभ आणि वेदिका या थरांच्या पीठावर असलेल्या स्तंभिकांनी बनलेला आहे. या स्तंभिकांवर मंदिराच्या तुळ्या आहेत. मंडपाच्या पुढच्या दोन्ही कोपऱ्यात वाकाटक शैलीचे स्तंभ आहेत. वेदिका आणि कक्षासनावर असलेल्या वामन स्तंभांवरील अलंकरण उल्लेखनीय आहे. वेदिका खोलगट देवकोष्ट आणि अर्धस्तंभाने अलंकृत आहे. देवकोष्ठांमध्ये गण असून अर्धस्तंभावर फुलांची नक्षी आहे. वेदिकेवरील वामनस्तंभाचे तळखडे पूर्णकुंभाचे असून त्यावरील खांब अर्धकमलतबकांनी अलंकृत केलेले आहेत.
चित्रदालन
- त्रिविक्रम मंदिर मागील बाजूने
- त्रिविक्रम मंदिराची वरची बाजू
- त्रिविक्रम मंदिर