Jump to content

तोत्तोचान

तोत्तोचान
लेखकतेत्सुको कुरोयानागी
अनुवादकचेतना सरदेशमुख गोसावी
भाषामराठी
साहित्य प्रकारबालसाहित्य , अनुवादित
प्रकाशन संस्थानॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
प्रथमावृत्तीइ.स. १९९८
चालू आवृत्तीइ.स. २०१२
मुखपृष्ठकारचिहिरो इवासाकी
पुस्तकातील चित्रांचे चित्रकारचिहिरो इवासाकी
पृष्ठसंख्या१३०
आय.एस.बी.एन.९७८-८१-२३७-२४९५-९

तोत्तोचान हे मूळ जपानी भाषेतील पुस्तक आहे. लेखिका तेत्सुको कुरोयानागी या जपानी दूरदर्शन कलाकार आणि युनिसेफच्या सद्भावना दूत आहेत. या पुस्तकात लेखिकेने आपल्या तोमोई या शाळेतले अनुभव तसेच शाळेचे मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल सांगितले आहे. पुस्तकातल्या कथानकाचा काळ हा दुसऱ्या महायुद्धादरम्यानचा आहे. या पुस्तकाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. याचा मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केला आहे.

कथानक

लहानगी तोत्तोचान खूप चंचल असते. डेस्क सारखा उघडणे, झाडावरच्या चिमण्यांशी गप्पा मारणे, रस्त्यावरून जाणाऱ्या बॅंडवाल्यांशी बोलणे असल्या गोष्टींमुळे तिला शाळेतून काढून टाकले जाते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच तोत्तोचानची आई तिला तोमोई नावाच्या नवीन शाळेत टाकण्यासाठी घेऊन जाते. झाडाच्या खांबांचे गेट असलेली आणि रेल्वेच्या डब्यात वर्ग भरणारी ही शाळा तोत्तोचानला पाहताक्षणीच आवडते. शाळेचे मुख्याध्यापक कोबायाशी तिला बोलायला सांगतात आणि ती पूर्ण चार तास त्यांच्याशी गप्पा मारते. तेव्हापासूनच दोघांमध्ये मैत्रीचे आगळे बंध जुळतात.

पुस्तकात पुढे तोत्तोचानचे शाळेतले अनुभव तिच्याच शब्दात छोट्या छोट्या धड्यांमधून समोर येतात. तिला मिळणारे नवीन मित्र, शाळेतले स्वच्छंद वातावरण, रोज शाळेचे तास मुलांनी ठरविण्याची पद्धत, निसर्गरम्य वातावरणातल्या सहली इत्यादी. शाळेत आणायच्या डब्यासाठीपण नियम होता की रोज काहीतरी डोंगरातले आणि काहीतरी समुद्रातले आणायचे थोडक्यात प्रत्येकाला चौरस आहार मिळेल असे.

मुलांचे नाजूक मन जपत त्यांना शिकविणे ही कोबायाशींची पद्धत असते. उदा. मुलांना पोहायचा पोशाख न घालता पोहू देणे जेणेकरून त्यांना शरीराकडे निरोगी दृष्टीने बघता येईल तसेच शारीरिक व्यंग असणाऱ्या मुलांनाही काही न्यूनगंड निर्माण होणार नाही, अपंग मुलांना भाग घेता येईल अशा क्रीडास्पर्धा आयोजित करणे, युरिथमिक्स ही संगीताच्या तालावर चालण्याची कवायत, तोत्तोचानने घातलेली महागडी रिबीन तिने घालू नये असे हळुवारपणे सुचविणे कारण इतर मुलींनाही तशी रिबीन हवीशी वाटेल वगैरे.
एका रात्री या शाळेवर बॉम्ब पडतो आणि शाळा बेचिराख होते.

या पुस्तकात तोत्तोचानच्या नजरेतून लहान मुलांचे भावविश्व जसे कळते तसेच मोठ्यांनाही कोबायाशींनी केलेल्या प्रयोगांचीही उपयुक्तता लक्षात येते.