Jump to content

तेलताड

Kinabatangan Sabah Poisoned-Oil-palm-02

तेलताड हे नारळासारखी वनस्पती आहे. खाद्य तेलाचे उत्पन्न आणि उपयोगामध्ये नारळानंतर तेल-ताडाच्या तेलाचा दुसरा क्रमांक लागतो. या तेल-ताडाच्या शास्रीय नावातील पहिल्या नावाची उत्पत्ती ओलीया म्हणजे ऑलिव्ह या तेल देणाऱ्या वृक्षाच्या नावावरून झाली आहे. ऑलिव्ह्प्रमाणेच हाही वृक्ष फळापासून तेल देणारा आहे. त्याचे दुसरे नाव गियानेन्सिस हे त्याच्या तो प्रथम सापडलेल्या प्रदेश गिनी यावरून पडले आहे. परंतु याचे मूळ ठिकाण मध्य आफ्रिकेतील घनदाट अरण्यात पश्चिम आफ्रिकेच्या उत्तर भागात सेनेगल नदी किनाऱ्यापासून दक्षिणेकडे लोआंडा आणि बेनगुयेला या प्रदेशात असावे असे वनस्पतीशास्त्रज्ञाचे मत आहे. पोर्तुगाल, स्पेन इत्यादी दर्यावर्दी राष्ट्रांनी याचा फैलाव दक्षिण अमेरिकेत ब्राझील, वेस्ट इंडीज, कोस्टारिका इत्यादी ठिकाणी केला. तेथून या वृक्षाचा फैलाव जगभर झाला आहे. सोळाव्या शतकाच्या पुवार्धात काही पर्यटकांनी हा पाम-वृक्ष गिनीच्या किनाऱ्यावरप्रथम पाहिला. तेथे सर्व किनारपट्टीवर तो त्यांना मुक्तपणे वाढणारा आणि जंगली वृक्ष वाटला. तेथील स्थानिक हबशींना या वृक्षाचे तेल काढण्याची कला अवगत होती. भारतात आयात होणारे बरेचसे पाम-तेल आज मलेशियातून येते.

तेल-ताडाच्या वृक्षाची उंची ३० ते ४५ फुटापर्यंत असते. काही ठिकाणी ही उंची ७० ते ८० फुट झाल्याचीही नोंद आहे. फुलावर येईपर्यंत याच्या वरच्या टोकाला पंधरा-वीस पिसाच्या आकाराची संयुक्त पाने असतात. या पानांची लांबी १० ते १५ फुट असून त्यावर शंभर-दीडशे पर्णिकाच्या जोड्या असतात. मध्यभागातील याच्या पर्णिका ३ फुटापर्यंत लंब असून २ इंच इतक्या रुंद असतात. पानाच्या दांड्यावर पर्णिकाची सुरुवात होण्याअगोदर त्यात पन्नास-साठ जोड्या तीक्ष्ण काटे आढळतात. हा वृक्ष मंद गतीने वाढतो आणि फुलोऱ्यावर येण्यास त्याला सहा-सात वर्षे लागतात.

प्रत्येक फळ दीड-दोन इंच लंब अंडाकृती असून सोबत तीक्ष्ण काटे असतात. याची लालसर तुकतुकीत फळे पिकू लागली की नारिंगी होत जातात. आतला तंतुमय काथ्या तेलाने भरलेला असतो. पूर्ण वाढलेला वृक्ष ३०-४० किलो वजनाची फळे देतो.

तेलताडाची दोन झाडे जिजामाता उद्यानात बघायला मिळतात. विद्यानगरी परिसरात मुंबई विद्यापीठाच्या पाम उद्यानात एक नमुना आहे. गोदरेज कंपनीच्या विक्रोळीच्या कारखान्याच्या मुख्य द्वारापाशी दोन तेलताड अतिशय डौलदारपणे शोभत आहेत.