तुपोलेव
प्रकार | विभाग |
---|---|
स्थापना | २२ ऑक्टोबर १९२२ |
संस्थापक | आंद्रेई तुपोलेव |
मुख्यालय | मॉस्को, रशिया |
उत्पादने | विमाने |
कर्मचारी | ३५२४ (२०११ साली) |
पालक कंपनी | युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
तुपोलेव (रशियन: Ту́полев) ही एक रशियन विमान उत्पादक कंपनी आहे. सोव्हिएत आंतरिक्ष अभियंता आंद्रेई तुपोलेव ह्याने स्थापन केलेली ही कंपनी २००६ साली इतर काही कंपन्यांसह एकत्रित करून युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ह्या पालक कंपनीच्या अधिपत्याखाली आणण्यात आली.
इतिहास
आंद्रेई तुपोलेव ह्याने १९२२ साली तुपोलेवची स्थापना केली. १९१५ साली जर्मन अभियंता ह्युगो युंकर्स ह्याने जगातील पहिले संपूर्ण धातूचे विमान विकसित केले होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीवर विमाने उत्पादन करण्याची बंदी घालण्यात आली. १९२२ साली युंकर्सने गुप्तरित्या मॉस्कोच्या एका उपनगरात एक विमान कारखाना उघडला. १९२५ साली हा कारखाना तुपोलेवकडे सुपूर्त करण्यात आला. तुपोलेवच्या विमान बनावटीत युंकर्सच्या कामाचा मोठ प्रभाव आढळतो. दुसऱ्या महायुद्धात तुपोलेवने बनवलेले तू-२ हे लढाऊ विमान लाल सेनेद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरले गेले.
युद्धानंतर तुपोलेवचा विकास चालूच राहिला. १९५५ साली पहिल्यांदा उड्डाण केलेले तू-१०४ हे जगातील सर्वात पहिले यशस्वी जेट विमान होते. तू-११४ हे जगातील सर्वात वेगवान टर्बोप्रॉप विमान होते. तू-१५४, तू-२०४ इत्यादी शीत युद्ध काळात बनवली गेलेली विमाने बोइंगची प्रमुख प्रतिस्पर्धी मानली जात. तू-१४४ हे व्यावसायिक वापरासाठी बनवले गेलेले जगातील केवळ दोनपैकी एक सुपरसॉनिक विमान आहे. (दुसरे: कॉंकोर्ड). सोव्हिएत संघाच्या अस्तानंतर तुपोलेवने आपले लक्ष प्रामुख्याने संशोधनावर केंद्रित केले आहे.