तुतारी
तुतारी (स्त्रीलिंगी नाम; अनेकवचन: तुताऱ्या) हे भारतीय उपखंडात, विशेषकरून महाराष्ट्रात, प्रचलित असणारे एक सुषिर (म्हणजे तोंडाने फुंकून वाजवण्याचे) वाद्य आहे. ही आकडेबाज वळणाची, म्हणजे साधारणतः इंग्रजी 'सी' किंवा 'एस' आकाराची असते व तिचा आकार वाजविणाऱ्याच्या तोंडाकडे निमुळता होत आलेला असतो. सर्वसाधारणपणे, हे पितळेचे किंवा प्राण्यांच्या शिंगाचे बनविलेले असते. मात्र सध्या अन्य धातू व मिश्रधातूंमध्येही तुताऱ्या बनवल्या जातात.[१]
तुतारीला 'शृंग', 'रणश्रृंग', 'सिंगा', 'कुरुडूतू' किंवा 'कोम्बू' असेही म्हणतात.
वापर
महाराष्ट्रातील तुतारी हे केवळ राजेशाही परंपरांशी जोडलेले नसून सध्याचे राजकीय प्रतीक म्हणून टिकून आहे. दक्षिण भारतात, श्रीलंका आणि नेपाळमध्येही हे वाद्य वाजवले जाते. पूर्वी लढाईस तोंड फुटणे किंवा राजाचे आगमन होणे, इत्यादी प्रसंगी तुतारी फुंकली जात असे. वर्तमान काळात लग्नप्रसंगात किंवा सभासमारंभांच्या उद्घाटनप्रसंगी हिचा वापर होताना आढळतो. हे सणांच्या काळात आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाजवले जाते. हे लग्नासाठी आणि लष्करी संगीतात देखील वाजवले जाते.[२]
चित्रदालन
- तुतारीवाल्याचे शिल्प : मोराची चिंचोली, महाराष्ट्र
- तुतारीवाला
- ^ Das, Mohua (24 November 2019). "Sena's in the cold, but the tutari, written off many times, may still resonate". Times of India.
- ^ Lalitha, M (19 February 2017). "The tutari's sound is a signal". The Hindu.