तिरुवल्लुवर
तिरुवल्लुवर (तमिळ: திருவள்ளுவர்) हे प्राचीन काळातील एक तमिळ कवी व संत होते. इ.स. पूर्व २०० ते इ.स. पूर्व १० या वर्षांच्या दरम्यान त्यांचा कार्यकाळ मानला जातो. तिरुक्कुरल ही तमिळ भाषेतील काव्य रचना लिहिल्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
जीवन
या ग्रंथकाराच्या जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही.तो वल्लुव जातीचा होता असे नावावरून दिसते. तिरु म्हणजे महापुरुष. तिरुवल्लुवर म्हणजे वल्लुव जातीतील महापुरुष किंवा थोर भक्त. पांड्य राजाची मदुरा ही राजधानी होती. या राजधानीत हा संतकवी जन्मला.[१]
तिरुवल्लुवर यांचा भव्य पुतळा कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाजवळ एका टेकडीवर आहे.
कुरल
तामिळ भाषेत या ग्रंथाला फार मान आहे. याला 'तामिळ वेद" म्हणतात, ते यथार्थ आहे.
ग्रंथाचे स्वरूप-
कुरल या ग्रंथाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात धर्म, दुसऱ्या भागात अर्थ आणि तिसऱ्या भागात काम असे वर्ण्य विषय आहेत. या ग्रंथात चतुर्विध पुरुषार्थापैकी पहिल्या तिहींवर काव्यमय वर्णन आहे. प्रथम धर्म्भाग म्हणून जो आहे, त्यात यति-जीवनावर असलेली प्रकरणे मोक्षासंबंधी आहेत, असेही कोणी म्हणतात.
हे तीनही भाग मिळून १३३ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात दहा कविता आहेत. प्रत्येक कविता दोन चरणांची आहे. कुरल या शब्दाचा अर्थच मुळी "दोन चरणी" असा आहे. कुरलमधील हे १३३० श्लोक दुपायी वृत्तात आहेत. अति लहान वृत्त व त्यात गंभीर व विशाल अर्थ खच्च्चून भरलेला असे हे काव्य आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ कवी तिरुवल्लुवर कुरल (साने गुरुजी) १९८७