Jump to content

तारपा

तारपा हे आदिवासी वाद्यातील प्रमुख सुरवाद्य. भरतप्रणीत वाद्य वर्गीकरणानुसार सुषिरवाद्य आणि वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. तारपा या सुषिर वाद्यावर आधारित तारपा हे आदिवासी लोकनृत्यही प्रसिद्ध आहे. २ ते ५ फुट लांबीचे हे वाद्य मल्हार कोळी, वारली, कोकना, भिल्ल या महाराष्ट्रातील आदिवासी जमाती मध्ये वाजविले जाते. पावरी आणि तारपा तयार करण्याचे तत्व, सामग्री आणि पद्ध्त साधारण सारखीच आहे. त्यामुळे या वाद्यात साम्यता आहे. लांबी कितीही असली तरी त्याच्या नादात फारसा फरक पडत नाही. त्याचे तीन भाग असतात.

पहिला भाग म्हणजे भोपळा. त्याच्या आकारावर वाद्याची लांबी मुख्यत: अवलंबून असते. यात वाजविणारा सारखा फुंक मारत राहतो. या भोपळ्यातली हवा मग वाद्याच्या दुसऱ्या भागात दोन पोकळ बांबूच्या नळ्यात जाते. एका नळीला सहा स्वरछिद्रे असतात. यावर निरनिराळे स्वर उत्पन्न करता येतात. एकच स्वर तुटकपणे वाजविता येत नाही. स्कॉटिश बॅगपाईपसारखे हे वाद्य अखंडपणे वाजत राहते. हवा फुंकून वाजविण्याच्या प्रकारापैकी वारल्याचा तारपा, कोकणा भिल्लाची पावरी- बीरीही वाद्य आहेत. पावरी हे वाद्य मुख्यत: भोपळ्याचे बनविलेले असते. पावरीचा भोपळा सहजासहजी त्या आकाराचा मिळत नाही. वेलाला भोपळा लागल्यानंतर अनेकातून पारखून भोपळा निवडावा लागतो. भोपळा वेलीवर तयार झाल्यावर त्याच्या बिया व इतर अनावश्यक भाग काढून टाकला जातो. तोंडाने हवा भरण्यासाठी लाकडाचा लहान नरसळ्यासारखा तुकडा बसवितात. नंतर बांबूच्या दोन नळ्या घेतात. त्यांना स्वरासाठी भोके पाडतात. भोपळ्याच्या दुसऱ्या टोकात त्या नळ्या दिव्याची काजळी व मेण यांच्या सहाय्याने बसवितात. त्यापूर्वी त्या बाजूस बांबूच्या या नळ्यात वेताचे अगर वेळूचे स्वर प्रत्येकी एक बसवितात. स्वर पूर्णतः भोपळ्यात असतात. बांबूच्या काठ्यांच्या दुसऱ्या टोकास जनावराचे शिंग, ताड पानाची गुंडाळी, ताडपाने, यावरून या वाद्याला वेगवेगळी नावे आहेत ; जसे ताडपानाचे वाद्य- तारपा, तारपी ; मोठ्या जनावराचे शिंग – पावरी; देव वाजंत्र – देव डोब्रू ; हरीण शिंग – बीरी, चिरी.स्वराच्या बाबतीत या वाद्यास एका बांबू नळीस एक व दुसरीस ताडपानाजवळ तीन व भोपळ्याजवळ एक अशी चार भोके असतात. या वाद्यांच्या भागांची नावे भोपळा – सुयाळू, ताडपाने – टोटेरा, बांबू काठी एक छीद्राची – बोंबली, चार छीद्राची – हेलेरी, स्वर – दिभळ्या/जीभळ्या. पाव्यासही अनेक ठिकाणी तीनचार गाळे असल्याचे दिसते. श्रीकृष्णाच्या वेणूस तीनच छिद्र होती. अथर्ववेदात तसे उल्लेख आहेत. त्यामुळेच कृष्णाच्या वेणूचे जबरदस्त आकर्षण होते. गावित भगत रात्रीच्या शांत वेळी आपल्या देव वाजंत्र्याने म्हणजे पावरी वाजून देवांना जागे करतो व त्यावेळी जमावाला तो पावरीच्या सुरावर डोलावयास लावतो. काही भागात पावरी फक्त भगतच वाजवतो. त्यामुळे तिला देवाच्या वाद्याचेही महत्व आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील गुजरातच्या सीमा भागात पावरीला ‘देव वाजंत्र’ किंवा ‘देव डोब्रू’ म्हणतात आणि ते देवपूजेच्या वेळी वाजवितात. पावरीच्या सुरावटीमुळे जमलेल्या भक्तांच्या मनावर नकळत परिणाम होतो आणि ते एकाग्र चित्ताने भगताचे व्यवहार पाहतात. पावरीच्या नादात मती गुंग करण्याची ताकद आहे.

तारपा या वाद्यावर आधारित तारपा या आदिवासी लोकनृत्यात तारपा वादक हा मध्यभागी उभा असतो तर नृत्य करणाऱ्या जोड्या या त्याच्या भोवती गोलाकार नृत्य करत असतात. नृत्य करणाऱ्यात सर्वात पुढे जो असतो त्याच्या हातात एक काठी असते त्या काठीला घोळकाठी असे म्हणतात. काठीच्या वरच्या बाजूला लोखंडी पाकळ्या बसविलेल्या असतात. तारप्याच्या सुरावटी सोबत नृत्य करणाऱ्यांना ताल देण्याचे काम घोळकाठी करत असते. तारप्याची लय जस जशी वाढत जाते तसे नृत्य करणारे एकदम बेभान होऊन तारप्यातून निघणाऱ्या सुरावटी वर नाचत असतात. तारपा या वाद्यातून निघणारी सुरेल धून ऐकणाऱ्याला अगदी बेधुंद करून टाकते.