Jump to content

तारकाम

तारकाम : (फिलिग्री वर्क). सोने किंवा चांदी यांच्या तलम तारांनी केलेले आलंकारिक काम. तारांचे हे गुंफणकाम कधीकधी चांदीच्या पृष्ठभागावर जोडलेले असते किंवा स्वतंत्रपणे केलेले असते. यातील तारा एकेरी किंवा अनेकपदरी पिळीच्या असून त्यांत गोल गाठी व गोळ्या यांचे दाणेदार कामही केले जाते.

इतिहास

तारकामाची ही कला फार जुनी आहे. प्राचीन अर व मेसोपोटेमिया प्रदेशात सापडलेले तारकामाचे नमुने ख्रि. पू. ३००० वर्षांपूर्वीचे असावेत, तर ईजिप्तमधील नमुने ख्रि. पू. २८०० व त्यापुढील काळातील असावेत. इट्रुरिया तसेच ग्रीस येथेही ही कला पूर्वीपासून रूढ होती. शिवाय मध्ययुगातही ती प्रचलित होती. आयरिश लोक व स्पेनमधील मूर लोक हे मूल्यवान खडे जडवून तारकाम करीत. अतिशय नाजूक व सुंदर तारकलेचे नमुने दहाव्या ते तेराव्या शतकातील सुंग या चिनी राजवटीतील केशालंकाराचे आहेत. यूरोपीय प्रबोधनकालात व त्यानंतरही इटली आणि इतर भूमध्य सागरी प्रदेशांत तारकामाला फार मागणी होती. चांदीचे तारकाम केलेले दागिने यूरोपातदेखील फार लोकप्रिय झाले. इझ्राएल व जॉर्डनमध्येही ही कला प्रचलित होती.

भारतात आसाम, मणिपूर या भागात मुख्यतः कंठहार व कंकणे तारकामानेच बनविली जातात. त्यांचा वरील भाग सोन्याचा आणि आतील पृष्टभाग चांदीचा असतो. त्यांवर फुलांची नक्षीही तारकामाने केलेली असते. त्यांतील ‘खारू’ नामक कंकणे दंडावर जोडीने वापरली जातात. कंठहारामध्ये एक प्रकारची एकवीस मण्यांची माळ असते. तीतील प्रत्येक मणी शंक्वाकृती असून तो वरून सोन्याचा व खालून चांदीचा असतो आणि त्याला माळेत गुंफण्यासाठी दोन्ही बाजूंस दोन कड्या बसविलेल्या असतात. या माळेला ‘सोनापोकी’ म्हणतात. सोन्याचांदीचे तारकाम केलेले व त्यात नीलमणी जडविलेले मोठेमोठे ताईत हिमालयाकडील भागात भोटिया स्त्रिया वापरतात.

प्रसार

भारतात चांदीच्या तारगुंफणकामासाठी कटक फार प्रसिद्ध आहे. तार ओढण्याची क्रिया सुलभ होण्यासाठी चांदी आटवितात. तिच्यामध्ये थोडे शिसे मिसळतात, त्यामुळे तार तलम व लवचिक बनते. तार गुंफण्याचे नाजूक व कौशल्यपूर्ण काम कलाकार स्वतःच्या बोटांनी करतो. या कामी दहा वर्षांखालील मुलेच अधिक तरबेज असतात. ही मुले कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे नाजूक तारगुंफण अत्यंत सफाईदारपणे करतात. एकेक तार घेऊन त्यातून वेलबुटीचे आकार काळजीपूर्वक जुळवून ते एका अभ्रकाच्या पत्र्यावर ठेवतात व मग जोडतात. कलाकार पानाचा किंवा पाकळीचा बाह्याकार प्रथम तयार करून तो या मुलाकडे देतो. मग तो मुलगा तारेचे अपेक्षित लांबीचे तुकडे कापून घेतो, त्यांना बोटांत धरून बाक देतो व ते ओळीने पानाच्या आकारात जुळवितो. त्यानंतर भट्टीत तापवून व डाखकाम करून हे तारकाम जोडले जाते. अशा रीतीने तयार झालेले पानापाकळ्यांचे आकार एकमेकांस जोडून अपेक्षित सौंदर्याकृती तयार होते. शेवटी तयार झालेला दागिना झिलईदार, चकचकीत व हिमशुभ्र बनवितात. तारगुंफणकामासाठी सोनार पुढील हत्यारे वापरतो. जंत्री ही जाड पोलादी फळी असून तिला असलेल्या बारीक छिद्रांतून तार ओढली जाते, मोठी तार ओढण्यासाठी पकड व लहान तार वळविण्यासाठी कटनी उपयोगी पडते. तसेच तार कापण्यासाठी चुरखी तर तार गुंडाळण्यासाठी लाकडी रीळ, बालंचा म्हणजे डुकराच्या केसांचा कुंचला, मेघनाला म्हणजे अभ्रकाचा पत्रा, नक्षी कोरण्यासाठी एक पोलादी टोकदार सळई व तार गुंडाळण्यासाठी हातोल ही सुई वापरतात. शेवटी साखळीच्या कड्या कापतात.

कटकप्रमाणेच उच्च दर्जाचे तारगुंफणकाम डाक्क्यातही होते. याशिवाय काश्मीरमधील श्रीनगर, दक्षिणेतील करीमनगर, तमिळनाडूमधील त्रिचनापल्ली, बंगालमधील मुर्शिदाबाद आणि कलकत्ता, उत्तर प्रदेशातील झांशी, त्रिपुरातील अगरतला, राजस्थानमधील कोटा आणि केरळमधील त्रिवेंद्रम येथेही ही कला चांगल्या प्रकारे प्रगत झालेली दिसून येते. तारगुंफणकामातून तयार होणारे दागिने म्हणजे कर्णफुले, अंगठ्या, कंकणे, कंठहार, बाजूबंद व इतर वस्तू म्हणजे पेट्या, पानदान, अत्तरदाणी व चमचे, अश्वरथ आणि अन्य पौराणिक पार्श्वभूमीवरील प्रसंगदृष्ये इ. असतात.