Jump to content

ताम्हण


ताम्हण वृक्षाची फुले

ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्‍नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मेच्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने =याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे [ संदर्भ हवा ]. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात. कोकणात या वृक्षाला 'मोठा बोंडारा' असे म्हणतात.

ताम्हण वृक्षाची पाने
ताम्हण वृक्षाची फळे

कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो.

लहान झाडालाही फुले येतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे.

झाडाचे शास्त्रीय नाव

लॅगस्ट्रोमिया (Lagerstroemia) हे नाव स्वीडिश बॉटॅनिस्ट मॅगलॅगस्टोम यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. रेजिनी (raginae) म्हणजे राणीचा. स्पेसिओसा (speciosa) म्हणजे अतिशय सुंदर.

झाडाची अन्य नावे

मराठी - मोठा बोंडारा
इंग्रजी - क्वीन्स क्रेप, प्राइड ऑफ इंडिया, जायंट क्रेप
हिंदी - जरूल, अर्जुन
बंगाली - जारूल, अजहार
लॅटिन - लॅगस्ट्रोमिया रेजिनी/फ्लॉस रेजिनी

रोपणी

बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. झाडाची वाढ लवकर आणि जोमाने होते.

बहरण्याचा हंगाम

पानगळीचा वृक्ष असल्याने पानगळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात होते. एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो. फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल ५-७ सेमी आकाराचे. झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची फुले असणारे तामण वृक्षही आढळून येतात. फूल दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प हा मान मिळाला असावा. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. दोन, तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षातून दोनदा येऊ शकतो. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या ऊन्हातही हे फूल सर्वांचे लक्ष वेधून घेते.

फुलाचे वैशिष्ट्य

हे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती अप्रतिम असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे (कॉंट्रास्ट कलर) पिवळेधमक नाजूक पुंकेसर, पुंकेसरांची संख्या अनिश्‍चित पण २० पेक्षा जास्त असते. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते

झाडाची संरचना

खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत असते. पेरूच्या झाडाच्या सालीसारखी ती दिसते. सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघून गळून पडतात. त्या ठिकाणी फिकट रंगाचे चट्टे पडतात. पाने संमुख, साधी, मोठी, लांबट, लंबगोल; पण टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गडद हिरवीगार; तर खालून फिकट हिरवी दिसतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात. झाडाचे हे रूपही अत्यंत मनोहारी असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते. साधारणपणे पालवीबरोबर किंवा आगेमागे फुलांचा बहर सुरू होतो. २५-३० सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्यांजवळ येऊ लागतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जाणारी जांभळ्या रंगाची; अतिशय देखणी दिसतात.

उपयोग

झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन; तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो.