Jump to content

तानुबाई बिर्जे

तानुबाई बिर्जे ह्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या संपादिका ठरल्या. कृष्णाजी भालेकर यांनी १८७७मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद १९०8 ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावलि.

मात्र, ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली.

जीवनपट

महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या तानुबाईंचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं, तर २६ जानेवारी, इ.स. १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी इ.स. १८९४ ते १९०५ अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ‘दिनबंधु’ हे वृत्तपत्र इ.स. १८९७ मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी १ जानेवारी, इ.स. १८७७ रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं. इ.स. १८८० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केलं. त्यानंतर इ.स. १८९७ मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते इ.स. १९०६ पर्यंत चालवलं, मात्र इ.स. १९०६ मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वृत्तपत्र पुन्हा बंद पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पतीनिधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले. तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधकच होते. महात्मा फुले यांच्या घराशेजारीच त्यांचं घर होतं. त्यामुळे फुले दांपत्याचा सहवास तानुबाईंना लहानपणीच मिळाला. वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले आणि पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळवला. हे वृत्तपत्र त्यांनी इ.स. १९०६ ते इ.स. १९१२ पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.