ताडगोळा पाम
ताडगोळा पाम, पामीरा पाम (संस्कृत: ताल) हा एक वृक्ष आहे.
या वृक्षाचे संस्कृत नाव 'ताल', या 'ताल' नावाचा पुढे अपभ्रंश होऊन त्याचे ताड झाले. ताड वृक्ष साधारणतः ४० फूट इतका उंच वाढतो. पण काही ठिकाणी त्याचे ७० ते ९० फूट उंचीचे वृक्षही आढळले आहेत. याचे खोड काळसर रंगाचे असते आणि त्यावरील आडव्या पट्ट्या त्याच्या पडून गेलेल्या पानाच्या बुडाच्या खुणा दर्शवितात. ताडाचे फळ रुजण्यास दोन ते अडीच वर्षांचा काळ लागतो. बिया गरम पाण्यात बुडवून त्यांच्या त्यांच्या रुजण्याचा काळ कमी केला जातो. ताडाच्या खोडाचे लाकूड वयपरत्वे टणक होत जाते. विशेषतः मादी ताडाचे लाकूड जास्त कडक आणि जास्त उपयुक्त असतो असे मानले जाते. घर बांधणीच्या कामात आणि शेतीच्या अवजारात याचा उपयोग केला जातो. ताडाचे फळ हिरवट सोनेरी रंगाचे असते व हळूहळू काळसर पडू लागते. बाहेरील गुळगुळीत आवरणाच्या आंत मांसल काथ्याचा भाग येतो. या मांसल कथ्यामध्ये बुळबुळीत गराचे दोन किंवा तीन भाग असतात. हा गर चवीला गोड आणि रुचकर असतो. ताडाला फुले मार्च आणि एप्रिल महिन्यात येतात. फळे एप्रिल-मे मध्ये पिकू लागतात आणि जुलै-ऑगस्ट मध्ये गळायला लागतात. ताडला फुले फळे येण्यास १२ ते १५ वर्षे लागतात. फुले आल्यावरच वृक्ष नर किंवा मादी असल्याची ओळख होते. या ताडाच्या बाबतीत एक चमत्कारिक घटना पुन्हा पुन्हा निदर्शनाला येते. बरेचसे पक्षी निरनिराळ्या फायकसच्या फळांच्या जातीवर (वड, पिंपळ, इत्यादी) उदरभरण करतात. हे पक्षी जेव्हा ताड वृक्षावर बसतात तेव्हा त्यांच्या विष्ठेतून पडलेल्या या बिया पावसाळ्यात कधी पानाच्या खाचीत रुजतात तर कधी खोडाच्या निरनिराळ्या भागात अडकून रुजू लागतात. अशी रुजलेली ही उंबर-वडाच्या जातीची झाडे ताडाच्या खाचीत त्याच्या खडबडीत खोडावर वाढू लागतात. हळूहळू ही रोपे आपली आगंतुक हवेत वाढणारी मुळे हळूच जमिनीकडे पाठवतात. ही मुळे एकदा क जमिनीपर्यंत पोहोचली कि झाडे जोमाने वाढू लागतात. मुळांना फाटे फुटून ती ताडाच्या चारही बाजूंनी पसरतात व ताडला संपूर्ण कवेत घेतात. हळूहळू या वाढणाऱ्या मूळांचा दाब या ताडाच्या खोडावर वाढू लागतो. जोपर्यंत ताड वाढत असतो आणि त्याच्या स्वतःच्या वाढीचा जोम कायम असतो, तोपर्यंत त्यावर वड-उंबराच्या झाडांचा काहीही परिणाम होत नाही. पण जेव्हा ताडाचे वय होऊ लागते व त्याचे आयुष्य नैसर्गिक रीतीने संपुष्टात येण्याच्या जवळ येऊ लागते तसा वडाच्या झाडाचा जोर वाढू लागतो आणि तो ताडाला चिरडू लागतो. अशा वृक्षांना स्ट्रॅंगलिंग फायकम असे म्हणतात.
संदर्भ
- वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक