Jump to content

तांबटकाम

पारंपरिक तांबटकामात मुख्यत्वे तांब्या-पितळेच्या भांड्यांची निर्मिती अंतर्भूत असते. ही भांडी तयार करणारा तांबट प्रथम तांब्याचा किंवा पितळेचा पत्रा घेऊन त्यावर तयार करावयाच्या भांड्याच्या आकाराचे वर्तुळ काढतो. नंतर ते कात्रीने कापून घेतो व मग ते दगडी खोलगट ऐरणीवर ठेवून हातोड्याने ठोकतो त्यामुळे पत्र्याला खोलगट आकार येऊ लागतो. अपेक्षित आकार येईपर्यंत हे काम चालू असते. यानंतर त्यावर पुन्हा निराळ्या आकारांच्या आणि वजनाच्या हातोडीने तीन ते चार वेळा ठोके दिले जातात. सामान्यतः प्रत्येक भांड्याचा वरचा व खालचा असे दोन भाग अलग अलग ठोकले जातात. ते दोन्ही भाग पितळ, टाकणखार व नवसागर यांच्या साह्याने डाखकाम करून व ते एकमेकांस जोडून त्यांतून एकसंध भांडे तयार करण्यात येते. लांब गळ्याचे मोठे भांडे मात्र तीन भागांत तयार केले जाते. भांडे जोडून तयार झाल्यावर तांबट कोळशाची पुड किंवा चिंच यांनी घासून ते चकचकीत करतो व शेवटी लहान हातोडीने पुन्हा त्यावर ओळीने ठोके मारून ते चमकदार बनवितो.

ही भांडी रोजच्या घरगुती उपयोगासाठी असतात. त्यांत प्रामुख्याने पातेली, तपेली, ओघराळे, डाव, पळी, कावळा, तसराळे, वेळणी, कोशिंबिरीचा घड, ताट, ताटल्या, वाट्या, कळशी–घागर, हंडा–डेग, लोटा, फुलपात्र, झारी, सुरई, पिंप, बंब, व गंगाळ इ. भांड्यांचा समावेश होतो. या भांड्यांवर नक्षीकाम क्वचितच असते, कारण ती रोजच्या वापरातील असतात. त्यांचे आकार मात्र आकर्षक व डौलदार असतात. भारतामध्ये बहुधा सर्व ठिकाणी कमीअधिक प्रमाणात ही भांडी तयार होतात. तथापि अहमदाबाद, पुणे, नासिक व सांगली येथील लोटे, लोट्या, गडवे, इ. प्रसिद्ध  आहेत, तर अहमदाबादला तयार होणाऱ्या पानदानावरील नक्षीचे जाळीकाम उल्लेखनीय आहे. तसेच उत्तर प्रदेशात तयार होणारी गंगाजमनी कळशी लोकप्रिय आहे. हिच्या तीन भागांपैकी मधला भाग पितळेचा व बाकीचे दोन भाग (तळ व गळा) तांब्याचे बनवितात. यात्रेकरू या कळशीत गंगाजळ भरून घेतात.


नित्य उपयोगाच्या घरगुती भांड्यांखेरीज प्रासंगिक उपयोगासाठी असलेली भांडी, उदा., अत्तरदाणी, गुलाबदाणी, पिकदाणी ही देखील तांबट तयार करतात. ही भांडी नक्षीदार आणि आकर्षक आकाराची असतात. तसेच देवपूजेची भांडी व उपकरणे उदा., पळी, पंचपात्र, ताम्हन, तांब्या, समई, नीरांजन, धूपदाणी, हळद–कुंकवाचा करंडा, गंधाची तबकडी, फुलांसाठी तबक, पुष्पपात्र वा फुलोरी, अभिषेकपात्र तसेच झारी इ. भांडी बहुतेक तांब्याची वा पितळेची असतात. त्यांचा आकार, घाट व त्यांवरील कलाकुसर विशेष कलात्मक नसली, तरी मनोवेधक असते.