Jump to content

तवा

भारतीय तवा

तवा किंवा साज हे दक्षिण, पश्चिममध्य आशियात प्रचलित असलेले मोठे वर्तुळाकार, सपाट किंवा अंतर्वक्र (खोलगट) पृष्ठभाग असलेल्या थाळीसारखे पाकसाधन आहे. तवे सहसा बिडाचे लोखंड, ॲल्युमिनियम, पोलाद किंवा भाजलेली माती यांपासून बनवले जातात. पोळ्या, भाकऱ्या किंवा तत्सदृश पदार्थ भाजण्यासाठी, तसेच भाज्या, मांसाचे तुकडे परतण्यासाठीही यांचा वापर केला जातो.

व्युत्पत्ती

तवा हा शब्द फारसी भाषेतून आला असून दक्षिण आशियाई भाषांमध्ये या पाकसाधनाचा उल्लेख करण्यासाठी हाच शब्द रुळला आहे. अफगाणिस्तान व काही वेळा पाकिस्तानात तुर्की भाषेतून आलेला साज असा शब्द या पाकसाधनासाठी प्रचलित आहे.

उपयोग

दक्षिण आशियाभर तव्याचा वापर पुढीलप्रकारच्या पदराच्या किंवा बिनपदराच्या चपात्या किंवा आंबोळ्या भाजण्यासाठी केला जातो : भाकऱ्या, चपात्या, रोट्या, पराठे, थालिपीठे, धिरडी, दोसे, उत्तप्पे, मांडे.

तसेच भाज्यांचे तुकडे परतून तवा भाजी, मासा तळसून तवा फ्राय (मासा) बनवण्यासाठीदेखील तवे वापरले जातात.

चित्रदालन