Jump to content

तळी वृक्ष

पूर्ण वाढ झालेला वृक्ष

तळी वृक्ष (शास्त्रीय नाव: कोरिफा अंब्राकुलिफेरा लिन ) हा सुपारी कुळातील वृक्ष आहे. याचा घेर गोलाकार छत्रीच्या आकाराचा असल्याने याच्या शास्त्रीय नावात कोरिफा आहे.

कोरिफा या प्रजातीच्या ८ जाती ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडात विशेषतः श्रीलंकेत सापडतात. त्यातील ४ जाती भारतात आढळतात. महाराष्ट्रात तळीवृक्ष तसेच गरबांग तथा कोरिफा ईलाटा या दोन उपजाती आढळतात. यातील कोरिफा ईलाटा ही उपजात बंगालमध्ये नैसर्गिक रित्या सापडते. या दोन्ही जाती उद्यानातून शोभेसाठी म्हणून लावल्या जातात.

भारतात या ताल वृक्षाचा प्रथम लेखी उल्लेख ड्रेकेस्टेयान फोन हिड यांच्या होर्तुस मलाबारीकुस या बारा खंडीय ग्रंथाच्या पहिल्या खंडात कोडा पाना या नावाखाली आढळतो. हे नाव मूळ वृक्षाच्या मल्ल्याळम कुडा पाना (छत्री ताड) या नावापासून आलेले आहे. यांच्या बुंध्याचा घेर तीन फुटापर्यंत असतो. याचे खोड सरळसोट असून त्यावर गळलेल्या पानांच्या वर्तुळाकार खुणा असतात. याची पाने पंख्याच्या आकाराची आणि वजनदार असतात. या प्रचंड पानांच्या आसऱ्याखाली दहा-बारा माणसे सहज बसू शकतात. वृक्षाचे आयुष्य साधारणत: साठ वर्षाचे असून याला आयुष्यात एकदाच फुले येतात. याच्या फुलोऱ्यात कित्येक हजार फुले असतात.या फुलांना नासलेल्या दह्यासारखा आंबट दर्प असतो.

फुलोरा
नैसर्गिक पुनरुत्पादन

फुले आल्यानंतर याची पाने एक एक करून गळून पडतात आणि फळे पक्व होईपर्यंत तो संपूर्ण पर्णहीन झालेला असतो. सुपारीच्या आकाराची फळे जेव्हा गळू लागतात तेव्हा त्यांचा खच वृक्षाच्या बुंध्याशी जमा होतो.याच्या पिकलेल्या फळांचे कवच हस्तिदंतासारखे कठीण असते.फळांच्या गराचा उपयोग माश्यांना भूल देण्यासाठी करतात. याच्या पानाचा उपयोग ताडाच्या इतर जातींप्रमाणेच घरे शाकारणे,चटया,पंखे,टोपल्या इत्यादी बनवण्यासाठी वापरतात. याच्या पानांचा उपयोग लोखंडी सुईने मजकूर लिहिण्यासाठी करीत असत. कागद बनवण्याची कला अस्तित्वात येण्यापूर्वी तालपत्रावरच प्राचीन ग्रंथ लिहिले गेले आहेत.

श्रीलंकेत अजूनही जन्मनोंदी, कुंडल्या तालपत्रावरच केल्या जातात.याच्या कोवळ्या पानांच्या चिंचोळ्या पट्याना ओलास असे म्हणतात.या पट्या त्यातील मध्य शीर काढून उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवून त्यांना झिलई देतात.या झिलईदार पट्या कलाकुसरीच्या कामासाठी वापरतात. गेल्या दशकात विलेपार्ल्यात एक आणि त्यानंतर लालबागमध्ये एक अशी दोन श्रीताल म्हणून प्रसिद्ध झालेली झाडे भरभरून फुलली आणि मग निसर्गाने नेमून दिलेल्या मृत्युच्या स्वाधीन झाली. आणखी एक श्रीताल मुंबईत फुलला आहे.आता श्रीतालाची काही झाडे जिजामाता उद्यानात आणि मुंबई विद्यापीठाच्या पाम उद्यानात वाढत आहे. त्यांची सुंदर रसरशीत हिरव्या रंगाची प्रचंड मोठी पाने,त्यावरचे काळसर जांभळे करवती काटे जवळून पहायचे तर आत्ताच संधी आहे.नंतर एकदा ते गगनाच्या ओढीने वाढू लागले कि त्यांची अशी जवळीक मिळण कठीण...या झाडांची फुले पहायला अजून पन्नास-साठ वर्षे वाट पहावी लागेल. पण या झाडाला फुलण्या-फळण्याचा आशीर्वाद देण म्हणजे त्याच्या मृत्यूची घटिका ठरवण्यासारख असत हे मात्र लक्ष्यात ठेवायचं.

संदर्भ

वृक्षराजी मुंबईची