डोरोथी हॉजसन
डोरोथी हॉजसन (जन्म ०२ सप्टेंबर १८८४ सिडनहॅम, इंग्लंड - मृत्यू ०२ जुलै १९४९,पाँडिचेरी )
श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आलेल्या पहिल्या २४ शिष्यांपैकी डोरोथी या एक होत्या. श्रीमाताजींच्या निकटवर्ती म्हणून त्या ओळखल्या जात असत.
प्रारंभिक जीवन
डोरोथी हॉजसन जन्माने आयरिश होत्या. ज्याच्याशी त्यांचा विवाह निश्चित झाला होता त्या भावी नवऱ्याचे निधन झाले, त्याचा त्यांना धक्का बसला आणि त्यातून त्यांनी जन्मभर अविवाहित राहण्याचा निश्चय केला.
योगमार्गाचा अवलंब
१९१६ मध्ये त्यांची मीरा रिचर्ड (पुढे ज्यांना श्रीमाताजी असे संबोधले जाऊ लागले) यांच्याशी भेट झाली, तेव्हा डोरोथी यांनी योगमार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. मीरा यांच्या रूपाने त्यांना जणू 'सल्लागार आणि गुरु' लाभला. डोरोथी मीरासोबतच्या झालेल्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना म्हणतात, ''आम्ही प्रथम चेरीच्या बागेत भेटलो. पहिल्या दृष्टिक्षेपातचे मला त्यांच्यातील देवत्व दिसले. माझ्यासाठी त्या देवासमान होत्या पण त्या मला त्यांची मैत्रिण मानत असत.''
श्रीमाताजी या माताजी या नावाने ओळखल्या जात नव्हत्या तेव्हाही त्यांच्यामधील दिव्यत्वाची जाण येऊन, आपले जीवन संपूर्णपणे त्यांच्या हाती सोपविणाऱ्या डोरोथी यांनी अतिशय साधेपणाने जीवन व्यतीत केले.[१]
प्रवास
११ मार्च १९१६ रोजी, पॉल रिचर्डस, मिरा रिचर्डस जेव्हा जपानला जाण्यासाठी निघाले तेव्हा डोरोथीपण त्यांच्या सोबत गेल्या. पॉल रिचर्डस, मिरा रिचर्डस आणि डोरोथी हॉजसन हे तिघे 'कामा मारू' जहाजावर चढले. ते १८ मे रोजी योकोहामाला पोहोचले. १९२० साली जेव्हा मीरा रिचर्ड जपानहून पाँडिचेरीला जायला निघाल्या, तेव्हा त्यांच्यासोबत डोरोथीपण आल्या. या वास्तव्यात दि.०३ मे १९१९ रोजी मीरा यांनी डोरोथी यांचे रेखाचित्र काढले, तेही उपलब्ध आहे.[२]
२४ एप्रिल रोजी पॉल व मिरा रिचर्डस आणि डोरोथी हॉजसन पाँडिचेरीला पोहोचले. पॉल रिचर्ड नोव्हेंबर १९२० पर्यंत पाँडिचेरीमध्ये राहिले आणि नंतर ते हिमालयात गेले. तेथे त्यांनी संन्यासीसारखे जगण्याचा प्रयत्न केला; नंतर ते इंग्लंडला व तेथून दोन-तीन वर्षांनी ते फ्रान्सला परतले.
स्थलांतर
सुरुवातीला, मीरा रिचर्ड्स आणि डोरोथी जेथे राहत होत्या ते घर मोडकळीस आले होते, तेव्हा श्रीअरविंद आपल्या साथीदारांसोबत जेथे राहात होते त्या घरात मीरा व डोरोथी वास्तव्यास आल्या. श्रीअरविंद यांच्यासोबत तेव्हा सुरेश चंद्र चक्रवर्ती उर्फ मोनी, बेजॉय नाग आणि सॉरिन बोस राहत होते. १९२१ सालची आठवण सांगताना श्री.पुराणी म्हणतात, ''या दोघी वास्तव्यास आल्यानंतर तेथील वातावरण बदलून गेले. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि टापटीप सर्वत्र दिसून येऊ लागली.''[३]
०१ जानेवारी १९२२ रोजी श्रीअरविंदांनी यांनी मीराला घराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्यास सांगितले. त्यामध्ये डोरोथी त्यांना मदत करू लागल्या. १९२० मध्ये श्रीअरविंदांना भेटलेले आणि १९२१ ते १९२४ दरम्यान त्यांच्यासोबत राहिलेल्या टी. कोदंडराम राव सांगतात: "मिस हॉजसन स्वयंपाकघरात देखरेख करत असत." [४]
नामकरण
सप्टेंबर १९२२ च्या दरम्यान श्रीअरविंद यांनी डोरोथी यांना 'वासवदत्ता' हे नाव दिले. या नावाचा अर्थ "जिने स्वतःचे जीवन ईश्वरास दिलेले आहे" असा होतो. त्यांना 'दत्ता' या नावाने संबोधले जाऊ लागले. [५][६] आश्रमाच्या स्थापनेनंतर त्यांनी भगवी वस्त्रे परिधान करायला सुरुवात केली. आणि अखेरपर्यंत त्या तशाच प्रकारच्या वस्त्रे परिधान करत असत. [१]
अधिमानसिक चेतनेचे अवतरण
२४ नोव्हेंबर १९२६ रोजी जेव्हा श्रीअरविंद यांच्या देहामध्ये अधिमानसिक चेतनेचे (ओव्हरमाइंड कॉन्शसनेस) अवतरण झाले तेव्हा या महान घटनेचे साक्षीदार असलेल्या चोवीस शिष्यांपैकी दत्ता या एक होत्या.
या अद्वितीय अनुभूतीचा अर्थ सगळ्यांनाच समजला असे नाही. दत्ता यांना मात्र त्याचा नेमका अर्थ उलगडला आणि त्यांनी अधिमानसिक चेतनेचे अवतरण झाल्यानंतर, लगेचच घोषणा केली की, ''लॉर्ड हॅज डिसेन्डेड इनटू द फिजिकल टुडे (भगवान श्रीकृष्णाचे जडभौतिक चेतनेमध्ये अवतरण झाले आहे.)'' [५]
निधन
दत्तांचा आश्रमातील कोणाशीही फारसा संवाद नव्हता. १९४९ मध्ये त्यांची प्रकृती पूर्णपणे बिघडल्यापर्यंत दत्ता यांनी आपले काम शांतपणे सुरू ठेवले होते आणि ०२ जुलै १९४९ रोजी त्यांचे निधन झाले.
संदर्भ
- ^ a b Narayan Prasad (1965). Life in Sri Aurobindo Ashram. West Bengal, India: SRIAUROBINDO KARMI SANGHA TRUST. p. 359.
- ^ "75+ drawings, portraits by The Mother : picture gallery". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2023-04-07 रोजी पाहिले.
- ^ A.B.Purani (1959). Evening Talks with Sri Aurobindo. Pondicherry: Sri Aurobindo Society. p. 21. ISBN 81-7060-093-6.
- ^ "Personalia / Dorothy Hodgson = Dutta". sri-aurobindo.co.in. 2023-04-07 रोजी पाहिले.
- ^ a b K.R.Srinivasa Iyengar (1952). On the Mother - the chronicle of a manifestation and ministry. Pondicherry: Sri Aurobindo International Centre of Education. ISBN 81-7058-036-6.
- ^ M.P.Pandit (1975). Champaklal Speaks. Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-668-2.