Jump to content

डोंगर देव

डोंगऱ्या देव, डोंगरी देव, माऊली माता, भाया ही महाराष्ट्र तसेच भारतातील इतर काही राज्यांच्या काही आदीवासी जमातीत पुजा केली जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे.

आदिवासी डोंगरे देव साजरा करताना (पिंपरी - वणी)




डोंगऱ्या देवाचा उत्सव

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील ... आदीवास जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवडा उत्साहच्या स्वरूपात साजरा केला जातो. उत्सवाचे पंधरा दिवस डोंगर देवाचा उपवास धरून केवळ भूईमुग शेंगा, गूळ व लाह्यांचा आहार घेतला जातो. उडीद दाळ व मेथीची भाजी खाऊन एकत्रित रित्या उपवास सोडला जातो. झेंडूच्या झाडाची पुजा दैवत समजून केली जाते उबराच्या झाडाचे तोरण असलेले मांडव घातले जातात. सांगता समारंभाच्या दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करत जागरण केले जाते. या कार्यक्रमासाठी अजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रीतही केले जाते.

आदिवासी भागात दिवळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचा थोडक्यात घेतलेला आढावा... मना डोंगरदेव उच डोंगरवर'...

यासारखी विविध गीते पावरीच्या मधुर सुरावर, तालावर डोंगऱ्या देव या निसर्गदेवतेची गौरवगाथा गायली जाते. पावरीचा सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगऱ्या देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते. या उत्सवाला मोठी परंपरा आहे.हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. याच उत्सवाला भाया असेही म्हणतात.

नाशिक जिल्हयातील पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण या तालुक्यातील आदिवासी भागातील कोकणा समाज डोंगऱ्या देवाचा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यात (साधारणतः नोव्हेंबर आणि डिसेंबर) महिन्यात चंद्र दर्शनानंतर गावात सुख शांती लाभावी, निसर्गाचा कोप होऊ नये, शेतातील पीक चांगले यावे, घर संसाराची भरभराट व्हावी तसेच निसर्गदेवता डोंगऱ्या देवाला बोललेले नवसपूर्तीसाठी डोंगऱ्या देवाची पूजा शेवऱ्या माऊली (पुजारी)च्या मंत्रोच्चाराने भोपामाऊली (देवाचा सेवक), डवरी माऊली(पावरकर) व गावकरी मंडळी यांच्या साक्षीने मांडत असतात. साधारणतः पंधरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात आदिवासी बांधव आपल्या दारी उंबराचे तोरण बांधतात आणि झेंडूच्या रोपट्याला दैवत मानून त्याची पूजा करतात. घरधनी माऊली आपल्या घराचे अंगण गोमूत्र व शेणाने सारवतात. त्या देवखळीवर किंवा गावातील हनुमान मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच माऊलींच्या हातून देवादांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवदांड्याजवळ मोरच्या पिसांचा गुच्छ, काकडी, नागळीचेनागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेवून दिवा ठेवला जातो( थोम्ब). या कार्यक्रमात पाच, सात, बारा दिवस या थोम्बाजावळ माऊल्या फेर धरून नाचतात. दररोज रात्री माऊल्या डोंगऱ्या देवाच्या वाळत्यांमध्ये (गाण्यांमध्ये) विविध आदिवासी देवतांचे वर्णन, गौरव गात फेर धरून एका ताला सुरात नाचतात. वळतीची (गाण्याची) प्रत्येक ओळ बदलली की नाचाचा प्रकारदेखील बदलत असतो.

डोंगऱ्या देव उत्सवात आदिवासी बांधव आपल्या म्होरक्यासह गटागटाने आजूबाजूच्या गावात जाऊन, डोंगऱ्या देवाची गीते गात व गावकऱ्यांना दर्शनाचे आमंत्रण देतात. गावोगाव जाऊन देवीची गर्जना करणाऱ्या या बांधवांना भाया म्हणले जाते. या गावांतील नागरिक धान्य, तेल, मीठ अथवा पैसे जे देतील ते घेऊन या जमा केलेल्या धान्य, तेलातून डोंगऱ्या देवाचा नैवद्य केला जातो.या काळात आदिवासी बांधव उपवास करतात. उपवसात फक्त भुईमूग शेंगा, गूळ, लाह्या हा त्यांचा आहार असतो. या उत्सवादरम्यान देवाच्या जागरणाचा कार्यक्रम साधारणतः चंद्र दर्शनापासून ते पौर्णिमेपर्यंत सुरू असतो. यात चतुर्दशीच्या दिवशी (पौर्णिमेच्याएक दिवस आधी) गावाजवळील ठरलेल्या डोंगरावर थोम्ब घेऊन जातात व तेथे पूजा मांडली जाते.या दिवशी रात्री सर्व माऊल्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग देवता डोंगऱ्या देवाचा जागर करतात. याच रात्री पौर्णिमेच्या संपूर्ण चंद्राचे शीतल किरण अंगावर घेत देवाच्या वळत्या (गाणे) गात डोंगऱ्या देवाला प्रसन्न करण्यासाठी सर्व माऊल्या नाचण्यात दंग झालेल्या असतात. पौर्णिमेची सुरुवात झाल्यावर डोंगराच्या कडाकपारीत देवाची पूजा मांडून दिवाडोंगऱ्या देव या निसर्गदेवतेला आवाहन करून निसर्गाने आम्हाला साथ द्यावी, या जीवसृष्टीतील चिडी-मुंगी, पशू-पक्षी व मानवाचे कल्याण व्हावे अशी विनवणी करून शेवऱ्या माऊली (पुजारी) प्रार्थना करीत असते. पहाटेला सर्व माऊली गडाला (डोंगऱ्या देवाला) जाऊन कडाकपारीला नारळाने ठोकून देवाला दर्शन देण्यासाठी एकप्रकारे साद (साकडं) घालीत असतात. त्यानंतर सर्व माऊल्या घरी येतात. त्यांच्या स्वागतासाठी गावातील जेष्ठ मंडळींसह महिला, आबालवृद्ध वाट पहात असतात. माऊल्या घरी आल्यावर देवाला कोंबडा- बोकडाचा मान दिला जातो. संध्याकाळी गावजेवणाचा कार्यक्रम (भंडारा) केला जातो व उत्सवाची सांगता होते.

(लेखन : नवनाथ ठाकरे,(प्राथमिक शिक्षक) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा, मोहपाडा ता. सुरगाणा जि. नाशिक.) []





  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/-/articleshow/17783408.cms[permanent dead link]?