Jump to content

डचमन्स पाईप कॅक्टस

डचमंस पाईप कॅक्टस किंवा क्वीन ऑफ नाईट ही एक निवडुंग वर्गीय वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव Epiphyllum oxypetalum असे आहे. भारतात बहुतेक वेळा या वनस्पतीला अज्ञानवश ब्रह्मकमळ असे म्हणतात, परंतु मूळ ब्रह्मकमळ ही एक वेगळी वनस्पती असून ती उत्तराखंडचे राज्यपुष्प आहे.

एपिफायलम ऑक्सिपेटालम किंवा डचमंस पाईप कॅक्टस

कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असून, त्याला पानांवरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची, पांढऱ्या रंगाची, सुगंधित फुले येतात. ही फुले वर्षातून एकदा, जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास पूर्ण उमलतात, व सकाळपर्यंत कोमेजतात. फुलांचा पांढरा रंग व मध्यरात्रीचे उमलणे यापाठी कीटकांना परागसिंचनासाठी आकर्षित करण्याचा हेतू असतो. या वनस्पतीला वाढीसाठी भरपूर उन्हाची आवश्यकता असते. या वनस्पतीची लागवड पाने कुंडीत लावून करता येते.

शाकीय (Vegitative) पद्धतीने पुनरुत्पादन होणाऱ्या या वनस्पतीचा पानासारखा दिसणारा हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच या वनस्पतीचे खोड होत. अशा प्रकाराच्या खोडांना पर्णकांडे (Phylloclades) असे म्हणतात. या पर्णकांडाला असणाऱ्या खाचातूनच फुलाचा उगम होतो. पानासारख्या दिसणाऱ्या या पर्णकांडावरच फुले उमलतात. म्हणूनच या वनस्पतीला लॅटीन भाषेत एपिफायलम (Epiphyllum) असे म्हणतात.

पांढऱ्या रंगाची, सुमारे ४ ते १२ इंच लांबीची ही फुले जुलै महिन्याच्या अखेरीस वा ऑगस्ट महिन्यात उमलतात. ज्या दिवशी उमलतात त्या दिवशी पाऊस थांबलेला असतो. कळी मोठी होताच सायंकाळी उमलण्याची प्रक्रिया सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंत फूल पूर्ण उमलले जाते. ‘निशोन्मीलित’ अशा या निवडुंगाची शोभा अवर्णनीय आहे.

चित्रदालन