डग्लस कूपलँड
डग्लस कूपलँड (३० डिसेंबर १९६१). प्रसिद्ध कॅनेडियन पत्रकार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, आणि निबंधकार. आधुनिक अमेरिकन संस्कृतीवरील निरीक्षण आणि भाष्यासाठी तो प्रसिद्ध असून ‘जनरेशन एक्स’ ही संकल्पना त्याने जनमानसात रुजवली. त्याचा जन्म जर्मनीतील बॅडेन-सॉलिंगेन या कॅनेडियन लष्करी तळावर झाला. १९६० च्या दशकात त्याचे कुटुंब कॅनडामध्ये स्थलांतरित झाले. त्याचे बालपण व्हँकुव्हरमध्ये गेले. १९८४ मधे त्याने मूर्तिकार होण्यासाठी ‘एमिली कार कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, व्हँकुव्हर’या कला शाळेत शिक्षण घेतले. नंतर जपानी व्यवसायशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तो हवाईला गेला. त्याने जपानमधील एका कंपनीत थोड्या कालावधीसाठी अंतर्वासिता केल्यानंतर तो कॅनडाला परतला. यानंतर त्याने टोरंटो शहरातील एका मासिकासाठी लिहायला सुरुवात केली. त्यातूनच त्याच्या साहित्यलेखनाची बीजे अंकुरली.
१९८८ मधे डग्लस कूपलँडने व्हँकुव्हर मॅगझीनसाठी एक लेख लिहीला आणि त्यातूनच जनरेशन एक्स: टेल्स फॉर अ एक्सेलेरेटेड कल्चर (१९९१) या त्याच्या पहिल्या कादंबरीची पाया भरणी झाली. जरी ‘जनरेशन एक्स’ हा शब्द आधी अस्तित्वात असला तरी कूपलँडने १९६० आणि १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या पिढीचे वर्णन करण्यासाठी ‘जनरेशन एक्स’ ही संज्ञा वापरली आणि ती प्रचलित झाली. प्रस्तुत कादंबरी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आणि कादंबरीचे शीर्षक लवकरच १९६० आणि १९७० च्या दरम्यान जन्मलेल्या अमेरिकन पिढीला लागू करण्यात आले. या कादंबरीत कॅलिफोर्नियात राहणाऱ्या वीस वर्षांच्या श्रीमंत पण असंतुष्ट तीन तरुणांच्या जीवनाचे वर्णन आहे. ‘जनरेशन एक्स’ मधे येणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना त्यांच्या पालकांपेक्षा आर्थिक सुरक्षितता मिळविणे अधिक कठीण असेल. यांना मागील पिढ्यांपेक्षा भौतिक संपत्तीच्या अपेक्षाही कमीच असतील. या कादंबरीने कूपलँडला व्यावसायिक यश मिळवून दिले. हळूहळू कूपलँड त्याच्या पिढीसाठी प्रवक्ता बनत गेला. नंतर ‘जनरेशन एक्स’ या संकल्पनेचा वापर माध्यमांनीही स्वीकारला. नंतर कूपलँडने शॅम्पू प्लॅनेट (१९९२) या त्याच्या दुसऱ्या कादंबरीत संगणक आणि संगीत यांच्या प्रभावाखाली वाढवलेल्या जागतिक किशोरवयीन पिढी (ग्लोबल टीन्स) वर आपले लक्ष केंद्रित केले. ही कादंबरी विशीतील युवा व्यक्तीरेखांभोवती गुंफली गेलेली आहे.
लाइफ आफ्टर गॉड (१९९४) हा त्याचा एक आत्मनिरीक्षणपर लघुकथांचा संग्रह असून यात समकालीन उपनगरांमध्ये वाढलेल्या, विश्वासहीन आणि निराश तरुणपिढीचे वर्णन केलेले आहे. वायर्ड मासिकासाठी लेख लिहिण्यासाठी कूपलँडने मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन या प्रमंडळातील कर्मचाऱ्यांचे रेडमंड, वॉशिंग्टन इत्यादी ठिकाणी जाऊन निरीक्षण केले. यातूनच मायक्रोसर्फ्स (१९९५) या कादंबरीचा पाया रचला गेला. त्याच्या अनुभवांचा आणि कल्पनांचा सुंदर मेळ या कादंबरीत बघायला मिळतो. या कादंबरीमध्ये तरुण संगणक आज्ञावलीकर्त्यांचा (प्रोग्रामर) एक गट मोठ्या निगम (कॉर्पोरेट) संस्कृतीत काम करत असतांना देखील त्यांच्या जीवनात असमाधानी असल्याचे चित्रण केलेले आहे. मात्र कामगार वरवर निरर्थक वाटणाऱ्या वातावरणातही कसा अर्थ शोधतात यावरही प्रस्तुत कादंबरी प्रकाश टाकते. यानंतर कूपलँडने गर्लफ्रेंड इन ए कोमा (१९९८) ही कादंबरी प्रकाशित केली. किप वार्डबरोबर त्याने लाराझ बुक: लारा क्रॉफ्ट आणि द टॉम्ब रायडर फेनोमेनन (१९९८) या पुस्तकातून ‘टॉम्ब रायडर’ या लोकप्रिय संगणकीय खेळासाठी एक सचित्र आदरांजलीच वाहिली आहे. तदनंतर त्याने मिस वायोमिंग (१९९९), ऑल फॅमिलीज आर सायकोटिक (२००१), हे नॉस्त्रादेमस! (२००३), एलेनोर रिग्बी (२००५), जेपॉड (२००६), द गम थीफ (२००७), जनरेशन ए (२००९), प्लेयर वन (२०१०) आणि वर्स्ट पर्सन एव्हर. (२०१३) या कादंबऱ्या लिहिल्या.
कूपलँडने १९९६ मधे पोलरायड्स फ्रॉम द डेड या पुस्तकाच्या माध्यमातून त्याने पूर्वी प्रकाशित केलेली छायाचित्रे, निबंध आणि लघुकथा यांचे एकत्रित प्रकाशन केले. त्याने एव्हरीथिंग्स गॉन ग्रीन (२००६) ही पटकथा लिहिली आणि या पटकथेचे नंतर त्याच नावाच्या चित्रपटात रूपांतर केले गेले. त्याने त्याच्या जेपॉड कादंबरीवर आधारित जेपॉड (२००८) या नावानेच दूरदर्शन मालिका तयार केली होती. कूपलँडने सुवेनिअर ऑफ कॅनडा (२००२) आणि सुवेनिअर ऑफ कॅनडा २ (२००४) या स्मरणिकांचे लेखन केले. नंतर २००५ मधे यावर आधारित एक माहितीपट प्रसिद्ध केला गेला.
डग्लस कूपलँड हा एक सुप्रसिद्ध दृश्यमान (व्हिज्युअल) कलाकार देखील आहे. कूपलँड आजमितीस साहित्य, कला आणि लोकप्रिय संस्कृतीवर एक मान्यताप्राप्त भाष्यकार आहे. ३५ हून अधिक भाषांमधे कूपलँडचे साहित्य अनुवादित केले गेले आहे. तो रॉयल कॅनेडियन अकॅडमी ऑफ आर्ट्सचा सन्माननीय सदस्य आहे. २०१३ मधे कूपलँडला ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ कॅनडा हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.