Jump to content

ट्यूनिकेटा

[सोप्या शब्दात लिहा]ट्यूनिकेटा : (यूरोकॉर्डेटा पुच्छ-रज्‍जुमान उपसंघ). हा ⇨ कॉर्डेटा (रज्‍जुमान) संघाचा एक उपसंघ आहे. सुमारे २,००० जाती असलेले हे सागरी प्राणी जगभर सापडतात. तसेच समुद्राच्या अगदी किनाऱ्यापासून सु. ४ किमी. खोलीपर्यंत ते आढळतात. स्थानबद्ध (एकाच जागी चिकटून राहणारे), मुक्तप्लावी (स्वतंत्रपणे पोहणारे) व तलप्लावी (सहसा सागराच्या पृष्ठभागावर पाण्याबरोबर हेलकावत जाणारे) असे त्यांचे प्रकार आढळतात. काही एकाकी जीवन जगणारे, तर काही निवहजीवी (सामूहिक जीवन जगणारे) असतात. त्यांचे आकारमान सामान्यपणे काही सेंमी. असले, तरी सूक्ष्मापासून सु. ३० सेंमी. घेराच्या वेगवेगळ्या आकारमानांचे प्राणी ह्या उपसंघात आढळतात.

ॲसिडिया किंवा हर्डमानिया या फुगीर थैलीसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांवरूनच या उपसंघास ट्यूनिकेटा (चोलधारी) हे नाव दिले गेले आहे. उपसंघाचे नमुनेदार उदाहरण म्हणून वरील प्राण्यांचा अभ्यास केला जातो. हे एकाकी प्राणी विशेषतः खडकाळ किनारे, बंदरांचे धक्के यांना चिकटलेले असतात.

यांचे शरीर जाडसर, भरभरीत अंगरख्यासारख्या चोलाने (टेस्ट) वा कवचाने झाकलेले असते. चोल सेल्युलोजासारख्या ट्यूनिसीन नावाच्या द्रवाचे बनलेले असते. चोलाच्या आत प्रावाराचे (त्वचेच्या बाहेरच्या मऊ घडीचे) अस्तर असते. शरीराच्या एका बाजूस चिकटून राहण्यासाठी बूड असते, तर विरुद्ध बाजूस अंतर्वाही व बहिर्वाही असे मोठी छिद्रे असलेले दोन निनाल (मार्ग) असतात. अंतर्वाही निनाल ग्रसनीस (घशास) जोडलेला असतो. ट्यूनिकेटात ग्रसनी हा एक मोठा पिंपासारखा विशेष भाग असून शरीरातील बहुतेक पोकळी त्याने व्यापिलेली असते. ग्रसनीच्या भिंतींत पुष्कळ क्लोमदरणे, (शरीराच्या बाहेर उघडणाऱ्या कल्ल्यांच्या फटी) असल्याने त्या जाळीदार दिसतात. क्लोम-दरणे परिग्रसनी गुहेत (म्हणजे अलिंद गुहेत) उघडतात व ती बहिर्वाही निनालाने बाहेर उघडते. ग्रसनीच्या पक्ष्माभिकायुत कोशिकांमुळे (हालचालींस उपयुक्त अशा केसांसारख्या वाढी असलेल्या पेशींमुळे) अंतर्वाही निनालातून विरघळलेले वायू असलेले पाणी, लहान प्लवकजीव (तरंगणारे जीव) आणि इतर अन्नपदार्थ आत घेतले जातात तर वापर झाल्यावर पाणी, त्याज्य पदार्थ व प्रसंगी युग्मक (ज्यांच्या युग्मांच्या संयोगामुळे प्रजोत्पत्ती होते त्या जनन कोशिका) यांच्यासहित बहिर्वाही निनालाद्वारे बाहेर सोडले जाते. अशा रीतीने या स्थानबद्ध प्राण्यात पाण्याचा प्रवाह निर्माण करून श्वसन व अन्नपदार्थ गोळा करणे असे दुहेरी कार्य ग्रसनी करू शकते. सूक्ष्म अन्नपदार्थ ग्रसनीतील श्लेष्म्यात (बुळबुळीत पदार्थात) अडकतात व पुढे जठराकडे पाठविले जातात. जठरात त्यांचे पचन होते आणि आतड्यात अभिशोषण होते. आतडे शेवटी गुदद्वाराने परिग्रसनी गुहेत उघडते. न पचलेले पदार्थ बाहेर जाणाऱ्या पाण्याबरोबर शरीराबाहेर पडतात. हृदय म्हणजे एक आकुंचन-प्रसरण पावणारी नलिका असून त्याच्या दोन्ही टोकांस रक्तवाहिन्या असतात. त्यांच्या शाखांमार्फत वायू आणि पोषणद्रव्याचे सर्व शरीरभर परिवहन (अभिसरण) होते. ह्या प्राण्यात केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या) नसतात. तसेच हृदयाचे तरंगासारखे स्पंदन थोड्याथोड्या वेळाने उलट-सुलट दिशेने होते, हे एक वैशिष्ट्य होय. प्रौढावस्थेत केवळ एक लहान तंत्रिका गुच्छिका (ज्यांच्यापासून मज्जातंतू निघतात अशा तंत्रिका कोशिकांचा म्हणजे मज्जा पेशींचा समूह) व काही तंत्रिका मिळून तंत्रिका तंत्र (मज्‍जासंस्था) बनलेले असते. तंत्रिका गुच्छिकेशेजारी तंत्रिका ग्रंथी असून ती अंतःस्रवी ग्रंथी असावी, असे मानले जाते. ट्यूनिकेट प्राणी उभयलिंगी (नर व मादी यांची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारे) असून प्रत्येकात वृषण (पुं-जनन ग्रंथी) व अंडाशय असतात. युग्मक युग्मकवाहिनीमार्फत बाहेर पाण्यात सोडले जातात. तेथे बाह्यनिषेचन (बाहेर फलन) होऊन युग्मनज (फलित अंडे) तयार होतो व त्यापासून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) तयार होतो. डिंभाला ॲसिडियन भैकेर म्हणतात.

कॉर्डेटा संघाची सर्व प्रमुख लक्षणे त्यात आढळतात. सुरुवातीस मुक्तप्लावी असलेला डिंभ कालांतराने आसंजक (चिकट) ग्रंथीनी एखाद्या घन पदार्थाला चिकटतो. नंतर त्याची शेपटी त्याची शोषली जाते पृष्ठरज्‍जू (कणा) नाहीशी होते व तंत्रिका रज्‍जू (मज्‍जा रज्‍जू) कमी कमी होऊ लागते. तसेच आकार बदलून तो थैलीसारखा होऊ लागतो. अशा रीतीने परागामी (खालील दर्जाच्या प्राण्यांची वैशिष्ट्ये येणाऱ्या) रूपांतरणाने प्रौढ ॲसिडियन तयार होतो. परागामी रूपांतरण हेही ह्या प्राण्याचे एक वैशिष्ट्य होय.

ट्यूनिकेटा या उपसंघाचे ॲसिडीयासिया, थॅलिॲसिया व लार्व्हासिया असे तीन वर्ग पडतात.

  1. ॲसिडियासिया :बहुतेक ट्यूनिकेट प्राणी ह्या वर्गातच मोडतात. त्यांच्या आकारांत पुष्कळ विविधता आढळते. डिंभात कॉर्डेटा संघाची प्रमुख लक्षणे आढळतात, पण परागामी रूपांतरण झालेल्या प्रौढ प्राण्यात मात्र ती दिसत नाहीत. चोल खूपच जाड असते. काही एकाकी (उदा., ॲसिडिया, हर्डमानिया, मोल्युला इ.) तर काही निवहजीवी (उदा., बॉट्रिलस) असतात.
  2. थॅलिॲसिया : ह्यांत सामान्यतः पारदर्शक चोल असून ते आकाराने बहिर्गोल पिंपासारखे असतात. कधीकधी यांच्यात साखळीसारखी मालिका आढळते. अंतर्वाही व बहिर्वाही निनाल दोन विरुद्ध टोकांस असतात. देहभित्तीत स्नायूचे गोल पट्टे असतात. एकाकी (उदा., साल्पा, डोलिओलम) व निवहजीवी (उदा., पायरोसोमा, या प्राण्यात प्रस्फुरता म्हणजे प्रकाश बाहेर टाकण्याची क्षमता आढळते) असे दोन्ही प्रकार या वर्गात आढळतात.
  3. लार्व्हासिया : ह्या वर्गातील प्राणी सूक्ष्म असतात. त्यांत पृष्ठरज्जू, तंत्रिका रज्जू, दोन क्लोम-दरणे असून डिंभाप्रमाणे शेपूटही असते, किंबहुना हे प्राणी डिंभासारखे असतात. तरीही त्यांत लैंगिक पक्वता किंवा चिरडिंभता (ठराविक काळानंतरही डिंभाची लक्षणे असल्याचे) आढळते, हे त्यांचे वैशिष्ट्य होय. ह्यांत चोल असे नसते. ते मुक्तप्लावी किंवा तलप्लावी असतात उदा., ऑइकोप्ल्यूरा, ॲपेंडिक्युलारिया.