Jump to content

टिपग्रंथ : मराठीचा पहिला शब्दकोश


महानुभावांचा टीपग्रंथ – मराठीतील पहिला शब्दकोश

गुजरात मधील भडोच येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केला. हा अवतार त्यांनी हरिपाळदेव नावाच्या राजपुत्राच्या मृत शरिरात स्वीकार केला. त्यांचे वडील विशाळदेव आणि आई माल्हनी होते. विशाळदेव हे या राज्याचे प्रधान होते. अवतार स्वीकार करण्यापूर्वीच हरिपाळदेवाचा विवाह झालेला होता. त्याच्या पत्नीचे नाव कमळाईसा होते. जुगार हरल्याचे निमित्त करून हरलेले ऋण फेडण्यासाठी त्यांनी पत्नीकडे अलंकाराची मागणी केली. परंतु पत्नीने अलंकार दिले नाही. त्यामुळे उदास वृत्तीचा स्वीकार केला. या संधीचा फायदा घेऊन रामयात्रेचे निमित्त पुढे केले आणि भडोच सोडले.१[] यादव राजांच्या राजवटीत १२ व्या शतकात, महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ उदयास आला. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी असून त्यांनी विविक्षित क्षणी नव विचारांचे प्रवर्तन केले. त्यातून संप्रदायाचा उदय झाला.२[] लोकांना त्यांच्या बोलीभाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे तत्त्वज्ञान पंथाचे आहे. या काळात कर्मकांड, व्रत वैकल्य, रुढी, परंपरा यांच्या जोखडात लोक अडकले होते. सर्व स्त्री – पुरुषांसाठी खुल्या असणाऱ्या या पंथाने जाती निरपेक्षतेचा आणि अहिंसेचा पुरस्कार केला.

मराठी साहित्यात महानुभाव साहित्याचे अढळ स्थान सर्वमान्य आहे. इतर संप्रदायात कधीही न निर्माण झालेले साहित्य प्रकार महानुभाव पंथाने सशक्तपणे हाताळले. त्यांत चरित्रात्मक, स्थलवर्णनात्मक, पुराणें, काव्यें वगैरे ग्रंथ आहेत. समाजांत धार्मिक मराठी ग्रंथांचा अभ्यास करावा लागत असल्यामुळें अनेक टीका, टीपग्रंथ, कोश, व्याकरणग्रंथ, छंदशास्त्रावरील ग्रंथ निर्माण झाले आहेत. असे अनेक साहित्यप्रकार या पंथाने मराठी वाङमयाला दिले. स्वाभाविकच मराठी सारस्वताचे मध्ययुगीन साहित्य हे महानुभाव वाङमयामुळे समृद्ध झाले.३[]

निर्मितीप्रक्रिया

टीपग्रंथ हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा असणारा साहित्य प्रकार महानुभाव दालनात पहावयास मिळतो. महानुभावांचे सात काव्य ग्रंथ प्रसिद्धच आहेत. आरंभीच्या कवींनी ते ग्रंथ रचून ठेवले, परंतु पुढील पिढीस त्यातील अनेक शब्द हे दुर्बोध होतात, हे वास्तव आहे. ही शब्दार्थाची अडचण दूर व्हावी या हेतूने टीपग्रंथाची निर्मिती झाली.४[] याच्याही तीन ‘शोधण्या’ झाल्या. पहिला टीपग्रंथ हा चौदाव्या शतकातील असून तो मल्ले चोरयाचक यांचा आहे. यात आवश्यक त्याच शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. दुसरा १६ व्या शतकात हरिराज पुजदेकर यांनी केला. यात कठीण शब्दांचे अर्थ, शब्दांची व्युत्पत्ती, आणि संस्कृत श्लोकही दिलेले आहेत. तिसरी शोधनी दत्तराज मराठे यांनी केली असून ही टीपग्रंथाची शेवटची शोधनी होय. यात सोपे आणि कठीण अशा सर्वच शब्दांचे अर्थ त्यांनी दिले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे, हा टीपग्रंथ सातही काव्यांचे अर्थ देतो. प्रस्तुत संशोधन हे शं. गो. तुळपुळे यांचे आहे. परंतु प्रा. पुरुषोत्तम नागपुरे यांचे मत यापेक्षा काही अंशाने निराळे दृगोचर होते. मल्ले अर्थात ‘मल्ले कोयाबास’ किंवा कवीबास यांनी पहिला टीप सुमारे शके 1325 ते 1360 या काळात कधीतरी लिहिला होता. त्यानंतर ‘ज्ञात’ महानुभावांनी आपला एक ग्रंथ तयार केला. हे दोन्ही ग्रंथ जीर्ण अवस्थेत असतानाच ‘अनंतराज चोरयाचक’ यांचाही एक ग्रंथ अस्तित्वात होता. त्यानंतर ‘हरिराज पूजदेकरांनी’ स्वतःचा टीपग्रंथ तयार केला. या सर्व पूर्वसुरींच्या ग्रंथाद्वारे ‘दत्तराज मराठे’ यांनी सात ग्रंथांचा टीप ग्रंथ सिद्ध केला आणि आयुष्याच्या उत्तरावस्थेत त्यांनी तिसऱ्यांदा संशोधन करून बराचसा वाढविला. अशा तऱ्हेने आज महानुभाव पंथात एकूण पाच ग्रंथ उपलब्ध असायला हवेत, परंतु दत्तराज मराठे आणि हरीराज पुजदेकर यांचेच ग्रंथ प्रामुख्याने आढळतात. हे टीप ग्रंथ ‘शुद्ध शब्दकोशा’च्या स्वरूपाचे आहेत आणि तेच त्यांचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.५[] उपर्युक्त पाच ग्रंथकारांना प्रमाण म्हणून प्रा. नागपुरे हे एक संकृत श्लोकही जोडतात. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. मल्ले ज्ञात सुचोरयाचक त्रय व्याख्यान जीर्णान्वयो | तस्य अन्वयग्रंथशोधनमहं आब्दी मिती संख्ययो | श्रुत्वा मे पुसदोपसंज्ञिकहरिराजस्य व्याख्यानकम् | श्रुणुवत्कृहर देश विहित युगोपाख्या जनानंदकम् ||६[]

मल्ले, ज्ञात, चोरयाचक या तिघांनी आधी आपले टीप ग्रंथ तयार केले होते, ते जीर्ण झालेले होते. त्यानंतर हरिराज पुजदेकर यांचे व्याख्यान ऐकलेले होते त्या आधारावर दत्त मराठे यांनी स्वतःचा टीप ग्रंथ तयार केला. असा वरील श्लोकाचा भावार्थ आहे.

स्वरूप

या टीप ग्रंथांनी मराठी भाषेतून हद्दपार झालेले शेकडो शब्दांची जपणूक केली आहे. मध्ययुगीन मराठी साहित्याची यथार्थ उकल होण्यासाठी हे ग्रंथ उपयुक्त ठरतात. स्पष्टीकरणात्मक पद्धतीने अन्वयार्थ सांगणारे हे ग्रंथ मार्गदर्शक आहेत. काही ठिकाणी आलेली रूपके उलगडून दाखवतात तर काही ठिकाणच्या एकाच ओव्यांचे अनेक अर्थ प्रस्तुत करतात. यात संपूर्ण काव्यांची प्रकारणशः मांडणी केली आहे. छोटी छोटी उप प्रकरणेही केली आहेत. त्यांना ‘सरवळे’ असे म्हणतात. ओव्यांचा परस्परसंबंध लावण्याचे कसब देखील पहावयास मिळते.

पुढील ओव्यांच्या अर्थनिर्धारणावरून टीपग्रंथाच्या रचनेचा आणि आकृतीबंधाचा सहजपणे अंदाज येऊ शकेल.

देंटीया देवांचा बापू : सळवंगेया देवां जगथापू उधाटेया देवां जग झंपू : तूं देवराया ||१५४||

देंटीया= गर्वे वरौतीया माना : सळवंगे साभिमानिये : तेचि गरुडी :१: गहनवती :२: महाकाळी :३: वेताळी :४: याचे पढते | जगथाप= जगातें थापवेर्ही मारिता : उद्धटया= बोलौनी उद्धट : जगझांप= आपुलया ऐश्वाऱ्याखाली झांकिता ||१५४||

सुहावेया देवां शिरोमणी : प्रतापिया देवां तरणी तूं राया चक्रपाणी : जगामाजि ||१५७||

सुहावे= सुष्ट हावावरूप : तयांचा : शिरोमणी= मुकुटमणी : तरणी= सूर्ये : ||१५७|| * || जीव देवता - व्यावृत्ती : नारदें देवाची स्तुती केली निरुपण : ||१०|| प्रतापनळें दैत्यवन जाळिजे : यथोनि प्रकरण ९ ||*||७[]

वरील ओव्यांवरून टीपग्रंथांचे स्वरूप लक्षात येते. हा ग्रंथ आकारविल्हे जरी नसला तरी देखील तो शब्दकोश नाही असे म्हणता येणार नाही. प्रा. पुरुषोत्तम नागपुरे आपल्या, ‘महानुभाव वाङ्मयातील साधनसाहित्य’ या लेखामध्ये म्हणतात, ‘मराठीतील तथाकथित पहिला कोशकार म्हणून मानल्या जाणाऱ्या मेजर कॅंडीनी आपल्या इंग्रजी-मराठी कोशाच्या प्रस्तावनेत म्हणले आहे, ‘Marathi is merely a spoken language and that it has never been cultivated or refind by authors either in prose or verse.’ ही परकियांची धारणा चुकीची होती हे मराठी भाषा प्रभुंना बराच काळ सिद्ध करता आले नाही, परंतु महानुभावीय साहित्याच्या अज्ञात दालनाचे अनावरण झाल्यानंतर ती धारणा भ्रममूलक होती हे स्पष्ट झाले. मराठी भाषेला गद्य-पद्यादी वाङ्मय प्रकारांनी समृद्ध करणाऱ्या महानुभावांनी तिला कोशवाड्मयाचे जडाव चढवून सजविल्याची जाणीव मात्र अजूनही बऱ्याच लोकांना नाही. साहित्यालंकारांनी अलंकृत अशा संस्कृत भाषेच्या भारतीय कन्या बराच काळ निष्कांचन होत्या, परंतु मराठी भाषेला अनेकविध साहित्यालंकार चढविण्याचे कार्य महानुभावांनी बाराव्या-तेराव्या शतकापासून अव्याहत चालू ठेविले होते. त्यांनी मराठी भाषेला पहिला शब्दकोश दिला. स्थळ, बंद आणि विविध टीपग्रंथ हे सर्व मराठी शब्दांच्या अर्थांना जपणारे साहित्यशिंपले होत.’८[]

समारोप

वरील चर्चेतून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. महानुभाव वाङ्मयाचे गद्यलेखन हे एक वैशिष्ट्य आहे. गद्य वाङ्मयातील टीपग्रंथ ही वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना किंवा आविष्कार आहे. या ग्रंथाची प्रेरणा जरी धार्मिक असली तरी या ग्रंथाला विशेष साहित्यिक मूल्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ आकारविल्हे नाही. जरी हा आकारविल्हे नसला तरी तो शब्दकोश नाही, असे म्हणता येत नाही. म्हणजेच मराठी साहित्यातील पहिला लिखित स्वरूपाचा शब्दकोश हा महानुभावांचा टीप ग्रंथच आहे असे म्हणावे लागते. या आधी मराठी वाङ्मयाच्या इतिहासात शब्दार्थ सांगण्यासाठी कोणतीही साहित्यकृती दृष्टोत्पत्तीस पडत नाही. मराठीचे असंख्य ‘गर्दळलेले’ शब्द त्याने आपल्या उराशी सांभाळून ठेवले आहेत. त्यांचे जतन केले आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून त्या शब्दांना नक्कीच नवसंजीवनी मिळणे शक्य आहे. मध्ययुगीन मराठी शब्द भंडारामध्ये या ग्रंथामुळे खुपच मोलाची भर पडली आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या समृद्धीत या टीप ग्रंथांचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे.

संदर्भ

  1. ^ १) लीळाचरित्र – संपा. डॉ. वि. भि. कोलते, आ. २री.
  2. ^ जिज्ञासा – २, डॉ. महंत सोनपेठकर राजधर महा. चक्राख्य प्रकाशन, २०१४. पृ.क्र. १.
  3. ^ प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास – अ. ना. देशपांडे, व्हीनस प्रकाशन, पुणे, आ. १ली, ऑगस्ट १९७३. पृ. क्र. २०४.
  4. ^ महानुभाव पंथ आणि त्याचे वाङमय – शं. गो. तुळपुळे,व्हीनस प्रकाशन,पुणे, आ. १ली, ऑगस्ट १९७६. पृ. क्र. २५९.
  5. ^ श्रीचक्रधर दर्शन – शिक्षण व सेवायोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई., जुलै १९८२. पृ. क्र. ३२२.
  6. ^ श्रीचक्रधर दर्शन – शिक्षण व सेवायोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई., जुलै १९८२. पृ. क्र. ३२२.
  7. ^ शिशुपालवध – संपा. वि. भि. कोलते, अरुण प्रकाशन, मलकापूर, पृ.क्र. ३१.
  8. ^ श्रीचक्रधर दर्शन – शिक्षण व सेवायोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई., जुलै १९८२. पृ. क्र. ३२२.