झिंगा
हा लेख झिंगा या प्राण्याविषयी आहे, वाद्याच्या माहितीकरिता कृपया झींगा पहावे.
झिंगा (prawn) नावाचे काही कंकटी प्राणी खाऱ्या आणि काही गोड्या पाण्यात राहतात. या दोन्ही प्रकारातले झिंगे एकमेकांपेक्षा भिन्न असतात. काटेरी शेवंड (spiny lobster) आणि पाणझिंगा (shrimp) हे प्राणी काहीसे झिंग्यासारखेच दिसतात.
पाठीकडून पाहता या प्राण्यांच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत एक ढालीसारखे कवच दिसते. या कवचाला कंकट म्हणतात. शेवंडाच्या कंकटावर काटे असतात तर झिंग्याला नसतात. या प्राण्यांच्या कंकट आणि उदरखंड या भागात लवचीक पापुद्रे असतात, त्यांची दुमड होऊ शकते. झिंगे, शेवंड या प्राण्यांना कठीण कवच असते पण त्यांचे अंतरंग मऊ असते. यावरून या वर्गातील प्राण्यांना बहिःकंकाल प्राणी असे म्हणतात.
कंकटी प्राण्यांची अपत्ये प्रौढांपेक्षा वेगळी असतात, त्यांना पिलवे म्हणतात. पिलवांचे कवच त्यांना वेळोवेळी बदलावे लागते. जशी पिलवांची वाढ होत जाते तसे त्यांचे कवच तुटते व त्याजागी नवे कवच उगवते. शिवाय या प्राण्यांचे शाखावयव तुटले तर त्या जागी नवे अवयव उगवतात.