Jump to content

झान सिबेलिउस

प्रख्यात फिनिश संगीतकार मुख्यतः सिंफनी-रचनाकार. मूळ नाव योहान जूलिअस क्रिस्तीआन सिबेलिउस. ‘झान’ हे त्याने घेतलेले नाव. जन्म फिनलंडमधील हॅमेनलिन्ना ह्या शहरी. त्याची मातृभाषा स्वीडिश होती तथापि आरंभी त्याचे शिक्षण फिनिश माध्यमाच्या शाळेत झाले. ह्या शाळेत असतानाच फिनिश मिथ्यकथांच्या जगाशी त्याचा परिचय झाला. कालेवाला ह्या फिनिश महाकाव्याचाही दाट प्रभाव त्याच्यावर पडला. त्याच्या सांगीतिक जडणघडणीत ह्या महाकाव्याचा वाटा मोठा आहे. त्याच्या बऱ्याच संगीतरचना ह्या महाकाव्यावर आधारित आहेत. व्हायोलिनवादन आणि संगीतरचना ह्यांची त्याला बालपणापासूनच आवड होती. त्याचे संगीतशिक्षण वयाच्या नवव्या वर्षी, पियानोवादनाचे धडे गिरवून सुरू झाले. त्याच्या पुढल्याच वर्षी त्याने स्वतःची पहिली संगीतरचना स्वरबद्घ केली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने व्हायोलिनवादनाचे शिक्षण घेतले. हेल्‌सिंकी येथे तो कायद्याच्या अभ्यासासाठी गेला पण वर्षभरातच, १८८६ मध्ये त्याने कायद्याचे शिक्षण सोडून संगीताला सर्वस्वी वाहून घेतले. मार्टिन वेगेलिअस ह्या संगीतकाराच्या मार्गदर्शनाखाली त्याने ⇨ चेंबर म्युझिक (लहान वाद्यवृंदाचा समावेश असलेला कोणताही संगीतप्रकार) आणि वाद्यसंगीत ह्या क्षेत्रांत बरेच काम केले. संगीताच्या अधिक अभ्यासासाठी तो बर्लिन आणि व्हिएन्ना येथेही जाऊन आला (१८८९— ९१). फिनलंडला परतताच त्याने कालेवालावर रचलेल्या कुल्लेर्व्हो सिंफनी (१८९२) ह्या सुंदर सिंफनीमुळे त्याची आघाडीचा फिनिश संगीतकार म्हणून ख्याती झाली.

विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळातील फिनलंडच्या स्वयंनिर्णयाच्या राष्ट्रीय कार्यात तो मनापासून समरस झाला होता. त्यातूनच फिनलंडिआ (१८९९ संस्करण १९००) सारखे उत्कृष्ट स्वरकाव्य (टोन पोएम) त्याने संगीतबद्घ केले. त्याची ही संगीतकृती फिनिश राष्ट्रवादाचे प्रतीक मानली जाते. या संगीतरचनेने त्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली. जर्मन स्वच्छंदतावादी संगीताचा वारसा पुढे चालवून त्याने स्वतःची संगीतशैली सिद्घ केली. त्याच्या या स्वच्छंदतावादी संगीत शैलीचा ठोस प्रत्यय त्याच्या फिनिश राष्ट्रवादाची अभिव्यक्ती घडविणाऱ्या संगीतरचनांतून येतो. त्याने एकूण सात सिंफनीरचना स्वरबद्घ केल्या (सिंफनी क्र. दोन ते पाच – रचनाकाल : १९०२, १९०४ — ०७, १९०९ — ११, १९१५ — १९, क. सहा व सात : १९२३-२४).

ह्यांखेरीज टॅपिओला (१९२६) हे स्वरकाव्यही त्याने रचले. ह्यानंतर जवळजवळ तीन दशके तो जार्‌व्हेनपा येथे एकांतवासात राहिला.

पहिल्या महायुद्घानंतरच्या काळातले सांगीतिक वातावरण त्याच्यासारख्या संगीतकाराला फारसे अनुकूल नव्हते. त्याची सहावी आणि सातवी सिंफनी ह्या काळातल्या सांगीतिक वातावरणाशी जुळणारी नव्हती. मिश्र (कॉक्‌टेल) संगीताच्या भ्रष्ट वातावरणात आपण ‘स्वच्छ झऱ्याचे पाणी’ देतो आहोत, असे विधान आपल्या सहाव्या सिंफनी-बाबत त्याने केले. मात्र १९३० आणि १९४० या दशकांत इंग्लंड-अमेरिकेत त्याच्या संगीताला अफाट लोकप्रियता लाभली.

कालेवाला आणि त्यातील मिथ्यकथांचे जग हे त्याच्या सांगीतिक रचनांचे मुख्य प्रेरणास्थान नेहमीच राहिले. टॅपिओला सारख्या स्वरकाव्यातून हे प्रकर्षाने जाणवते. त्याने रचलेल्या सात सिंफनी त्याच्या सर्जनशील सांगीतिक प्रतिभेचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. सांगीतिक कलाकृतीचा-रचनाकृतीचा घाट, तिच्याशी निगडित असलेल्या भाव भावना, तिचा सजीवपणा ह्यांची तीव्र जाणीव त्याच्या संगीतरचनांतून दिसते. वाद्यवृंदावरही त्याचे विलक्षण प्रभुत्व होते. त्याने वाद्यवृंदाच्या केलेल्या हाताळणीतून त्याच्या स्वतंत्र प्रतिभेचा प्रत्यय येतो. फिनलंडचा सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून त्याची ख्याती आहेच शिवाय फिनिश संगीताला आंतरराष्ट्रीय प्रसिद्घी व मान्यता मिळवून देण्यातही त्याच्या संगीताचे योगदान मोठे आहे.