Jump to content

झमनशाह दुराणी

झमनशाह दुराणी

झमनशाह दुराणी (पश्तो: شاه زمان خان ;) (इ.स. १७७० - इ.स. १८४४) हा इ.स. १७९३ ते इ.स. १८०० सालांदरम्यान राज्यारूढ असलेला अफगाणिस्तानातील दुराणी साम्राज्याचा अमीर होता. तो अहमदशाह दुराण्याचा नातू व तिमूरशाह दुराण्याचा पाचवा पुत्र होता. तिमूरशाहाच्या मॄत्यूनंतर त्याने बरकझाई घराण्यातील सरदार पायेंदाखानाच्या मदतीने आपल्या भावांस हरवून दुराणी साम्राज्याच्या तख्तावर कब्जा मिळवला. महमूद या आपल्या अखेरच्या प्रतिस्पर्धी भावाकडून निष्ठेची शपथ मिळवून झमनशाहाने त्यास हेराताचा सुभेदार बनवून काबुलातून दूर पाठवले. काबूल व हेरात यांदरम्यान झालेली ही सत्तेची अप्रत्यक्ष वाटणी पुढे शतकभर टिकली. काबूल अफगाण सत्तेचे मुख्य केंद्र राहिले, तर हेरात बह्वंशी स्वायत्तता राखून होते.

झमशाहाने त्याच्या वडलांनी भारतीय उपखंडावर केलेल्या आक्रमणांप्रमाणे मोहिमा आखायचा प्रयत्न करून पाहिला. परंतु या वेळेस त्याच्या समोर भारतीय उपखंडात प्रभावी सत्ता बनलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी उभी ठाकली होती. ब्रिटिशांनी इराणाच्या शाहास आपल्या बाजूस वळवून त्याच्याकरवी दुराणी साम्राज्यावर प्रतिआक्रमण चढवले. त्यामुळे झमनशाहाला भारतीय उपखंडावरील मोहीम गुंडाळून आपल्या साम्राज्याच्या रक्षणार्थ माघारी फिरणे भाग पडले.

झमनशाहाने त्यानंतर महमुदास हेरातातून हुसकावून हेराताचा सुभा बळकावला. महमुदास इराणात परागंदा व्हावे लागले. परंतु महमुदाने फतेहखानासोबत संधान बांधून इ.स. १८०० च्या सुमारास झमनशाहावर प्रतिआक्रमण केले. या वेळेस झमशाहाला पेशावराच्या दिशेने पळ काढावा लागला. मात्र पेशावरास पोचण्याआधी झमनशाह पकडला गेला. त्याचे डोळे काढले गेले व त्याला काबुलातील बाला हिस्सार किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले. पुढे सुमारे ४० वर्षे, म्हणजे हयात असेपर्यंत त्याला कैदेत खितपत पडावे लागले.

बाह्य दुवे