झक मारणे
झक मारणे हा मराठी भाषेत नेहमीच्या वापरात असणारा शब्द असून तो असभ्य मानला जातो. त्याचा अर्थ 'वेळ वाया घालविणे', असा केला जातो. त्याचप्रमाणे 'मूर्खपणा करणे' असाही अर्थ केला जातो.[१] मूळ शब्द 'झक्' असा असून वाक्प्रचारात 'झक' असा होतो.[१] हिंदीत "झक मारना" असे म्हणले जाते. त्याचा साधारण शुद्ध रूप "झख मारना" असे होते.
अर्थ
'झक्'चा अर्थ संस्कृत भाषेतील 'झष' म्हणजे मासा, याच्याशी जोडला जातो. आणि 'झक' मारणे म्हणजे मासे मारणे, असे गृहीत धरून त्याचा अर्थ 'निरर्थक उद्योग करणे, असा केला जातो. पण असा अर्थ लावणे, ही एक मोठी चूक आहे, कारण मासे मारणे हा उपजीविकेचा उद्योग आहे, तो निरर्थक उद्योग नाही, असे मत मराठीतील 'असभ्य म्हणी व वाक्प्रचार' विषयाचे अभ्यासक अ. द. मराठे यांनी व्यक्त केले आहे.[१] "झक" हा एक पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ 'मासा' असा होतो, असे काहीजणांचे म्हणणे आहे.[२]
विस्तारित अर्थ
मराठे यांच्या मते[१], शेख महंमद यांच्या 'योगसंग्राम' या ग्रंथात 'झकणे' हे क्रियापद वापरले आहे. त्याचा अर्थ 'मार्ग चुकणे, भरकटणे 'असा होतो. म्हणून झक्' मारीत जा म्हणजे 'भरकटत राहा, किंवा झक मारली आणि मुंबई पाहिली' म्हणजे निर्णय चुकला, असा अर्थ होतो.
त्याचप्रमाणे दिपविणारा प्रकाश, झक्क, भपकेदार, चकचकीत, झगझगीत, लख्ख, झक्क, भपकेदार, चकचकीत, वाईट गोष्ट, निंद्यकर्म, मूर्खपणा, पागलपणा, दुखवणे, फसवणे असेही अर्थ होऊ शकतात.[३]
इच्छा नसतानाही एखादे काम नाईलाज म्हणून करणे, नाईलाज म्हणून हात चोळीत बसणे, भीक मागणे, बोंबलत राहणे (जसे की "मागे दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील), मूर्खपणा करणे. झकचे आणखीही ग्राम्य अर्थ आहेत किंवा संदर्भानुसार होतात. झक मारून झुणका खाणे, असाही वाक्प्रचार काही ठिकाणी केला जातो.
'मारणे' हे क्रियापद जोडल्यास होणारे अर्थ
मराठे यांच्या मते 'भरकट' या अर्थी 'झक' हे नाम आहे. त्या नामाला 'मारणे' हे क्रियापद चिकटवले आहे. त्यापासून 'झक मारणे' असा पूर्ण वाक्प्रचार बनतो. 'झक'ला 'मारणे' हे क्रियाविशेषण जोडण्यामागे 'महाराष्ट्राचा लढवय्येपणा' हे कारण आहे. मराठे गेल्या तीनशे वर्षांपासून अनेक प्रकारची युद्धे करीत आले आहेत, ती व्यापक मारामारीच होती. त्यामुळे 'झक मारणे' असा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
'मारणे' हा अशिष्ट शब्द समजला जातो; तो 'झक'ला जोडल्यास साधारणतः पुढील किमान [४] अर्थ निष्पन्न होतात:
- ढोबळ चूक करणे; मूर्खाप्रमाणे वागणे.
- निंद्यकर्म, व्यभिचार इ. करणे.
- लोकसंप्रदायाविरुद्ध वागणे, जसे की "तो आईबापाचे ऐकत नाही, झक मारतो."
- 'करु नये ती गोष्ट केली' असे कबूल करणे किंवा कबूल करून तिच्याबद्दलचा दोष स्वीकारणे. जसे की "मी तुझ्या कारभारात/भानगडीत पडलो, झक मारली."
'मारणे' हे क्रियाविशेषण जोडून होणारे इतर काही शब्दप्रयोग पुढीलप्रमाणे :
झकत करणे, झकत जाणे, झक्कत करणे/जाणे, झकत/झक्कत देणे, झकत/ झक्कत येणे, झक मारीत राहणे -
मराठीतील उपयोग
मराठी भाषेत या शब्दाचे विविध रीतीने उपयोग केले जातात. जसे की, झक मारीत-जाईल-देईल-येईल-करील.