Jump to content

ज्योती अंबेकर


ज्योती अंबेकर[] (Jyoti Ambekar) (जन्म : परांडा-उस्मानाबाद, १८ आॅगस्ट १९६७) या एक मराठी वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक व मुलाखतकार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथील देशिकेंद्र विद्यालय आणि दयानंद महाविद्यालय येथे झाले. बी.कॉम. ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी अौरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारिता अभ्यासक्रमातील पदवी (बी.जे.) मिळविली.

औरंगाबादेत (दैनिक लोकमत) आणि गोव्यात (दैनिक गोमंतक) वृत्तपत्रात नोकरी आणि नंतर भारत सरकारचा माहिती व नभोवाणी मंत्रालयात निवडीनंतर पुणे आणि मुंबई येथे पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) असा त्यांचा प्रवास त्यांना मुंबईत दूरदर्शन केंद्रात घेऊन आला. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रात वृत्तसंपादक म्हणून काम केल्यानंतर त्या काही काळ केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या महाराष्ट्र विभागाच्या प्रमुख म्हणून तसेच ‘योजना’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. त्या दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर वृत्तसंपादक आहेत.

नेहमीच प्रसन्न आणि हसतमुख असणाऱ्या ज्योती अंबेकर यांचे व्यक्तिमत्त्व लोभसवाणे आहे. आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर त्यांनी आतापर्यंत शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. २० वर्षात त्यांनी महाराष्ट्राचे सर्व मुखमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक शास्त्रज्ञ, संपादक, वकील, डॉक्टर्स, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशा बहुतेक सर्व क्षेत्रांतील मोठमोठ्या व्यक्तींच्या जाहीर ‘लाईव्ह’ मुलाखती घेतल्या आहेत. अगदी सहजपणे पण स्वतः कमी बोलत मुलाखतकर्त्याकडून लोकांना आवश्यक असलेली उपयुक्त माहिती काढून घेण्याच्या त्यांच्या कौशल्याबद्दल त्या वाखाणल्या जातात.

दूरचित्रवाणीच्या सह्याद्री या मराठी वाहिनीवर त्या १७ वर्षे बातम्या देत आल्या आहेत. संयतपणे प्रेक्षकांना समजेल अशा रीतीने त्या बातम्या वाचतात. त्यात कोठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा नसतो, म्हणूनच त्यांचे वृत्तनिवेदन लोकांना आवडते. बातम्या वाचणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे हा त्यांचा छंद किंवा आवडीचा भाग आहे. मुळात मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येऊन त्यांनी ‘आवाजा’च्या महाराष्ट्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपल्यातील अंगभूत गुणांना चांगले वळण देऊन आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येतात, याचे ज्योती अंबेकर या उत्तम उदाहरण आहेत. दूरदर्शनमध्ये सहज म्हणून त्यांनी वृत्तनिवेदकासाठी अर्ज केला आणि त्यांची लेखी परीक्षा, मुलाखत, स्क्रीन टेस्ट अशा रीतसर प्रक्रियेनंतर बारा हजार जणांमधून प्रथम क्रमांकाने निवड झाली. बोलण्याचे आपले कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा अखेरचा शब्द म्हणून ओळखले जाणारे डॉ. अशोक रानडे यांच्याकडे ज्योती अंबेकर यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणच्या शिदोरीवर आणि त्याआधारे भरपूर मेहनत घेउन त्यांनी स्वतःला घडविले आणि ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत’ या संवाद-कलेच्या प्रांतात त्या एक मानदंड ठरल्या.

आपल्याकडील माहिती आणि निरीक्षण पोहचविण्याकरिता ज्योती अंबेकर यांनी ‘संवाद-कला’ ही कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत मुंबई, औरंगाबाद आणि सोलापूर येथे त्यांनी या कार्यशाळा घेतल्या आहेत.

‘सुख-संवाद’ हा प्रेक्षकांशी त्यांचा जिव्हाळ्याच्या विषयावर जाहीर संवाद साधण्याचा त्यांचा अनोखा उपक्रम आहे. तो तीन प्रकारांमध्ये होतो. एक केवळ महिलांसाठी- ‘आहे तुजपाशीच’, दुसरा केवळ युवक – युवतींसाठी- ‘हे दिवस फुलायचे’ आणि तिसरा केवळ जेष्ठ नागरिकांसाठी- ‘तुम्ही आम्हाला हवे आहात.’ या इंटरॅक्टिव कार्यक्रमात त्या आरोग्य, आहार, कौटुंबिक सौहार्द, मानसिक शांतता आणि व्यवस्थापन या विषयाचा अनुषंगाने सहभागी प्रेक्षकवर्गाशी मनमोकळा संवाद साधतात. त्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारतात. आपल्या मानतील प्रश्नांची उकल करण्यासाठी मदत व्हावी आणि जगण्याच्या व्यवहाराकडे पाहणाचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे.

  1. ^ "ज्योती अंबेकर". www.jyotiambekar.in. 2020-01-29 रोजी पाहिले.