Jump to content

ज्ञानकोश

Brockhaus Konversations-Lexicon, 1902

ज्ञानकोश हे एक संदर्भसाधन आहे. हा कोशसाहित्याचा एक प्रकार आहे. ज्ञानकोशाच्या धोरणानुसार त्यात संबंधित विषयाची माहिती लहान, मध्यम किंवा मोठ्या लेखांच्या स्वरूपात देण्यात येते. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात, साधार व वस्तुनिष्ठपणे मांडलेली तसेच ती शक्य तितकी अद्ययावत असावी असा संकेत आहे.

ज्ञानकोशातील अशा तऱ्हेने माहिती देणाऱ्या लेखाला नोंद अशी संज्ञा आहे. ज्ञानकोश हा अशा नोंदींचा संग्रह असतो. मात्र ह्या नोंदींच्या संग्रहाला विशिष्ट रचना असणे आवश्यक असते. ज्ञानकोशातील नोंदी विशिष्ट तार्किक क्रमाने लावण्यात येतात. हा क्रम विषयानुसार, कालक्रमानुसार, नोंदींच्या शीर्षकांनुसार अकारविल्हे इ. विविध प्रकारचा असू शकतो. परस्परांशी संबंध असलेल्या नोंदींतील संबंध दाखवण्याची काही एक योजना ज्ञानकोशाच्या रचनेत सामान्यतः केलेली असते. त्यामुळे एका नोंदीचा दुसऱ्या नोंदीशी असलेला संबंध स्पष्ट होणे सुकर होते. एखाद्या विषयाची तोंडओळख करून घ्यायला ज्ञानकोश हे उत्तम साधन आहे.

मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेची परंपरा ही प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात सुरू झालेली दिसते.

ज्ञानकोश ह्या संज्ञेचा मराठीतील वापर

ज्ञानकोश ही मराठी संज्ञा सामान्यतः एन्साय्क्लोपीडिया   (इंग्लिश: encyclopedia, encyclopaedia;) ह्या इंग्रजी संज्ञेचा पर्याय म्हणून वापरण्यात येते. ज्ञानकोश ह्या अर्थाने मराठीत विश्वकोश, महाकोश[], माहितीकोश अशा संज्ञाही वापरण्यात येतात. उदा. मराठी विश्वकोश किंवा कुमार विश्वकोश, मराठी तत्त्वज्ञान महाकोश तसेच वस्त्रनिर्मिती माहितीकोश इ.

ज्ञानकोशाचे स्वरूप

ज्ञानकोश म्हणजे ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ[विशिष्ट अर्थ पहा] (compendium) होय. ज्ञानकोश हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा विषयविशिष्ट अशा दोन्ही तऱ्हेचा असू शकतो. सर्वसाधारण ज्ञानकोशात त्याच्या रचनेच्या हेतूनुसार विविध विषयांवरील माहिती दिलेली असते तर विषयविशिष्ट ज्ञानकोशात एखाद्या विशिष्ट विषयातील विविध अंगांविषयीची माहिती दिलेली असते. ज्ञानकोशाच्या व्याप्तीनुसार आणि त्यातील लेखांची संख्या ठरते आणि ही संख्या व नोंदींचे आकारमान ह्यांनुसार ज्ञानकोश लहान वा मोठा असू शकतो. मोठे ज्ञानकोश अनेकदा विविध खंडांत विभागण्यात येतात. ही खंडांतील विभागणी विषयानुसार किंवा इतर निकषांनुसार करण्यात येते. मुद्रित स्वरूपाच्या ज्ञानकोशांत नोंदींची मांडणी अकारविल्हे करण्याची प्रथा असल्याने त्यांची खंडांतील विभागणी त्यांच्या नोंदींच्या पृष्ठसंख्येचा विचार करून आद्याक्षरांनुसार करण्यात येते असे आढळते.

विहंगमावलोकन

शब्दकोशाची व्याप्ती भाषेतील शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि व्याकरण देण्यापुरतीच मर्यादित असते. शब्दकोशात अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रसंगी चित्रे आणि क्वचित नकाशेही असतात. पण कोणत्याही प्रकारची सखोल माहिती नसते. याउलट, ज्ञानकोश ज्ञानशाखेतील विविध संज्ञांची तपशीलवार माहिती देत असतो. आणखी त्यापलीकडे जाऊन, या माहितीचे विश्लेषण करणे, ज्ञानशाखांशी असलेली विस्तृत पार्श्वभूमी विशद करणे, आणि संदर्भ उपलब्ध करून देणे ही कामेही ज्ञानकोश करतो.

अनेक ज्ञानकोशांत चित्रे, नकाशे, आराखडे, आधारभूत पुस्तकांचे संदर्भ आणि सांख्यिकीय माहिती असते. सामन्यतः सुशिक्षित, माहिती-विशेषज्ञ अशा तज्ज्ञांच्या संशोधनाने आणि मार्गदर्शनाखाली ज्ञानकोशांची निर्मिती होत असते.

ज्याला एखाद्या विषयाची संक्षिप्त आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल असा माणूस कधीना कधी ज्ञानकोशाची पाने चाळतो. अशा ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते.

इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.


सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..

ज्ञानकोशांची वर्गवारी विषय, व्याप्ती, संकलनाची आणि मांडणीची पद्धत, उत्पादन किंवा उपलब्धतेच्या पद्धतीनुसार करता येते .ज्ञानकोशब्रिटानिका ज्ञानकोशाप्रमाणे सामान्य ज्ञान किंवा विशिष्ट विषयांना वाहून घेतलेले असू शकतात. शब्दकोशांशी जोडलेले असू शकतात किंवा ते भौगोलिक स्वरूपाच्या दर्शनिका(गॅझेटियर) असू शकतात. ज्ञानकोशातील विवरण पद्धतशीर असते. विषयांचा अनुक्रम बऱ्याचदा मुळाक्षरांनुसार किंवा विषय-सुसंगत असतो.

ज्ञानकोशाची मांडणी व आधुनिक तंत्रविद्या

आधुनिक संगणक, इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे ज्ञानकोशांच्या मांडणीत आमूलाग्र बदल घडत आहेत. अनुक्रम लावणे, शोधयंत्राचा सुलभ वापर करणे, परस्परसंदर्भ देणे अशा गोष्टी सुकर झाल्या आहेत. माहितीचे संकलन, पडताळणी, संक्षिप्तीकरण, सादरीकरण यात महत्त्वपूर्ण बदल घडत असून विकिपीडिया, इत्यादीं गोष्टी, या सुधारणांनी कायकाय शक्य आहे हे सांगणारी ज्वलंत उदाहरणे आहेत. काही ज्ञानकोशांची सीडी मिळते किंवा काही ज्ञानकोश आंतरजालावर वाचायला किंवा उतरवून घ्यायला उपलब्ध असतात.

ज्ञानकोशांचा इतिहास

ज्ञानकोश किंवा त्या अर्थाच्या इतर संज्ञा जरी आधुनिक काळातील असल्या तरी त्यांच्या अर्थाशी नाते सांगणारे साहित्य विविध देशांत आणि तेथील संस्कृतींत पूर्वीपासून आढळणे शक्य आहे. त्यामुळेच ज्ञानकोशांचे सध्याचे स्वरूप हे जरी एकोणिसाव्या शतकातील युरोपीय ज्ञानकोशाच्या प्रभावातून साकारलेले असले तरी जगभरात तसेच भारतात त्यापूर्वीच्या काळात निर्माण झालेल्या ज्ञानकोशसदृश अशा साहित्याची उदाहरणे दाखवून देता येणे शक्य आहे.

भारतीय

इ.स.च्या १२व्या शतकात, भारतातील एक राजा सोमेश्वराने 'अभिलाषितार्थ चिंतामणी' हा सुमारे शंभर प्रकरणे असलेला ज्ञानकोष लिहवून घेतला.हा जगातील प्रथम विश्वकोश म्हणून मानला जाते.[ संदर्भ हवा ]

मराठीतील ज्ञानकोशरचनेची परंपरा

मराठी भाषेतील ज्ञानकोशरचनेचा पहिला प्रयत्न म्हणून रामाजी केशव सांबारे ह्यांच्या 'विद्याकल्पतरू : मराठी एन्सायक्लोपीडिया म्हणजे मराठी भाषेचा विद्यासंग्रह' ह्याचा निर्देश करावा लागतो. १ एप्रिल १८६८ ते मार्च १८७३ ह्या कालावधीत ह्याचे एकूण ३५ अंक मासिक म्हणून प्रकाशित झाले. उ ह्या अक्षरापर्यंतच्या नोंदींची ५६० पृष्ठे मुद्रित झाली. [] [] त्यानंतर १८७८मध्ये जनार्दन हरी आठल्ये ह्यांनी 'विद्यामाला' ह्या नावाने मासिक स्वरूपात ज्ञानकोशप्रकाशनाचा प्रयत्न केला पण २०० पृष्ठे छापून झाल्यावर हे काम बंद पडले. हे दोन्ही प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत.

१९०६मधील मराठी साहित्यसंमेलनातल्या आपल्या भाषणात विष्णू गोविंद विजापूरकर ह्यांनी मराठीत 'विश्वकोश' निर्माण व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आढळते.[]

महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा मराठीतील ज्ञानकोशरचनेचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता.. १९१५ ते १९२७ ह्या काळात डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर आणि त्यांचे सहकारी ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. ह्या ज्ञानकोशाचे (५ प्रस्तावनाखंड, १६ कोशनोंदींचे खंड (शरीरखंड) तसेच सूचिखंड आणि पुरवणीखंड हे २ खंड धरून) एकूण २३ खंड १९२० ते १९२७ ह्या काळात प्रकाशित झाले. []

आणखी पहा

कोश,मुक्त ज्ञानकोश,विकिपीडिया

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:Wiktionary

  • Encyclopædia Americana[permanent dead link], 1851, Francis Lieber ed. (Boston: Mussey & Co.) at the University of Michigan Making of America site
  • Encyclopædia Britannica, लेख and illustrations from 9th ed., 1875–89, and 10th ed., 1902–03.

ऑनलाईन मराठी ज्ञानकोश

ऑनलाइन ज्ञानकोश


संदर्भ

  1. ^ a b देव २००२, पान. ४८.
  2. ^ कुलकर्णी २००७, पान. १३०.
  3. ^ खानोलकर २००७, पान. १८३.
  4. ^ कुलकर्णी २००७, पान. सत्तावीस.

संदर्भसूची

  • कुलकर्णी, वसंत विष्णू (२००७), मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची (इ. स. १८०० – २००३), मुंबई: राज्य मराठी विकास संस्था
  • खानोलकर, गंगाधर देवराव (१९६९). "मराठींत ज्ञानकोश रचण्याचा पहिला प्रयत्न : 'विद्याकल्पतरू'". मराठी संशोधन-पत्रिका. मुंबई: मराठी संशोधन-मंडळ (एप्रिल १९६९ : वर्ष १६ : अंक ३).
  • देव, सदाशिव (२००२), कोशवाङ्मय : विचार आणि व्यवहार, पुणे: सुपर्ण प्रकाशन
  • विजापूरकर, विष्णू गोविंद (१९६३), देशपांडे, मु, गो. (ed.), प्रो. विजापूरकर यांचे लेख, पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन