जोसेफ स्टॅलिन
जोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली ऊर्फ जोसेफ स्टालिन (रशियन इओसेफ स्तालिन) यांचा जन्म डिसेंबर २१ १८७९ रोजी सध्याच्या जॉर्जिया (देशातील) तिफ्लिस प्रांतातील गोरी या गावी झाला. सोवियेत संघास जागतिक महाशक्ती म्हणून घडविणारे स्टालिन अतिशय सामान्य कुटुंबातले होते. त्यांचे वडील विसारिओन इव्हानोविच जुगाश्विली हे चांभार काम करीत तर आई एकातेरिना जॉर्जियेव्हना गृहिणी होती. त्यांना एकूण चार अपत्ये होती, पण स्टालिन यांची तीन भावंडे लहानपणीच दारिद्र्य व रोगराईमुळे मरण पावली होती.
स्टालिनच्या आईला स्टालिनच्या भविष्याबाबत फार काळजी वाटत असे. जोसेफने मोठे होऊन धर्मोपदेशक व्हावे असे तिला वाटत होते. त्यानुसार जोसेफ ९ वर्षांचा झाल्यावर त्याला चर्चच्या शिक्षणकेंद्रात पाठविण्यात आले. त्या शाळेत ६ वर्षे शिकल्यावर त्याला तिफ्लिस येथील उच्च शिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. त्या केंद्रात जोसेफ ५ वर्षे शिकला. या काळात जोसेफने हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमाविले. पण बंडखोर वृत्तीच्या जोसेफने अभ्यासक्रम सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे स्टालिनचे त्यांच्या शिक्षकांशी वारंवार खटके उडू लागले. इतकेच नव्हे तर त्यावर्षी स्टालिनने परिक्षा देण्यासही नकार दिल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यावर स्टालिनने काही काळ शिक्षक म्हणून तर काही काळ वेधशाळेत नोकरी केली. या काळातही इतिहास, मार्क्सवाद वगैरे विषयांवर त्यांचे वाचन सुरूच होते. मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले.
१८९४ पासून स्टालिन राजकीय क्रांतीसाठी काम करू लागले. लवकरच स्थानिक पोलीस त्यांच्या मागे लागले. त्यांच्या जाचातून सुटता यावे म्हणून स्टालिन मग बाकु व बाटुमच्या कामगार संघटनांमध्ये प्रचार कार्य करू लागले. १९०२ साली संपात सहभागी झाल्याबद्दल जोसेफ स्टालिन यांना अटक करून १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली तसेच त्या शिक्षेनंतर सायबेरियात हद्दपारीची शिक्षाही देण्यात आली. पण स्टालिन एका महिन्याच्या आतच कैदेतून निसटले. १९०४ पासून सुमारे १० वर्षे भूमिगत राहून, आपले नाव आणि वेश बदलत जोसेफने क्रांतिकारी म्हणून आपले कार्य सुरूच ठेवले. याच काळात स्टालिन यांना एकूण ८ वेळा पकडण्यात आले पैकी ७ वेळा त्यांना हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. त्यांनी बदलेल्या अनेक नावांपैकी स्टालिन हेही एक नाव होते. पुढे स्टालिन हे नाव कठोर, पोलादी, कणखर ध्येयाचे प्रतीक बनले.
१९०५ साली पहिल्यांदा जोसेफ स्टालिन, लेनिन यांना भेटले. पहिल्या भेटीतच लेनिनचा प्रभाव स्टालिनवर पडला. १९१३ पासून लेनिनचे निकटचे सहकार्य स्टालिनला लाभले. त्यांच्याच सूचनेवरून स्टालिननी मार्क्सवाद व राष्ट्रीय समस्या या नावाचा प्रबंध लिहिला. मार्च १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीच्यावेळी स्टालिन सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होते. समाजवाद्यांच्या दबावामुळे त्यावेळी सायबेरियात असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली. लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑक्टोबर क्रांतीत स्टालिनही सहभागी झाले होते. त्या क्रांतीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या अल्पसंख्य राष्ट्रिक गटाचे मंत्रिपद स्टालिनकडे देण्यात आले.
१९१८ मध्ये सोव्हियेट संघात सुरू झालेल्या यादवी युद्धात स्टालिन यांना संरक्षण खात्याची आणि मंत्रिमंडळाच्या कार्यकारी समितीतील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्सारित्सिन भागात बंडखोर लोकांपासून जनतेचा बचाव करण्याची जबाबदारी स्वीकारून स्टालिन यांनी तशी कार्यवाही केली. वोल्गा नदीवरील त्सारित्सिन या शहरास पुढे स्टालिनग्राड (रशियन उच्चार स्तालिनग्राद) असे नाव देण्यात आले. (नंतर ते पुन्हा बदलवून त्याचे व्होल्गोग्राड झाले). १९२० साली स्टालिन यांच्या प्रयत्नामुळे, त्यासाठी लढा देऊन जॉर्जिया राज्य सोव्हियेट संघास जोडण्यात आले. १९२२ साली स्टालिन यांना बोल्शेविक पक्षाचे महासचिव करण्यात आले. तर लेनिन यांच्या आजारपणात स्टालिन परराष्ट्र मंत्री होते. लेनिन यांच्या मृत्युनंतर त्यांचा देह लाल चौकात जतन करावा अशी आग्रही भूमिका स्टालिनची होती. त्यास मार्क्सवाद्यांनी विरोधही केला होता. पण कोणाचेही न ऐकता स्टालिननी लेनिनची समाधी लाल चौकात उभी केलीच.
लेनिननंतर सोव्हियेट संघाचे नेतृत्व ट्रॉट्स्की किंवा स्टालिन यांच्यापैकी कोणाला द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. स्टालिनकडे ट्रॉट्स्की सारखे वक्तृत्वाचे अंग नव्हते पण स्टालिन एक कुशल संघटक, उत्तम प्रशासक, निष्ठावान कार्यकर्ता असल्याने त्यांना सामान्य पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता म्हणून स्टालिनच सोव्हियेट संघाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले.
यादवी युद्धाच्या काळातच स्टालिन आणि ट्रॉट्स्की यांच्यात अतिशय उग्र मतभेद झाले. १९२८ मध्ये पक्षाने ट्रॉट्स्की यांना हद्दपार करून हे सर्व मतभेद संपविले. त्या आधी १९२७ साली साम्यवादी पक्षाच्या १५ व्या परिषदेने राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 'एका राष्ट्रात समाजवाद' ही नीती स्वीकारली व त्यानुसार १९२८ च्या प्रारंभी राष्ट्रीय नियोजन मंडळाने पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व १ ऑक्टोबर १९२८ पासून योजनेला मूर्त स्वरूप मिळून प्रत्यक्ष कार्य आरंभ झाले. सोवियेत संघात पंच वार्षिक योजना राबवून त्या यशस्वी करण्याची जबाबदारीही राष्ट्राध्यक्ष म्हणून स्टालिन यांचीच होती. या सगळ्यात ट्रॉट्स्कीचे नाव कोठेही नव्हते.
१९२८ ते १९५३ पर्यंत सोव्हियेट संघाचे नेतृत्व स्टालिनकडे होते. स्टालिन यांनी अवघ्या १२ वर्षांच्या काळात देशाची उभारणी केली, जागतिक महासत्ता म्हणून सोवियेत संघ उदयास आले. राष्ट्राध्यक्ष स्टालिन यांच्या पुढाकारानेच सोवियेत संघाची घटना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे सोव्हियेट संघात समावेष असलेल्या प्रत्येक वांशिक व राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वतः स्टालिन यांनीच स्वीकारली. तसेच घटनेप्रमाणे सर्व देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकारचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टालिन यशस्वी झाले. प्रत्येक गटाला आणि देशाला महत्त्व दिल्याने अल्पकाळातच प्रत्येक घटक राज्याने नेत्रदीपक प्रगती केली. पण हजारो विरोधकांचे निर्दालन करणारा नरराक्षस असे त्यांना संबोधण्यात येत असे. तसेच दुसऱ्या महायुद्धात सोवियेत संघाची जी अपार हानी झाली त्याचे कारणही स्टालिन यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. पक्षशुद्धी मोहिमेत हजारो विरोधकांना मारल्याचा आरोपही स्टालिनवर आहे. देशात स्टालिन यांची एकछत्री हुकुमशाही राजवट होती. सर्वंकष शिस्तीचा पुरस्कर्ता, कठोर मनाचा अशी स्टालिनची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली.
१९५२ अखेर स्टालिन यांची प्रकृती ढासळू लागली. मार्च ६ १९५३ रोजी स्टालिनचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले.
साम्यवाद |
मॅनिफेस्टो |
कम्युनिस्ट पक्ष |
देशात |